Jump to content

पुणे परिसरातील वृक्ष

स्थानिक वृक्ष

पुणे शहराच्या चारही बाजूंनी असलेल्या टेकड्यांमुळे पुणे शहराच्या जैवविविधतेत मोलाची भर पडली आहे. या टेकड्यांवर असणारे वृक्ष पुणे परिसरातील स्थानिक वृक्ष म्हणून गणले गेले पाहिजेत. कात्रज घाट, तळजाई, पाचगाव, पर्वती, वेताळ टेकडी, चतुशृंगी, दिवेघाट, रामटेकडी, गुलटेकडी यासारख्या टेकड्यांवर अनेक वृक्ष विपुल प्रमाणात आहेत. वेताळ टेकडीचे उदाहरण घ्यायचे झाले तर तिथे गणेर, मोई आणि सालई या स्थानिक वृक्षांचा समावेश असलेला एक गट आहे. या वृक्षांच्या सोबतच मेडशिंगी, हिवर, पांढरूख, बारतोंडी, पाचुंदा, पळस, पांगारा, सावर, वारस ही झाडेसुद्धा वेताळ टेकडीवर आहेत.

कात्रज डोंगरावरील वनस्पतींमध्ये वेताळ टेकडीवरील वनस्पतींच्या तुलनेत विविधता आहे. मोह, कांचन, टेंभुर्णी, बिब्बा, तिवस, वावळा, आपटा, धामण यासारखे वृक्ष कात्रज डोंगरावर आढळून येतात. ओहोळांच्या कडेला वाढरे उंबर, जांभूळ हे वृक्ष कात्रजला दिसू शकतात.

पुण्याच्या भोवती सिंह्गड भागात आर्द्र पानझडी झाडांचे अरण्य दिसून येते. या वैशिष्ट्यपूर्ण जंगलप्रकारामुळे तिथे असणारे वृक्षसुद्धा वेगळ्या प्रकारचे आहेत. ऐन, वारंग, एरिओलिना यासारखे इतरत्र न आढळ्णारे वृक्ष येथे दिसून येतात.

टेकडीवर आढळणारे कित्येक वृक्ष पुणे शहरात आणि परिसरात नैसर्गिकरीत्या वन्य अवस्थेत आढळून येतात. आज जरी अल्प प्रमाणात असले तरी मुठा नदीच्या कडेने वाढणारे करंज, वाळुंज, लेंडी जांभूळ, इतर वृक्षांपेक्षा वेगळेपणा राखून आहेत. पेशवेकालीन पुण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या काळातील बागा होय. बेलबाग, सीताफळबाग, हिराबाग यासारख्या बागा आज जरी नसल्या तरी या बागांमध्ये असणारे वृक्ष आजही त्या परिसरात आढळून येतात. पर्वतीच्या देवदेवेश्वर मंदिरात एक चाफ्याचा वृक्ष आपली मुळे घट्ट रोवून आहे. ब्रिटिश काळात विकसित झालेल्या अनेक बागांमध्ये जे काही स्थानिक वृक्ष जसेच्या तसे राखण्यात आले, ते आजही आपण पाहू शकतो. एम्प्रेस गार्डन, गणेशखिंड बाग, पुणे विद्यापीठ बाग ही काही या बागांची उदाहरणे.

परदेशी वृक्ष

पुण्यात शोभिवंत वृक्ष किंवा उपयोगाचे वृक्ष म्हणून काही परदेशी वृक्ष लावले आहेत. जगाच्या निरनिराळ्या भागांतून पुण्यातील वृक्षप्रेमींनी वृक्ष आणले आणि पुण्यात लावले. गुलमोहर, नीलमोहर, टबेबूया, काशिया, ताम्रवृक्ष किंवा पेल्टोफोरम, किलबिली, मणिमोहोर, श्वेतकांचन, कांचनराज, ब्रम्हदंड, खुरचाफ्याचे अनंत प्रकार, वांगीवृक्ष, आकाशनीम यासारखे शोभिवंत वृक्ष पुणे परिसरात लावण्यात आले. शहराच्या सुशोभीकरणासाठी हे वृक्ष पुण्यात आणण्यात आले व बागांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेने त्यांची लागवड करण्यात आली.

पुणे परिसरातील काही परदेशी वृक्ष वन विभागाने पुण्याजवळच्या टेकड्यांवर लावले. या वृक्षांमध्ये प्रामुख्याने सुबाभूळ, निलगिरी, Australian acacia यांचा समावेश होतो. ही लागवड प्रामुख्याने 'महाराष्ट्र वानिकी प्रकल्प' व 'हरित पुणे प्रकल्प' या अंतर्गत झाली. पण या परदेशी वृक्षांच्या अनियंत्रित वाढीमुळे टेकड्यांवर असलेले स्थानिक वृक्ष हळुहळू कमी होत आहेत.

शहरातील परदेशी वृक्षांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यांमध्ये असणारे एकांडे शिलेदार. पुणे विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र उद्यानात असलेले शेव्हिंग ब्रश ट्री, आघारकर संशोधन संस्थेत व गरवारे महाविद्यालयात असलेला हुरा क्रेपितान्स नावाचा वृक्ष, पौड रस्त्यावरचा चौरिसिया, बायफ़च्या आवारात असलेला बृहतपर्णी सात्विणीचा वृक्ष हे वानगीदाखल घेता येतील.

वृक्षांची जंत्री

पुण्याच्या भोवती सिंहगड भागात आर्द्र पानझडी झाडांचे अरण्य दिसून येते. या वैशिष्ट्यपूर्ण जंगलप्रकारामुळे तिथे असणारे वृक्षसुद्धा वेगळ्या प्रकारचे आहेत. ऐन, वारंग, एरिओलिना यासारखे इतरत्र न आढळ्णारे वृक्ष येथे दिसून येतात. पुण्यातील वृक्षांची जंत्री करण्याचे आणि त्यांच्या अभ्यासाचे काम डॉ. वा.द. वर्तक यांनी केले. "अर्बोरियल फ़्लोरा ऑफ़ पुणे कॉर्पोरेशन कॅंम्पस" या त्यांच्या शास्त्रीय अभ्यासलेखात पुण्यातील वृक्षांची तपशीलवार यादी मिळू शकते. डाॅ. विनया घाटे आणि डॉ. हेमा साने यांच्या "पुणे परिसरातील दुर्मीळ वृक्ष" या पर्यावरण शिक्षण केंद्राने प्रकाशित केलेल्या ग्रंथात पुण्यातील काही महत्त्वाच्या वृक्षांवर प्रकाश टाकला आहे.

पुणे शहर टपाल कार्यालयापासून २५ कि.मी. त्रिज्येच्या परिसरात साधारणपणे, सपुष्प वनस्पतींच्या १०००, फुलपाखरांच्या १०४, पक्षांच्या ३५० आणि सस्तन प्राण्यांच्या ६४ प्रजाती आढळतात.

वृक्षसंपदा

दिल्ली हे भारतातील सर्वाधिक वृक्षसंख्या असलेले महानगर आहे. त्याखालोखाल बंगलोर, कलकत्ता, नागपूर आणि पुणे यांचे क्रमांक लागतात. असे असले तरी, पुणे शहर हे भारतातील सर्वाधिक वृक्षविविधता असलेले महानगर आहे असे वृक्ष‍अभ्यासक श्री.द. महाजन यांचे मत त्यांनी २००५साली एका राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या निबंधात म्हणले होते. या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष देशी आहेत.

पुणे महानगरात १९९८साली केलेल्या वृक्षगणनेनुसार सुमारे ३३ लाख वृक्ष होते. त्यांची नावे अशी :-

देशी वृक्ष

अंकोळ, अंजन, अंजनी, अजानवृक्ष, अर्जुन, अशोक, आईन (ऐन), आपटा, आंबा, आवळा, उंडी (कॅलोफिलम इनोफिल्युम), औदुंबर, धेड उंबर, कडुनिंब (नीम-लिंबोणी), कढीलिंब, बकान नीम (बकाणा), महानीम, कदंब, कनकचंपा, करंज, मोठा करमळ, कवठ, कहांडळ, कळम (कळंब), काकड, कांचन, पिवळा कांचन, रक्तकांचन, श्वेतकांचन, काजरा, काटेसावर, किनई, काळा कुडा, पांढरा कुडा, कुंती, कुंभा, कुसुम (कुसुंब) किंवा कोशिंब, कोकम, खडशिंगी, खरवत, खिरणी, खेजडी म्हणजेच शमी (प्रोसोपिस सिनेरारिया), खैर, गणेर ऊर्फ सोनसावर, गरुडवेल, गुंज, रतनगुंज, गेळा, गोळ, घटबोर, चंदन, चंदनचारोळी, चारोळी, चाफा, नागचाफा, सोनचाफा, चिंच, चिचवा, चीड (सरल किंवा पाईन - पायनस एक्सेलसा), जांभूळ, जायफळ, टेटू, टेमरू, टोकफळ, डलमारा, ताड, तांबट, तामण, दहीवण, दालचिनी, देवदार, धामण, धावडा, महाधावडा, रेशीम धावडा, नाणा, नांद्रुक (नांदुरकी), निरगुडी, नेपती, पळस, काळा पळस (तिवस किंवा रथद्रुम), पांगारा, बूच पांगारा, रानपांगारा, पाचुंदा, पाडळ, पायर, पारिजातक, पिंपळ, परस पिंपळ, पुत्रंजीव, पेटरा, पेटारी, पोलकी, फणस, फणशी, फालसा, बकुळ, जंगली बदाम, बहावा, बाभूळ, दुरंगी बाभूळ, बारतोंडी, बिब्बा, बीजा, बुरगुंड, बुरास, बूच, बेल, बेहडा, बोर, भुत्या, भूर्जपत्र, भेरा, भोकर, भोमा, माड, भेरली माड, मारवा, मुचकुंद, मेडशिंगी, मोई, मोखा, मोह, दक्षिण मोह, रबराचे झाड, रिठा, रुद्राक्ष, रोजवुड (शीशम-शिसवीचे झाड), रोहितक, लकूच, वड, वानवृक्ष, वायवर्ण, वारंग, पिवळा वारस, वावळ, वाळुंज (सावरकर स्मारकाजवळ असलेले हे झाड एकमेव आहे), शिवण, शिरीष, काळा शिरीष, संदन, साग, सालई, सुकाणू, सुपारी, सुरंगी, सोनसावर ऊर्फ गणेर (कोच्लोस्पेरम रेलिजियोसम), हिंगणबेट, हिरडा, हिवर, हुंब, वगैरे.

परदेशी वृक्ष

अगस्ता (हादगा), अनंत (केप जॅस्मिन), ट्री ॲंटिगोनान, रोज ॲपल (जाम), स्टार ॲपल, अंब्रेला ट्री, खोटा अशोक (पानाचा अशोक, मास्ट ट्री), ऑंकोबा, ऑर्किड ट्री (बटरफ्लाय फ्लॉवर), हॉंगकॉंग ऑर्किड ट्री, ब्राझिलियन आयर्नवुड, ऑलिव्ह, ऑस्ट्रेलियन चेस्टनट (न्यू इंग्लिश स्कूल समोर पंताच्या गोटात हे दुर्मीळ झाड आहे), मोगली एरंड (जट्रोफा), सिल्व्हर ओक, ऊर्वशी (ॲमहर्स्टिया नोबिलिस), कॅंडल ट्री, कण्हेर, पिवळा कण्हेर (बिट्टी), कॅंपेची ट्री (लॉगवुड), कमरक (करंबोला), कॅशियाच्या अनेक जाती, गुलाबी कॅशिया, रेड कॅशिया, काशीद (सयामी कॅशिया), कॉपर पॉड ट्री, इंडियन कॉर्क ट्री, स्कार्लेट कॉर्डिया, कॉलव्हिल्स ग्लोरी, काशीद (सयामी कॅशिया), कैलासपती (कॅननबॉल ट्री), कनांगा (यांग यांग), क्रेप मिर्टल, क्लुसिया (फॅट पोर्क ट्री), ख्रिसमस ट्री (ऑराकरिया), गमग्वायकम (लिग्नम व्हिटी), गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया), गुजबेरी ट्री, गोल्डन बेल (पिवळा टॅबुबिया), पांढरा चाफा (डेडमॅन्स प्लॉवर, टेंपल ट्री), कवठी चाफा, तांबडा चाफा (रेड फ्लॅंगिपनी), गोरखचिंच (बाओबाब), विलायती चिंच (इमली), चेंडूफळ (पार्किया), सिंगापूर चेरी, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, जॅक्विनिया, जाम, टॅबुबियाच्या अनेक जाती, टॅबुबिया ॲव्हेलेनेडी, पिवळा टॅबुबिया (गोल्डन बेल), टिकोमा, आफ्रिकन ट्युलिप ट्री (स्पॅथोडिया), रोझी ट्रंपेट ट्री, ट्रॅव्हेलर्स ट्री, डॉंबेया (वेडिंग प्लॅंट), डेडमॅन्स फ्लॉवर (टेंपल ट्री, पांढरा चाफा), ड्रासिना, तुती (मलबेरी), तुमा (मिलेशिया), जेरुसलेम थॉर्न, दिवी दिवी, निलगिरी (युकॅलिप्टस), पर्जन्यवृक्ष (रेन ट्री), ब्लॅक पर्ल, पामच्या अनेक जाती, अरेका पाम, चायनीज फॅन पाम, रॉयल पाम (बॉटल पाम), पावडरपफ, नीरफणस (ब्रेड फ्रूट ट्री), फिडल लीफ फ़िग, फिडल वुड ट्री, फ्लॉस सिल्क ट्री, बूच, तेल्पा माड (ऑइल पाम), गुलमोहर (फ्लॅंबॉयंट ट्री), नीलमोहर (जॅकारंडा), ताम्रवृक्ष किंवा पीतमोहर (पेल्ट्रोफोरम), बटर फ्रूट ट्री (ॲव्होकॅडो), खोटा बदाम, बरसेरा (अत्तराचे झाड-लव्हेंडर ट्री), बिलिंबी, बिट्टी (पिवळा कण्हेर), बेगर्स बाऊल, बॉटल ब्रश, ऑस्ट्रेलियन बाभूळ, ब्रह्मदंड (सॉसेज ट्री), ब्लडवुड ट्री, ब्राउनिया, भद्राक्ष (गाउझुमा), मलबेरी (तुती), पेपर मलबेरी, महोगनी, आफ्रिकन महोगनी, मारखामिया, मोरपंखी (थूजा), राय‍आवळा, चेंजेबल रोज ट्री, लक्ष्मीतरू (सायमारुबा), शंबुकोश (सांबुकस), शेर (मिल्क बुश), संकासुर (शंखासुर, पीकॉक फ्लॉवर ट्री), मोठी सातवीण, गुलाबी सावर (शेविंग ब्रश ट्री), दिल्ली सावर, पांढरी सावर (कपोक), सॉसेज ट्री (ब्रह्मदंड), सुरू (कॅश्युरिना, खडसावर), सुबाभूळ (हॉर्स टॅमेरिंड, लुकेना), स्पॅथोडिया (आफ्रिकन ट्युलिप ट्री), हुरा (सॅंडबॉक्स ट्री), वगैरे.

वृक्षराजीमध्ये बदलाची कारणे

  1. शहरीकरण व त्यापायी झालेली जंगलतोड
  2. रस्ते रुंदीकरणामुळे झालेली वृक्षतोड
  3. डोंगर उतारांवर परदेशी वृक्षांचे वाढते प्रमाण
  4. घरे व झोपड्यांसाठी वृक्षतोड
  5. वाढते जलप्रदूषण- त्यापायी नदीकाठच्या वृक्षांचे घटते प्रमाण

पुणे परिसरातील वृक्षराजीचा अभ्यास करणाऱ्या संस्था

  1. भारतीय वनस्पती सर्वेक्षण (Botanical Survey of India)
  2. आघारकर संशोधन संस्था (Agharkar Research Institute)
  3. पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभाग
  4. महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी
  5. कल्पवृक्ष
  6. आयकॉस फॉर इकोलोजिकल सर्व्हिसेस (ICOS- Integrated Carbon Observation System)
  7. टेकडी.

पुणे परिसरातील वृक्षराजीच्या अभ्यासासंदर्भातले महत्त्वाचे प्रकल्प

  1. स्म्रृतिवन (निसर्गसेवक)
  2. स्म्रृतिउद्यान (निसर्गसेवक)
  3. सिपना
  4. पाम उद्यान (प्रस्तावित)

पुणे परिसरातील वृक्षशाळा (Herbarium)

  1. भारतीय वनस्पती सर्वेक्षण (Botanical Survey of India)
  2. आघारकर संशोधन संस्था (Agharkar Research Institute)
  3. वर्तक हर्बेरियम
  4. वनस्पतिशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ.