Jump to content

पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी

राव बहाद्दुर पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी (जन्म : ५ मार्च, इ.स. १८५६; - मुंबई, २६ मार्च, इ.स. १९२९) हे मुंबई इलाख्याची दर्शनिका (गॅझेटियर) तयार करण्यात सहभाग असलेले मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासाचे अभ्यासक व कवी होते.

पु.बा. जोशी यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे जिल्ह्यातील केळवे येथे आणि हायस्कूलचे शिक्षण मुंबईत झाले. इ.स. १८७५मध्ये मॅट्रिक झाल्यावर जोशी कस्टम्स खात्यात नोकरीला लागले. कस्टम्समधील जेम्स कॅम्बेल हे विद्याभिलाषी इंग्रज अधिकारी होते. त्यांची मुंबई इलाख्याच्या गॅझेटियरसाठी मुख्य संपादक म्हणून नेमणूक होताच त्यांना पु.बा. जोशींना साहाय्यक म्हणून निवडले. जोशींनी दर्शनिकेसाठी संशोधनपर लेखन करतानाच इतिहास संशोधन व मानववंशशास्त्र (ॲन्थ्रॉपॉलॉजी) ह्या विषयांवर निबंध प्रकाशित केले. ’टाइम्स ऑफ इंडिया’त हिंदुधर्म व इतिहास यांवर जोशींचे अनेक लेख प्रसिद्ध झाले.

पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी हे मुंबईमधील एक अभ्यासू इतिहाससंशोधक गृहस्थ होते. बऱ्याच संशोधकांनी त्यांच्याकडून मिळालेल्या साहाय्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केल्याचे आढळते. ह्यांना एशियाटिक सोसायटीने ’कॅंबेल मेडल’ देऊन गौरविले होते. ह्यांची स्वतःची राहण्याची जागा ’बनाम हॉल लेन’ मध्ये होती

पु.बा. जोशी यांच्या कविता व मराठी लेख ’मासिक मनोरंजन’. चित्रमयजगत’, ’विविधज्ञानविस्तार’ आणि ’नवयुग’ आदी नियतकालिकांतून प्रकाशित होत असत. त्यांचा कल साधारणपणे दीर्घकाव्ये लिहिण्याकडे होता, असे दिसते. राष्ट्रीय सद्गुण व स्वदेशप्रीती यांच्या संवर्धनाचा हेतू बाळगून त्यांनी बरीच काव्ये लिहिली आहेत.

पु.बा. जोशी यांची स्फुट काव्ये

  • काव्यरत्‍न पहिले (१९१६)
  • पद्यसुधा (१८८२)
  • मुक्तावली (१८७३)
  • युवराजनिधन-काव्य (१९०९)
  • समाधिशतावली

इतिहासलेखन

उत्तर कोंकणाचा प्राचीन इतिहास (१९२६) हा ग्रंथ पु.बा. जोशींनी डॉ. श्री.व्यं. केतकर यांच्या ज्ञानकोशासाठी लिहिला. ह्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ’महिकावतीची बखर’ला इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील अनेक विधाने जोशींनी साधार खोडून काढली आहेत.

पुरस्कार आणि सन्मान

  • पु.बा. जोशी ह्यांच्या वाङ्‌मयसेवेबद्दल त्यांना मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ’कॅंबेल सुवर्णपदक’ मिळाले होते.
  • पु.बा. जोशी हे १९२६ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.