पांढरा कुडा
वनस्पतीशास्त्रीय नाव: १.Holarrhena pubescence Wall. २. Holarrhena antidysenterica
कुळ: करवीर कूळ (Apocynaceae)
नाम:- (सं.) कुटज; (हिं.) कुरेया; (बं.) कुर्ची; (काश्मिरी) कोर; (गु.) कडो; (ता)कुटचप्पालै; (ते.) काककोडिसे; (क.) कोरिसिगिन; (इं.) Conessi.
वर्णन
पांढऱ्या कुड्याचे झुडुप किंवा लहान वृक्ष असतो. ही झुडुपे कोंकणात पुष्कळ असतात. यांस पांढऱ्या फुलांचे घोस येतात. फळ सुमारे हातभर लांब व बारीक शेंग असते. शेंगा जोडीने येतात, पण घोस नसतात. साल करड्या रंगाची व पोचट; मूळ वेडेवाकडे, खडबडीत व उदी रंगाचे, बिया जवासारख्या. पांढऱ्या कुड्याच्या बियांस कडवा इंद्रजव म्हणतात. बियांची चव कडू व जरा तुरट. औषधांत मुळाची साल व बिया वापरतात.
रसशास्त्र
पांढऱ्या कुड्याच्या सालींत एक फार कडू द्रव्य आहे. ते गुळवेलीच्या सत्त्वाप्रमाणे जमविता येते. हे पिठासारखे असून क्षारधर्मी आहे. हे अल्कोहोलमध्ये व पाण्यात सहज मिसळते. परंतु पाण्यात जरासे अम्लद्रव्य असल्यास विशेष मिसळते. बियांत तेल व एक कणीदार कडू द्रव्य आहे.
धर्म
कुड्याची साल कोयनेलप्रमाणे कडू असते. ती दीपक, स्तंभक, वारंवार येणाऱ्या तापाला प्रतिबंध करणारी, व ताकद देणारी आहे.. बिया वायुहर असून, स्तंभक आणि ज्वरघ्नही आहेत. सालींत आणि बियांत रक्तसंग्राहक आणि वेदनाशामक आहेत. बिया भाजल्याने त्यांतील संग्राहक गुण वाढतो.
उपयोग
- कुडा हे एक अत्युत्तम औषध आहे. रक्ताची आव झाली असल्यास ह्याच्या मुळ्यांच्या सालीच्या तोडीचे दुसरे औषध नाही.
- कडू इंद्रजवाचे चूर्ण चिमटीभर रोज खाल्यास क्षुधा वाढते, अन्न जिरते, पोटात वायू धरत नाही व जंत असल्यास पडतात. ह्याच्या कोवळ्या शेंगांची भाजी खाण्यास देतात, त्यामुळे जंत असले तर पडतात.
- पोटात बेंबीच्या आसपास जमा झालेला वायू व पोटशूळ यांसाठी इंद्रजव फार उत्तम औषध आहे. कुपचन रोगांत भाजलेल्या इंद्रजवाच्या काढ्याने उलटी बंद होते.
- दात दुखत असल्यास सालीच्या गरम गरम काढ्याने गुळण्या करतात. हिरड्यातून रक्त वाहणे व दांताच्या भोवती पू होऊन मुखाला दुर्गंधी येणे ह्या रोगांत इंद्रजवाचे चूर्ण हिरड्यावर चोळतात.
- जुनाट फुप्फुसाच्या रोगांत व दम्यांत इंद्रजव देतात. कुड्याच्या जून पानाच्या विड्या ओढल्यास किंवा इंद्रजव रोज खात राहिल्यास हिवताप येत नाही.
- इंद्रजवाच्या फांटाने मुळव्याधीत रक्त वाहणे बंद होते.
- यापासून बनविण्यात येणारे कुटजारिष्ट हे प्रभावी औषध आहे.
- उन्हाळ्यात कुड्याची फुले सुकवून ठेवून त्याची भाजी करतात.
संदर्भ
औषधीसंग्रह- डॉ. वा.ग.देसाई