पूरम्
पूरम् हा उत्तर मध्य केरळमधील एक उत्सव आहे.[१]देवी दुर्गा किंवा काली यांच्या पूजनार्थ केरळमधील मंदिरांमधे हा उत्सव साजरा केला जातो.केरळच्या आत्ताच्या पलकड्ड, त्रिसूर आणि मल्प्पुरम् जिल्ह्यातील देवीच्या मंदिरांमधे हा उत्सव विशेषत्वाने साजरा केला जातो.[२] शेतीच्या उन्हाळी हंगामानंतर हा उत्सव साजरा करण्याची पद्धती प्रचलित आहे.एर्नाकुलम् मधील हरिमोट्टम् पूरम् हा सर्वात प्रसिद्ध पूरम् उत्सव आहे. प्रत्येक पूरम् उत्सवात देवळातील हत्तीला शृंगारून मिरवणुकीमधे असलेला हत्तीचा सहभाग वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो.[३] , [४] संत आंदाल हिच्या मंदिरात तिच्या जन्मतिथीनिमित्त आदि पूरम् उत्सव साजरा केला जातो. देवतांचे विग्रह म्हणजे मूर्ती रथात ठेवून ते रथ भाविक ओढतात आणि मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालतात. हा उत्सव १० दिवस सुरू असतो.[५]
सांगीतिक वाद्यवृंद
पूरम्च्या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे स्थानिक वाद्यांचा सामूहिक कार्यक्रम होय.पारंपरिक शास्त्रीय वाद्ये या दिवशी वाजवली जातात. त्याला 'मेलम् ' असे म्हणले जाते.जॅझ या संगीत प्रकाराच्या जवळ जाणारा हा केरळचा पारंपरिक वाद्यवृंद सादरीकरण प्रकार आहे.पंडी मेलम् या लोकप्रिय प्रकारात उत्सवादरम्यान मंदिराच्या बाहेर वाद्यवादन केले जाते.पंचरी मेलम् हे सादरीकरण मंदिराच्या आतमधे केले जाते ज्यामधे विविध प्रकारचे नाद वाद्यांवर एकापाठोपाठ एक वाजविले जातात.
'पंचवाद्यम्' [६]ही सुद्धा केरळमधील वैशिष्ट्यपूर्ण वाद्यवृंद संकल्पना आहे.संस्कृतमधे पंच म्हणजे पाच. या संकल्पनेत पाच वेगवेगळी वाद्ये एकत्रितपणे नादनिर्मिती करून सादरीकरण करतात.मधालम्,कोम्बू,एडक्क,एलाथलम् आण तिमीला ही ती पाच वाद्ये आहेत.'थयंबका' नावाची आणखी एक संकल्पना केरळमधे अस्तित्वात आली.यामधे छेंडा नावाचे वाद्य वाजविणारा एक मुख्य कलाकार अन्य वादकांच्या वर्तुळात मध्यभागी उभा राहतो. भोवती उभ्या असलेल्या वाद्यांच्या नादातून नवीन नवीन नाद विकसित करण्याचे नेतृत्व या मध्यभागी वादन करणाऱ्या कलाकाराकडे असते.
चित्रदालन
- सुशोभित हत्ती मिरवणूक
- मिरवणूक
संदर्भ
- ^ "Pooram festivals of Kerala". Kerala Tourism (इंग्रजी भाषेत). 2021-10-16 रोजी पाहिले.
- ^ Sanjani, Manohar (2001). Encyclopaedia of Tourism Resources in India, Volume 2. Delhi: Gyan Publication House. p. 208.
- ^ http://www.keralaculture.org/thrissur-pooram/403
- ^ https://www.keralatourism.org/event/pooram/
- ^ "Aadi Pooram festival celebrated within Andal temple premises" (इंग्रजी भाषेत). Special Correspondent. Srivilliputtur. 2021-08-11. ISSN 0971-751X.CS1 maint: others (link)
- ^ https://www.financialexpress.com/lifestyle/what-is-thrissur-pooram-keralas-spectacular-festival-of-caprisoned-elephants-fireworks-and-panchavadyam/1576820/