पुस्तपालन
आर्थिक व्यवहार लेख पुस्तकामध्ये पद्धतशीरपणे नोंदवून ठेवणे म्हणजे पुस्तपालन होय. (इंग्लिश : book keeping ).
कुठल्या तारखेस व्यवहार घडला व त्याचे तपशील उदा. देणारा, घेणारा, रक्कम, वस्तू अथवा सेवा इत्यादी पुस्तपालनात लिहिले जातात. पुस्तपालन आणि या पुस्तपालनामुळे व्यवसायावर कुठले परिणाम झाले याची नोंद करण्याचे काम 'लेखापाल' करतो.
साधारणतः एका आर्थिक वर्षात घडलेल्या व्यवहारांचा आढावा नफा तोटा मोजताना घेत असले तरी पुस्तपालानातील नोंदींचा वापर भविष्यातही केला जातो.
व्याख्या
१) व्यावसायिक व्यवहार पुस्तसंचामध्ये नोंदवून ठेवण्याची पुस्तपालन ही कला आहे - जे आर बाटलीबोय
२) पुस्तपालन ही मुद्रेमध्ये व्यक्त होणारेसर्व व्यावसायिक व्यवहार बिनचूक जमाखर्चाच्या पुस्तकात लिहून ठेवण्याची कला व शास्त्र आहे - आर एन कार्टर
महत्त्व
१) व्यवहारांचा अभिलेख - भूतकाळात घडलेल्या व्यवहारांची विश्वासार्ह नोंद
२) आर्थिक माहिती - व्यवसायाशी संबंधित सर्व आर्थिक बाबींचे एकत्रित संग्रहण. नफा, तोटा, देयता, कर इत्यादी सर्व माहितीचे संकलन
३) निर्णय सहायक - गुंतवणूक तसेच व्यापारविषयक निर्णय घेण्यासाठी
इतिहास
बाबीलोनियातील संस्कृतीमध्ये सुद्धा मातीच्या विटांवर आर्थिक व्यवहारांचे उल्लेख आढळतात म्हणजेच आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवणे या गोष्टीला चार हजार वर्षांचा तरी इतिहास आहे.
पुस्तपालन किंवा आर्थिक व्यवहारांची एका विशिष्ट पद्धतीने नोंद ठेवणे ही भारतीयांची जुनी सवय आहे. याचे लिखित उल्लेख चाणक्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथात सापडतात, म्हणजे पुस्तपालनास भारतात साधारणतः दोन हजार वर्षांची परंपरा आहे. व्यवहाराची एक नोंद ठेवणे ही भारतीय पद्धत 'देशीनामा' या नावाने ओळखली जाते.
१४९४ मध्ये इटलीतील ल्युका दी बर्गो पासीअलो यांनी पुस्तपालनाची द्विनोंदी पद्धत शोधली. या पद्धतीत प्रत्येक व्यवहाराचे दोन परिणाम पुस्तलेखनात नोंदवले जातात.
उपयोग
१) व्यवसायातील आर्थिक व्यवहारांची नोंद
२) धंद्यातील विशिष्ट कालावधीचा नफा तोटा समजणे , धनको तसेच ऋणको यांच्या कडून देणे / येणे असलेली रक्कम समजणे
३) आपल्या व्यवसायाची एकूण संपत्ती समजणे, भांडवल किती, भांडवलातून किती रक्कम परत काढली हे समजणे
४) कुठल्या वस्तू विक्रीतून / सेवेतून किती फायदा झाला , किती किंमत मोजावी लागली याचा अचूक आकडा समजणे.
५) एखादा धंदा किती फायदेशीर आहे समजल्यामुळे गुंतवणूक विषयक निर्णय घेणे सोपे होते.
६) मागील वर्षाच्या आर्थिक परिणामांशी तुलना करता येणे.
७) कर देयता ठरवणे व कर निश्चितीसाठी पुरावा म्हणून
८) एखादी वस्तू विकत घ्यावी की स्वतः उत्पादित करावी याचा निर्णय घेण्यासाठी