पु.वि. बेहेरे
पु.वि. बेहेरे ऊर्फ राजाभाऊ बेहेरे (११ जून, इ.स. १९३१ - २७ जानेवारी, इ.स. २०००) हे मेनका, माहेर आणि जत्रा या मराठी मासिकाचे संपादक होते.
मेनका मासिकाची सुरुवात
नियमित उत्पन्नाची सरकारी नोकरी सोडून त्यांनी जेव्हा मराठी नियतकालिक काढायचे ठरविले, तेव्हा. विलक्षण जिद्द आणि आपल्याला नेमके काय करावयाचे आहे याचे अचूक भान याच्याखेरीज त्यांच्याकडे काहीही नव्हते. मात्र मासिक काढायच्या कामात त्यांंना त्यांच्या पत्नी सुमनताई बेहेरे यांनी मोलाची साथ दिली.
इ.स. १९५९ साली मुंबईहून प्रकाशित झालेल्या 'मेनका'च्या पहिल्याच अंकावर आचार्य अत्रे यांनी टीका केली. नावावरून त्यांना हे मासिक मराठीमध्ये काहीतरी भयंकर करणार असे वाटले. पुण्याच्या अश्लील मार्तंड कृष्णराव मराठे यांनीही खटला भरला. त्याचा भरपूर मनस्ताप बेहेरे दांपत्याला सोसावा लागला. पण त्या खटल्यामुळे मेनका मासिकाची बरीच चर्चा होऊ लागली आणि त्यामुळे चांगलीच प्रसिद्धीही झाली. पहिल्या अंकापासूनच वाचकांनी मासिकाला हात दिला आणि त्यानंतर मात्र मेनका मासिक ५०हून अधिक वर्षे चालतच राहिले.
माहेर आणि जत्रा
मेनका प्रकाशित व्हायला लागल्यानंतर ४ वर्षानी राजाभाऊ बेहेरे पुण्याला गेले आणि मग मेनकाच्या जोडीनेच माहेर (इ.स. १९६३) आणि जत्रा (इ.स. १९६५) नियतकालिके ते प्रसिद्ध करू लागले. पु. भा. भावे, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, जयवंत दळवी, गंगाधर गाडगीळ, श्री. ज. जोशी, वसुंधरा पटवर्धन, ज्योत्स्ना देवधर अशा अनेक लेखकांना त्यांनी लिहिते केले. बघता बघता या तीनही नियतकालिकांचा जम बसला.
मासिकाचा खप वाढविण्याच्या क्ऌप्त्या
मासिकांकरिता लिहिणाऱ्या लेखकांची भक्कम फळी असली तरी त्याला बेहेऱ्यांच्या कल्पकतेची जोड मिळत गेली. तर एकाच कादंबरीची प्रकरणे विविध लेखकांकडून लिहून घ्यायची ही कल्पना वाचकांना फार आवडली. तसेच लेखकांकडून लिहून घेतलेल्या काही कथा प्रसिद्ध करताना त्याखाली चार-पाच लेखक-लेखिकांची नावे देऊन ही कथा यापैकी कोणी लिहिली ती वाचकांनी ओळखावे असे आवाहन केले जाई. त्यामुळे मासिकांना रसिक वाचकांचा सहभाग मिळत गेला.
मेनका प्रकाशन
नियतकालिकांखेरीज राजाभाऊ ऊर्फ पु.वि. बेहेरे यांनी मेनका प्रकाशन नावाची संस्था काढाली. या संस्थेमार्फत त्यांनी पुस्तक प्रकाशनाचा व्यवसायही सुरू केला. मराठी लेखक व.पु. काळे, मालती कारवारकर, प्रवीण दवणे, मंगला गोडबोले यांची अनेक पुस्तके ’मेनका’ने प्रकाशित केली.
पुरस्कार
इ.स. १९८५ सालापासून मेनका प्रकाशन पु.भा. भावे यांच्या नावे ५००० रुपयांचा पुरस्कार देते.