पुरी (ओडिशा)
पुरी ପୁରୀ | |
भारतामधील शहर | |
पुरी | |
पुरी | |
देश | भारत |
राज्य | ओडिशा |
जिल्हा | पुरी जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ० फूट (० मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | २,००,५६४ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
पुरी भारताच्या ओड़िशा राज्यातील एक शहर व पुरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर तेथे असलेल्या जगन्नाथाच्या मंदिरामुळे 'जगन्नाथपुरी' म्हणून अधिक ओळखले जाते. सध्या असलेल्या मंदिराची पुनर्बांधणी दहाव्या शतकाच्या नंतर जुन्या मंदिराच्या जागेवर झाली. त्याचा प्रारंभ राजा अनंतवर्मन देव या गंग राजघराण्यातील राजाकडून झाला.[१]
सांस्कृतिक महत्त्व
जगन्नाथपुरी हे ओडिसामध्ये भुवनेश्वरपासून वीस मैलांवर समुद्रतीरी वसलेले एक नगर आहे. हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र असून याला श्रीक्षेत्र, पुरुषोत्तमक्षेत्र अशी अन्य नावेही आहेत.जगन्नाथपुरी शहरात जगन्नाथाचे एक पुरातन मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. त्यावेळी मूर्ती विराजमान झालेला प्रचंड वजनाचा लाकडी रथ ओढायला शेकडो माणसे लागतात. (म्हणून फार मोठे काम करणे याला जगन्नाथाचा रथ ओढणे असे म्हणतात,)
मूर्ती
हिंदू पंचांगानुसार ज्या वर्षी अधिक आषाढ महिना येतो, त्या वर्षी जगन्नाथपुरीला जगन्नाथाच्या नवीन काष्ठमूर्ती तयार करून त्यांची शास्त्रोक्त विधिवत प्रतिष्ठापना करणे म्हणजेच ‘नव-कलेवर’ होय.(कलेवर म्हणजे देह.) या मूर्ती लाकडाच्या असल्याने वास्तविक दर १२ वर्षांनी त्या बदलणे आवश्यक असते. परंतु रथयात्रा आषाढ महिन्यात होत असल्याने जेव्हा अधिक आषाढ महिना येतो तेव्हाच नवीन मूर्ती घडवून जुन्या मूर्ती बदलतात. त्यामुळे कधीकधी मूर्ती बदलण्यास १२हून अधिक वर्षे लागू शकतात. त्याशिवाय ‘इंद्र नीलमणी’ पुराणानुसार श्रीकृष्णाच्या पायाला अधिक आषाढ अमावास्येलाच बाण लागून ते वैकुंठाला गेले होते. म्हणून तो दिवस जगन्नाथपुरीला वैकुंठगमन उत्सव, नव-कलेवर उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो.
नव-कलेवर उत्सव : इतिहास
काही जाणकारांच्या मते, ओरिसामधील हिंदू राजांच्या पतनानंतर व काही विशिष्ट कारणवश मूर्ती बदलण्याची आवश्यकता भासली. मुसलमानी राजवटीत बंगालचा नबाब करानीचा सेनापती काळा पहाडने ओरिसावर स्वारी केली. भुवनेश्वरची अनेक मंदिरे पाडून तो जगन्नाथपुरीकडे वळला. तेव्हा श्रीजगन्नाथाच्या भक्तांनी सगळ्या मूर्तीना देवळातून हलवले. पण त्याआधी भक्तांनी त्यामधील ‘ब्रह्म’ काढून ते मृदुंगात लपवून कुजंगगडावर लपवून ठेवले होते. काळा पहाडने मूर्ती हाताला लागल्यावर त्या जाळून टाकल्या. या घटनेनंतर २० वर्षांनी कुजंगगडाच्या राजांनी नव्या मूर्ती घडवून, त्यात ‘ब्रह्म’ची स्थापना करून त्यांची पुरीच्या मंदिरात स्थापना केली. त्यानंतरच्या मुसलमानी राजवटींत अनेकदा जगन्नाथ मंदिराबाहेर गेले आणि ‘नव-कलेवर’ होऊन परत आले. औरंगजेबाच्या काळात तर मंदिर आणि जगन्नाथ दोघांचेही खूप हाल झाले. त्यानंतर १७३३ साली जगन्नाथ ‘नव कलेवर’ होऊन देवळात परत आले.
त्यानंतर ओरिसावर मराठ्यांचे राज्य होते. त्यांच्या कारकिर्दीत जगन्नाथपुरी आणि मंदिरातही शांती प्रस्थापित झाली. पुरीच्या देवळासमोरील अरुण स्तंभाची स्थापना मराठ्यांच्या राजवटीत झाली. कोणार्कच्या सूर्यमंदिरातील भग्न अवशेष जगन्नाथपुरीला आणून त्यांनी जगन्नाथाच्या देवळातील भोग मंडपाचे आवर, स्नान मंडप, मंदिराभोवतालची भिंत तसेच अनेक देवळे बांधली. सोन्याची लक्ष्मी घडवून या देवळात तिची स्थापना केली. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी येण्याअगोदर व या कंपनीच्या काळातही ‘नव-कलेवर’ झाल्याच्या नोंदी आहेत. गेल्या १०० वर्षांत १९३१, १९५०, १९६९, १९७७ आणि १९९६ साली ‘नव कलेवर’ झाले. १८ जुलै २०१५ रोजी एकविसाव्या शतकातले पहिले नव कलेवर झाले.
मूर्तीसाठी लाकडाचा शोध
नव-कलेवराची तयारी चैत्र महिन्यापासून सुरू होते. चैत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका चांगल्या दिवशी शुभ मुहूर्त बघतात. त्या मुहूर्तावर धर्मशास्त्रानुसार सर्व विधी करून श्रीजगन्नाथाची आज्ञा घेऊन दैतापती छत्रचामरे घेऊन बडदांड (ज्या रस्त्यावरून जगन्नाथाचा रथ ओढला जातो तो रस्ता) वरून दारुयात्रेला (तिन्ही देव व सुदर्शनासाठी लागणाऱ्या झाडाच्या ओंडक्याच्या शोधासाठी केलेले प्रस्थान) निघतात. यालाच ‘वनजाग विधी’ असेही म्हणतात. तेथून ते पुरी राजाच्या राजवाड्यावर जातात. राजा तिथे भिल्लांचा नायक-विश्वावसूवर कामाची सर्व जबाबदारी सोपवतो. मग त्याच्या देखरेखीखाली काकटपूर मंगळादेवीच्या दर्शनासाठी दैतापती निघतात. तिथे ते प्राची नदीच्या किनारी सिद्धमठात राहतात. देवीची पूजाअर्चा करून तिचा कौल मिळायची वाट बघतात. मुख्य दैतापतीला स्वप्नादेश मिळतो. ओंडके (दारु) कुठे कुठे मिळतील, हे मुख्य दैतापतीला स्वप्नात येते. त्यानुसार चार गटांत विभागणी होऊन दैतापतींचे चार गट चार ओंडक्यांसाठी त्या-त्या ठिकाणी रवाना होतात. नव कलेवरासाठी जो ओंडका वापरला जातो त्याला ‘दारु’ म्हणतात. हा ओंडका कडुिलबाच्या झाडाचा असतो.
हे झाड कसे असावे याचे काही नियम ठरलेले आहेत. झाडाच्या आसपास एखादा आश्रम वा देऊळ असावे. जवळ स्मशान असावे. झाडाच्या आसपास नदी अथवा मोठा जलाशय असावा. झाडाच्या बुंध्याशी नागाचे वारूळ असावे. वारुळात नागाची वस्ती असावी. झाडाच्या फांद्या जमिनीपासून १२ फूट उंचीवर असाव्यात. म्हणजेच जमिनीपासून झाडाचा बुंधा १२ फूट एकसंध असावा. फांद्यांनी जवळच्या दुसऱ्या कोणत्याही झाडाला स्पर्श केलेला नसावा. झाडावर पक्ष्यांचे एकही घरटे नसावे. दुसऱ्या कोणत्याही वेली झाडावर वाढत नसाव्यात. आणि नवल करण्यासारखी अट म्हणजे, झाडावर शंख, चक्र, गदा, पद्म यापकी एखादे चिन्ह असणे आवश्यक आहे.
अशा लक्षणांनी युक्त असे झाड सापडले, की झाड उतरवण्याअगोदर त्याच्या आसपासची जागा स्वच्छ करून तिथे होम करण्यासाठी जागा निवडतात. छोट्या छोट्या राहुट्या उभारून त्यात दैतापती राहतात. प्रथम पाच प्रकारची धान्ये पेरतात. मग मुख्य पुरोहित (विद्यापती) व विश्वकर्मा पाताळ नृसिंहाच्या मंत्राने नृसिंहाची उपासना करून होमात आहुती देतात. झाडावर असणाऱ्या देवतांना झाड सोडून जाण्याची विनंती करतात. जगन्नाथाची आज्ञामाळ घेऊन दैतापती व ब्राह्मण वाद्यांच्या गजरात झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालून ती माळ झाडाला बांधतात. एकदा झाडाला माळ बांधली, की झाड उतरवेपर्यंत सगळे उपवास करतात. सोन्याची व चांदीची अशा दोन छोट्या कुऱ्हाडी तयार करतात. त्या दोन व लोखंडाची एक अशा तीन कुऱ्हाडींची पूजा होते. होम झाला की विधिवत प्रथम विद्यापती सोन्याची, विश्वावसू चांदीची व विश्वकर्मा लोखंडाची कुऱ्हाड झाडाला लावतात. त्यानंतर झाड पाडणारे कामाला लागतात. मापाप्रमाणे बुंधा घेऊन झाडाचा उरलेला भाग तिथेच खड्डा खणून पुरून टाकतात. याला ‘पाताळी’ असे म्हणतात. हे सारे आटोपल्यावर सगळे उपास सोडतात.
लाकडाच्या ओंडक्यांची वाहतूक आणि मूर्ती घडविण्याची क्रिया
झाडापासून मिळालेले ओंडके जगन्नाथपुरीच्या देवळात नेतात. त्यासाठी लाकडाचीच चारचाकी गाडी तयार केली जाते. चाकांसाठी वडाचे लाकूड वापरतात. मुख्य दांडा चिंचेच्या झाडाचा असतो. ओंडका लाल कापडात गुंडाळून गाडीवर ठेवतात व ही गाडी वेताच्या अथवा काथ्याच्या दोराने माणसे ओढत नेतात. चारही ओंडके जगन्नाथपुरीला उत्तरेच्या दारातून (याला ‘वैकुंठद्वार’ म्हणतात.) कोयली वैकुंठमध्ये आणून ठेवतात. तिथे चार खोल्यांमध्ये हे चार ओंडके ठेवून त्यांची पूजा होते.
मूर्ती घडविणे : ज्येष्ठ पौर्णिमेला देवांना स्नान घालून त्यांची पूजा, नेवैद्य वगैरे झाल्यावर आधीचे देव कोणासही दर्शन देत नाहीत. यालाच ‘अणसर’ असे म्हणतात. देव अणसरात गेले की नवीन दारूंना स्नान घालून दारुशाळेत आणतात. इथेच विश्वकर्मा त्यापासून चार नव्या मूर्ती बंद दाराच्या आत घडवतात. त्या घडवताना होणारे आवाज कोणाच्याही कानावर पडू नयेत म्हणून बाहेर अखंड वाद्यांचा गजर चालू असतो. ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येच्या रात्री नवीन मूर्तीना रथात बसवून जगन्नाथाच्या देवळाला प्रदक्षिणा घालतात. दैतापतींखेरीज ही रथयात्रा इतर कोणीही बघत नाहीत.
त्याच अमावास्येच्या रात्री पूर्ण अंधारात, पती महापात्र (मुख्य पुजारी) दारे बंद करून, डोळ्यांना पट्टी बांधून व हातालाही कापड गुंडाळून जुन्या मूर्तीच्या आत असलेला अलौकिक पदार्थ (यालाच ‘ब्रह्म’ म्हणतात.) बाहेर काढतात व नव्या मूर्तीमध्ये त्याची स्थापना करतात. हे झाल्यावर जुन्या मूर्तीना २७ फूट मातीखाली समाधी देतात.
चित्रदालन
- पुरीच्या समुद्र किनाऱ्यावरून सूर्योदय
संदर्भ
- ^ Cesarone, Bernard (2012). "Bernard Cesarone: Pata-chitras of Odisha". asianart.com. Retrieved 2 July 2012. This temple was built in approximately 1135-1150 by Codaganga, a king of the Eastern Ganga dynasty "Chodaganga Deva". indiadivine.org. 2012. Retrieved 2 July 2012. Chodaganga Deva (1078-1150), the greatest of the Ganga kings, built a new temple on the ruins of the old one