पांगारा
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यास नाजुक, सुन्दर लाल फुले येतात. पांगारा पर्णसंभार असल्यावर हिरवी शाल पांघरल्यागत वाटणारा हा वृक्ष. वृक्ष आपल्या हिशेबी जरी हा फारसा महत्त्वाचा नसला तरी त्याच्या सर्व अंगोपांगाच्या उपयुक्ततेचा विचार केला तर याचे महत्त्व पटते. पर्णसंभार नसताना येणारी लाल सॅटीनसारखी फुले मिरवणारा उघडा-बोडका पांगारा एखाद्या उघड्या अंगाच्या, कपाळावर लाल मळवट भरलेल्या पोतराजासारखा वाटतो. ही लाल फुले फुलपाखरे, पक्षी यांना आपल्याकडील मधामुळे आकर्षून घेतात आणि या पोतराजाचा खेळ पाहायला आपणही नकळत क्षणभर त्याच्यासन्निध थांबतोच थांबतो. पांगारा हा उष्ण प्रदेशातील वनामध्ये आढळणारा वृक्ष आहे. आपल्याकडे पांगारा जंगलात खडकातला, शहरातील बागेमध्ये, शेताच्या कुपणाला लावतात. चहाच्या मळ्याला सावलीसाठी लावलेला असतो. या वृक्षाचा प्रसार पश्चिम द्वीपकल्प भागातील कोकण व उत्तर कारवार येथील पानझडी व मिश्र जंगलात विशेषकरून आहे. पांगाऱ्याचा प्रवास तसा निसर्गातच होतो. पक्षी भुंगे फुलातील मध घेताना परागीकरण करतात. त्यातून धरलेल्या शेंगांमधील बी पडूनही रोपे होतात. पांगारा फांद्या लावूनही जगतो. पांगारा याच्यावर एकही पान नसताना लाल मनमोहक फुलांनी बहरतो. याच्या फुलांना गंध नसला तरी आपल्या मनाला त्याचा रंग मोहिनी घालतो. फेब्रुवारी ते एप्रिल या काळात पांगाऱ्याला फुले येतात. फुलांचा लाल रंग आणि मखमली वाटणाऱ्या पाकळ्या कुणालाही आपल्याकडे पाहायला लावतात. अंगावर जरी काटे असली तरी या ५०-६० फुट उंच वृक्षाच्या पानाच्या हिरवाईने त्याचा फुलाच्या लाल रंगाने आसमंत रसरसून उठतो. पांगाऱ्याला फार महत्त्वाचे स्थान आहे. याची साल तसेच पाने औषधी गुणधर्मयुक्त आहेत. विहीर बांधताना विहिराच्या पायाच्या घोळभागाला पांगाऱ्याची फळी वर्तुळाकार बसवतात. सालीतील धाग्यापासून दोर बनवतात. अशा पद्धतीने पांगारा हा अत्यंत महत्त्वाचा वृक्ष आहे. पांगारा हा उष्ण अग्निदीपक व कफ–कृमी-मेद नाशक आहे
हे सुद्धा पहा
संदर्भ
वृक्षराजी मुंबईची