पुरंदर किल्ला
पुरंदरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ असलेला एक किल्ला आहे़.
पुरंदर | |
पुरंदर | |
गुणक | 18°10′N 73°35′E / 18.17°N 73.59°E |
नाव | पुरंदर |
उंची | १५०० मी. |
प्रकार | गिरिदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | सासवड |
डोंगररांग | सह्याद्री |
सध्याची अवस्था | |
स्थापना | १३५० |
सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून पूर्व दिशेकडे काही फाटे फुटले आहेत. त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे. तोच फाटा पूर्वेकडे अदमासे २४ किलोमीटर धावून भुलेश्वरजवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर आणि वज्रगड वसलेले आहेत. कात्रज घाट किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याच्या चौफेर माच्या आहेत. किल्ला पुण्याच्या आग्नेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे. तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे.
पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.[१]
किल्ल्याची रचना
दोन भागांमध्ये विभागलेला आहे,
माची: हा किल्ल्याचा खालचा भाग आहे आणि येथे अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, जसे की पुरंद्रेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर आणि दिल्ली दरवाजा.
बालेकिल्ला: हा किल्ल्याचा वरचा भाग आहे आणि येथे अनेक बुरुज आणि तटबंदी आहेत.
इतिहास
पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इन्द्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे 'इंद्रनील पर्वत'. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बीदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी नीलकंठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेन्दऱ्या बुरूज बांधतांना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बाहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी नीलकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १४ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरवर झाला.
पुरंदरचा तह
शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंहाने पुरंदरला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरीमध्ये असे आढळते. तेव्हा पुरंदरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी प्रभू म्हणून होता. त्याजबरोबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठाण पाच हजार याखेरीज बैईल वगैरे लोक ऐशी गडास चौतरफा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धूरन्धर युद्ध जहले. मावळे लोकांनी व खासां मुरारबाजी यानी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.' मुरारबाजी देशपांडेचे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला,'अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावाजितो.' ऐसे बोलीता मुरारबाजी बोलिला, 'तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?' म्हणोनि नीट खानावरी चालिला. खानावरी तलवारीचा वार करावा तो खानने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, 'असा शिपाई खुदाने पैदा केला.' दिलेरखानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहासप्रसिद्ध 'पुरंदरचा तह' झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,
- पुरंदर
- रुद्रमाळ
- कोंढाणा
- रोहिडा
- लोहगड
- विसापूर
- तुंग
- तिकोना
- प्रबळगड
- माहुली
- मनरंजन
- कोहोज
- कर्नाळा
- सोनगड
- पळसगड
- भण्डारगड
- नरदुर्ग
- मार्गगड
- वसन्तगड
- नंगगड
- अंकोला
- खिरदुर्ग (सागरगड)
- मानगड
८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव 'आजमगड' ठेवले. पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.
- बिनी दरवाजा: पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. नारायणपूर गावातून किल्ल्यावर जाताना हा दरवाजा लागतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. समोरच पुरंदरचा खन्दकडा आपले लक्ष वेधून घेतो. आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते. त्याचे नाव 'पुरंदरेश्वर'.
- पुरंदरेश्वर मन्दिर: हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे. हे साधारणपणे हेमाडपंथी धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
- रामेश्वर मन्दिर: पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील कोपऱ्यात पेशवे वंशाचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशव्याच्या दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथने तो वाडा बांधला होता. या वाड्याच्या मागे विहीर आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. बालेकिल्ल्याच्या दिशेने वर गेल्यावर १५ मिनिटातच माणूस दिल्ली दरवाजापाशी येतो.
- दिल्ली दरवाजा: हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. आत गेल्यावर उजवीकडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात.
- खन्दकडा: दिल्ली दरवज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो. हाच तो खन्दकडा. या कड्याच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. या वाटेतच आजूबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अम्बरखान्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाड्याचे अवशेष दिसतात. वाटेवर पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जाताना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेने गेल्यावर केदार दरवाजा लागतो.
- पद्मावती तळे: मुरारबाजींच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.
- शेन्दऱ्या बुरूज: पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे. त्याचे नाव शेन्दऱ्या बुरूज.
- केदारेश्वर: केदार दरवाजा पाहून मूळ वाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायऱ्या लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्वर. या केदारेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबन्दी आहे. केदारेश्वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युच्च भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्वर, रोहिडा, मल्हारगड, कऱ्हेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे.
- पुरंदर माची: आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणाऱ्या वाटेने थेट पुढे यावे म्हणजे आपण माचीवरील भैरवखिंडीत जाऊन पोहोचतो. वाटेत वाड्याचे अनेक अवशेष दिसतात.
- भैरवगड: याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यन्त गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.
- वीर मुरारबाजी: बिनी दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
- पुण्याहून: पुण्याहून ३० कि. मी. अंतरावर असणाऱ्या सासवड या गावी यावे लागते.
- सासवडहून: सासवडहून सासवड - भोर किंवा सासवड नारायणपूर ही गाडी घेऊन नारायणपूर गावाच्या पुढे असणाऱ्या 'पुरंदर घाटमाथा' या थांब्यावर उतरतात. हा घाटमाथा म्हणजे पुरंदर किल्ला आणि समोर असणारा सूर्यपर्वत यामधील खिंड होय. या थांब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात. या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते. ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने पाऊण तासात पुरंदर माचीवरील बिनीदरवाजा गाठता येतो.
नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच गाडीरस्ता थेट किल्ल्यापर्यंत गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहेत. एक म्हणजे गाडीरस्ता. या रस्त्याने चालतचालत गड गाठण्यास २ तास पुरतात. तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या पायवाटेने एका तासात माणूस पुरंदर माचीवरच्या बिनी दरवाज्यापाशी पोहोचतो.
पुरंदर किल्ल्याचे महत्त्व
पुरंदर किल्ला हा मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा किल्ला होता. हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे. तसेच आज हा किल्ला एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो.
राहण्याची सोय
किल्ल्यावर मिलिटरीचे बंगले आहेत. यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी तेथे असणाऱ्या त्यांच्या अधिकाऱ्यांची अनुमती घेणे आवश्यक आहे. येथे जाताना कोणतेही ओळखपत्र घेऊन जावे (आधार कार्ड ,पॅन पत्र, मतदान ओळखपत्र इत्यादी)
जेवण्याची सोय
जेवण्याची सोय स्वतः करावी लागते. पिण्याचे पाणी मात्र नेहमी सोबत ठेवावे कारण केदारेश्वर मंदिरात पाण्याची सोय नाही. गडावर जेवण करण्यासाठी आपण केदारेश्वर मंदिराच्या आवारात बसू शकतो.
हे ठिकाण गडावरील सर्वात उंच असल्यामुळे इथे वातावरण खूप छान आहे. एकत्रित स्नेहभोजन करण्यासाठी आपण या ठिकाणी नक्की यायला हवे.
जाण्यासाठी लागणारा वेळ
गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून १ तास लागतो.
निष्कर्ष
पुरंदर किल्ला इतिहास, वास्तुकला आणि नैसर्गिक सौंदर्याचा संगम आहे. तसेच ट्रेकिंगसाठी आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. महाराष्ट्रातील गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा पुरंदर किल्ल्याला, प्रत्येकाने नक्कीच भेट देईला हवी.
बाह्य दुवे
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनन्द पाळन्दे
- दुर्गदर्शन - गो. नी. दाण्डेकर
- किल्ले - गो. नी. दाण्डेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दाण्डेकर
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
हे सुद्धा पहा
- भारतातील किल्ले
- महाराष्ट्रातील किल्ले
छायाचित्रे
- दरवाजा
- गडावरील जुने चर्च
- शिवाजी राजांचा पुतळा
- गडाच्या बालेकिल्ल्यावरील मंदिर
- किल्ले पुरंदर
- दरवाजा
- हनुमान मूर्ती