Jump to content

पाताळेश्वर (पुणे)

पुण्यातील पाताळेश्वर मंदिर

पाताळेश्वर हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागात वसलेले एक शिवालय आहे. हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीचा सहावा राजा पहिला अमोघवर्ष (इ.स ८१४ - ८७८) याने त्याच्या काळात इ.स.च्या ८ व्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले आहे. राष्ट्र कुटांच्या काळात पुणे हे पुण्यविषय किंवा पूनकविषय (विषय म्हणजे जिल्हा) म्हणून प्रसिद्ध होते. राष्ट्रकूट राजा कृष्ण (पहिला) याच्या कारकिर्दीत दिलेल्या ताम्रपटात ही नावे आढळतात.

पाताळेश्वर हे लेणे जमिनीव्या खाली जमीन खोदून बांधण्यात आले आहे. पाताळेश्वर आणि वेरूळमधील राष्ट्रकूट कालखंडातील लेणी यांत साम्य आढळते. त्या एकाच परंपरेतील ही लेणी असावीत. पाताळश्वर लेण्याला मोठे प्रांगण आहे. प्रांगणाच्या मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप आहे. या नंदीमंडपाचे छत प्रचंड मोठे, जाड व वर्तुळाकार कातळाचे आहे. हा कातळ स्तंभांनी पेलला आहे. त्याच्याआत आणखी एक वर्तुळ आहे, त्यावर नंतरच्या काळात ठेवण्यात आलेला एक नंदी आहे.

लेण्यात प्रवेश केल्यावर चौकोनी स्तंभांच्या रांगा आहेत. समोर तीन गर्भगृहे आहेत. मधल्या गर्भगृहात शिवलिंग आहे. त्याच्या द्वारशाखांवर, म्हणजे गर्भगृहाच्या दरवाज्याजवळ नक्षी कोरली आहे. येथे प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहामागील भाग हा पुढील भागापेक्षा लहान आहे. मागच्या भिंतीला लागून काही भागांत कट्ट्याचे काम पूर्ण झालेले आढळते. एका भागातील काम अर्धवट आहे.तेव्हा लेणी खशी खोदत असतील, पुढे कसे जात असतील ते लक्षात येते.

गर्भगृहाव्या डाव्या आणि उजव्या हाताच्या भिंतींवर जी शिल्पे दिसतात ती पूर्णपणे खराब झाली आहेत, किंवा त्यांचे काम अपुरे राहिले आहे. त्या शिल्पांतील एक लिंगोद्भव शिवाचे आणि एक त्रिपुरासुर वधाचे आहे. लेण्याच्या बाहेरील भिंतीवर एक झिजल्यामुळे न वाचता येणारा शिलालेख आहे.

पेशवे काळात या मंदिराची नोंद आहे आणि मंदिराला दक्षिणा दिल्याचे उल्लेख आहेत.

भारत सरकारने पाताळेश्वर लेण्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ च्या ब्रिटिश सूचनापत्राला अनुसरून महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[] याच्या जवळून जंगली महाराज रस्ता वाहतो. हे पाताळेश्वरचे मंदिर एकाच मोठ्या खडकात खोदकाम करून निर्माण केले आहे. ह्या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण, लक्ष्मी आणि गणेश ह्या दैवतांच्याही मूर्ती आहेत. त्या अर्थातच नंतर कुणीतरी ठेवल्या आहेत.

चित्रदालन

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "पुणे डिस्ट्रिक्ट, इन्व्हेन्टरी ऑफ मॉन्युमेन्ट्स" (इंग्रजी भाषेत). 2013-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ ऑक्टोबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

2. पुण्यातील पाताळेश्वर मंदिराचा इतिहास Archived 2020-08-24 at the Wayback Machine.