Jump to content

न्यू इंग्लिश स्कूल (पुणे)

न्यू इंग्लिश स्कूल ही पुणे येथील एक नामवंत शाळा आहे.

न्यू इंग्लिश स्कूल

लोकमान्य टिळक , गोपाळ गणेश आगरकर , वामन शिवराम आपटे तसेच त्यांचे मित्र महादेव बल्लाळ नामजोशी आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी १ जानेवारी, इ.स. १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. शालेय शिक्षण जितके स्वस्त करता येईल तितके स्वस्त करण्याचा संस्थापकांचा उद्देश होता. पण तसे करतांना शाळेचा दर्जा ढासळणार नाही याचीपण काळजी संस्थापकांनी घेतली. न्यू इंग्लिश स्कूल तत्काळ प्रसिद्ध झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पालक आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवू लागले. १८८०-१८८६ दरम्यानची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळाली.[]न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा अनेक वर्षे पुण्यातील कसबा पेठ आणि बुधवार पेठ यांच्या सरहद्दीवर असलेल्या नाना हौदासमोरच्या नाना फडणिसांच्या वाड्यात भरत असे. शेजारील वसंत टॉकीजमध्ये चालू असणाऱ्या चित्रपटांच्या आवाजाचा गोंधळ वाढू लागल्याने ही शाळा पुण्यातील टिळक रस्त्यावरील न्यू ग्राउंड येथे नेली गेली, तिथेच ती सध्या आहे. ही शाळा डेक्कन एज्युकेशन सोसायटी चालवते. याच सोसायटीच्या पुण्यात नवीन मराठी शाळा, न्यू इंग्लिश स्कूल(रमणबाग), अहिल्यादेवी हायस्कूल, बृहन्महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज आणि फर्ग्युसन कॉलेज या संस्था आहेत.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट ॲन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: द.वि. ताम्हणकर; पृष्ठ २४