नोबेल पारितोषिक
नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला.दरवर्षी १० डिसेंबर रोजी हा पुरस्कार दिला जातो.१९४० ते १९४२ पर्यंत दुसऱ्या महायुद्धामुळे हा पुरस्कार खंडित करण्यात आला होता.
डिसेंबर २०२०्पर्यंत यंत एकूण ९२९ व्यक्तींना आणि २५ संस्थांना एकूण ९५४ नोबेल पारितोषिके देण्यात आली आहेत.
इ.स. १९६९ पासून आल्फ्रेड नोबेल याच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने (रिक्स बँकेने) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
नोबेल याच्या मृत्युपत्रातील तरतुदी
आल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूनंतर इ.स. १८९७ साली त्याचे मृत्युपत्र उघडून पाहण्यात आले व चार वर्षांनंतर ते कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. या मृत्युपत्रानुसार त्याने कमावलेल्या अमाप संपत्तीचा मोठा हिस्सा (३.१ कोटी स्वीडिश क्रोनार) नोबेल निधीसाठी ठेवलेला होता. हा निधी सुरक्षित ठेवींमध्ये गुंतवून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ६० ते ७० टक्के रकमेचे पाच सारखे भाग करून प्रत्येक क्षेत्रातील पारितोषिकासाठी देण्याचे आल्फ्रेडने आपल्या मृत्युपत्रात सुचविले होते.
या मृ्त्युपत्रामध्ये कोणकोणत्या कार्यक्षेत्रात व कोणकोणत्या निकषांवर पारखून पारितोषिके द्यावीत याचेही त्याने विवेचन करून ठेवले होते. त्यासाठी आवश्यक ते स्पष्टीकरण करणारे नियम व प्रशासकीय तपशील हे मृत्युपत्राचे विश्वस्त, पारितोषिके देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी व नोबेल यांचे कुटुंबीय यांनी चर्चा करून तयार केले व स्वीडनच्या राजाने याला इ.स. १९०० साली मान्यता दिली.
आल्फ्रेड नोबेलच्या मृत्युपत्रान्वये -
- भौतिकी, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र यांतील पारितोषिके देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसकडे,
- वैद्यकशास्त्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार द रॉयल कॅरोलिन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे,
- साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार द स्वीडिश ॲकॅडमी आणि
- शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टिंग) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी या चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत.
पारितोषिकासंबंधीचा निर्णय घेण्याचे व तो जाहीर करण्याचे काम या संस्था करतात. पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या मदतीसाठी तीन ते पाच सदस्यांची समिती असते. या समित्या जरूर वाटल्यास इतर तज्ज्ञांनाही चर्चेसाठी बोलावू शकतात. पारितोषिकासाठी सुचविण्यात आलेल्या उमेदवाराच्या कार्याचे मूल्यमापन करून या समित्या आपला निर्णय देतात, पण हा निर्णय मानणे संस्थांवर बंधनकारक नसते.
मृत्युपत्रातील तरतुदीनुसार नोबेल प्रतिष्ठान स्थापण्यात आले असून ही संस्था नोबेल निधीची कायदेशीर मालक आहे. वरील चार संस्थांच्या सहकार्याने ही संस्था सर्व प्रशासकीय कामे संयुक्तपणे पाहते. इतर सर्व नोबेल संस्था प्रतिष्ठानच्या नियंत्रणाखाली आहेत मात्र पारितोषिकांच्या निवाड्याशी आणि त्यासंबंधीच्या कार्याशी प्रतिष्ठानचा काहीही संबंध नसतो.
नामांकन
कायदेशीरपणे नमूद केलेल्या व पारितोषिके देणाऱ्या संस्थांनी नेमून दिलेल्या व्यक्तीच पारितोषिकांसाठी उमेदवारांची नावे सुचवू शकतात. स्वतःच आपले नाव सुचविल्यास ती व्यक्ती आपोआपच पारितोषिकासाठी अपात्र ठरते.
उमेदवारांची नावे सुचविण्यासाठी पुढील व्यक्ती पात्र असतात.
- आधीचे नोबेल पारितोषिक विजेते.
- पारितोषिके देणाऱ्या संस्थांचे सभासद.
- काही विशिष्ट विद्यापीठांचे आणि महाविद्यालयांचे तसेच पारितोषिके देणाऱ्या संस्थांनी खास निमंत्रित केलेले त्या त्या क्षेत्रातील प्राध्यापक.
- साहित्याच्या पारितोषिकासाठी लेखकांच्या काही प्रातिनिधिक संघटनांचे सभासद.
- द स्वीडिश अकॅडमीशी तुल्य अशा संस्थांचे सभासद.
- शांततेच्या पारितोषिकासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या काही संसदीय व इतर संस्थांचे सभासद उमेदवारांची शिफारस करू शकतात.
- उमेदवारांच्या नावाची शिफारस केवळ व्यक्तीलाच करता येते संस्थेला नाही, मात्र अनेक पात्र व्यक्ती संयुक्तपणे शिफारस करू शकतात.
पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडून पात्र व्यक्तींना नावे सुचविण्याविषयी विनंतीपत्रे पाठविली जातात. त्यांनी संबंधित कागदपत्रांसह आपल्या शिफारशी १ फेब्रुवारीच्या आत पाठवायच्या असतात. १ फेब्रुवारीपासून नोबेल समित्यांचे काम सुरू होते व सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये समित्या आपल्या शिफारशी पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडे पाठवितात. या संस्था १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम निर्णय जाहीर करतात. नावे सुचविली जाण्यापासून ते अंतिम निर्णयापर्यंत होणारे वादविवाद, चर्चा, मतदान इत्यादी बाबतीत गुप्तता राखली जाते. नोबेल पारितोषिकांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागता येत नाही.
नामांकन आणि प्रदान प्रक्रिया
साधारणतः ३००० लोक पुरस्कारासाठी नामांकने पाठवतात. त्यापैकी नोबेल समिती ठरावीक नामांकने निवडते.
नोबेल पुरस्कार नाकारणाऱ्या व्यक्ती
- त्यांच्या सरकारतर्फे हा पुरस्कार नाकारण्याचे आवाहन करण्यात आल्यामुळे चार व्यक्तींनी हा पुरस्कार नाकारला. यापैकी तीन जर्मन (हिटलरमुळे), तर चौथी व्यक्ती रशियन लेखक बोरीस पास्तेर्नाक (साहित्यातील नोबेल) याने सरकार सूड उगवेल या भीतीपोटी हा पुरस्कार नाकारला.[१]
- उत्तर व्हियेतनामच्या लु डक थो याने (शांततेचे नोबेल) शांतता प्रस्थापित न झाल्यामुळे नाकारले.[२]
पुस्तके
- नोबेल साहित्यिक (संजीवनी खेर) - नोबेल पुरस्कारप्राप्त साहित्यिकांबद्दल लोकसत्तेत आणि इतर नियतकालिकांमध्ये लिहिलेल्या लेखांचे संकलन. ग्रंथाली प्रकाशन.
- नोबेलनगरीतील नवलस्वप्ने : नोबेल पुरस्कार्थींच्या शोधांची माहिती (सुधीर व नंदिनी थत्ते)
हे सुद्धा पहा
- देशानुसार नोबेल पारितोषिकविजेते
बाह्य दुवे
- पुरस्काराचे अधिकृत संकेतस्थळ
- नोबेल समिती Archived 2013-10-13 at the Wayback Machine.
- पुरस्कारांची संपूर्ण यादी