Jump to content

नृसिंह

नृसिंह

नृसिंहावताराचे शिल्प
या अवताराची मुख्य देवताविष्णू
बंगलोर संग्रहालय येथील नृसिंह मूर्ती

नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.[] या दिवसाला नृसिंह जयंती असे संबोधिले जाते.[]

आख्यायिका

12th-century Visnu avatar Narasimha killing demon Hiranyakashipu at Shaivism Hindu temple Hoysaleswara arts Halebidu Karnataka India

हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू (याला हिरण्यकश्यपू असेही म्हणतात.) हे दोघे (दानव) भाऊ होते. त्यांच्या क्रूरतेमुळे सर्व देवता व पृथ्वीवरील सर्व जीव त्रासून गेले होते. पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंनी हिरण्याक्षाचा वराह अवतार (दशावतारांपैकी तिसरा अवतार) घेऊन वध केला. आपल्या प्रिय लहान भावाचा वध झालेला पाहून हिरण्यकश्यपू अत्यंत संतापला. त्याने सर्व दानवांना आज्ञा केली की तुम्ही पृथ्वीवर जा आणि जो जो दान, तप, यज्ञ यांद्वारे विष्णूची आराधना करेल त्याचा नाश करा. यज्ञ व अनुष्टान यामुळे देवांना शक्ती प्राप्त होते म्हणून जेथे ब्राह्मण किंवा ऋषी अशी कर्मे करीत असतील तेथे जाऊन तुम्ही ती कामे नष्ट करा. हिरण्यकश्यपूने प्रतिप्रभू होण्याचा निश्चय केला. त्याने केलेल्या तपामुळे ब्रह्मदेव प्रंन झाले व त्याच्या भेटीसाठी गेले.त्याने ब्रह्मदेवांना नमस्कार केला, व म्हणाला, ‘ हे भगवन, तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री,ना शस्त्रानेना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे." ब्रह्मदेवांनी त्याला हे सर्व प्रदान केले. या वराच्या सामर्थ्याने हिरण्यकश्यपूने सर्वांवर विजय प्राप्त केला, राजे, गंधर्व, गरुड, नाग, ऋषी, भुते-प्रेते, या सर्वाना पराजयी करून अधिपती पद प्राप्त केले. हिरण्यकश्यपूला प्रल्हाद (हिरण्यकशिपू व पत्नी कयाधू यांचा पुत्र) नावाचा अत्यंत तेजस्वी, शांत व शीलसंपन्न असा सर्वगुणसंपन्न पुत्र झाला. आपल्या सर्व भावंडांमध्ये लहान असलेला प्रल्हाद परम विष्णूभक्त होता. आपल्या वडिलांनी विष्णूंशी केलेले शत्रुत्व प्रल्हादाला मान्य नव्हते. आपल्या मुलाला अजून ज्ञान नाही त्यामुळे तो असे आचरण करत आहे असे मानून हिरण्यकशिपूने त्याला विद्यार्जनासाठी गुरूकडे पाठविले. पण ज्ञानदानात शिकविले गेलेले भेदभाव प्रल्हादास मान्य नव्हते. एकदा हिरण्यकशिपू प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसला होता, त्याने प्रल्हादाला प्रेमाने विचारले, तुला या जगात प्रिय काय आहे? हिरण्यकशिपूला वाटले की प्रल्हाद त्याचे नाव घेईल. पण प्रल्हाद त्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला, हे तात, मला विष्णूचे नामस्मरण करणे सर्वात प्रिय आहे. विष्णूचे कीर्तन, भजन, पूजन, या सर्व क्रियेत जीवन समर्पित करावे असे मला वाटते. तुम्हीसुद्धा त्या परम कृपाळू नारायणांना शरण जा. त्याचे हे उत्तर ऐकून हिरण्यकशिपू संतापला. त्याने प्रल्हादाला त्याच्या मांडीवरून ढकलून दिले. तुझ्या चुलत्याचा वध करणाऱ्या माझ्या परम शत्रूची तू स्तुती करतोस तुला जगण्याचा अधिकार नाही, मग तू माझा स्वतःचा पुत्र असला तरी तुला मृत्यूदंडच असेल. त्याने आपल्या मुलाला ठार करण्यासाठी विविध प्रयत्न केले परंतु सर्व प्रयत्‍न निष्फळ झालेले पाहून हिरण्यकशिपू क्रोधाने पेटून उठला व त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी प्रल्हादाला भर सभेत घेऊन येण्याची आज्ञा सेवकांना दिली. श्रीविष्णूचे नामस्मरण करत आलेला प्रल्हाद पाहून हिरण्यकशिपू संतापून उठला आणि प्रल्हादाला उद्देशून म्हणाला, हे उद्धटा, हे मंदबुद्धी, तुला मी यमसदनी पाठवितो. माझ्याहून वेगळा असा जगाचा नियंता तू सांगतोस, तो विष्णू कोठे आहे ? तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणाला की, हे ताता, हे सर्व जगच माझ्या नारायणाने व्यापले आहे, जळी स्थळी माझे विष्णू वास करत आहे. प्रल्हादाच्या या उत्तरावर क्रोधित होऊन हिरण्यकशिपू गरजला मग ह्या खांबामध्ये आहे का तुझा नारायण? प्रल्हाद म्हणाला, हो तर ह्या खांबातदेखील आहेत माझे नारायण, माझे श्री हरी. हे ऐकताच हिरण्यकशिपूने त्या खांबाजवळ उडी मारली त्याने आपली गदा उचलली आणि त्या खांबावर प्रहार करत म्हणाला, थांब आज तुझा आणि तुझ्या श्री हरीचा मी वध करतो. जसे त्याने गदेने खांबावर प्रहार केला तोच त्या खांबातून अति भयंकर आवाज उत्पन्न झाला. त्या खांबातून माणूस आणि सिंह असे मिश्र रूप हिराण्यकशिपूने पहिले. भगवान त्याच्या समोर येऊन उभे राहिले. श्री हरी विष्णूंनी घेतलेले हे रूप फारच भयानक होते, त्यांचे धड मनुष्याचे व तोंड सिहाचे होते, त्यांचे डोळे तापलेल्या सोन्याप्रमाणे लाल होते, त्यांच्या मानेवरील केस विजेप्रमाणे तळपत होते. त्यांच्या दाढा भयंकर होत्या, जिव्हा तलवारीप्रमाणे चंचल व तलवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण होती. चढविलेल्या भुवयांमुळे त्यांचे मुख उग्र दिसत होते, कान शंकूप्रमाणे ताठ उभारलेले होते, त्यांचे तोंड व नाकपुड्या पर्वताच्या गुहेप्रमाणे विस्तृत असून जबडा पसरल्यामुळे त्या भयंकर दिसत होत्या. त्यांचे मस्तक व वक्षस्थळ विशाल असून उदर कृश होते. चंद्रकिरणांप्रमाणे गौरवर्ण केस त्यांच्या अंगावर विखुरले होते. नखे जणू त्यांची आयुधे होती. त्यांच्याजवळ जाणे अशक्यच होते, तरीसुद्धा हिरण्यकश्यपूने त्या नरसिहाकडे धाव घेतली; परंतु अग्नीमध्ये पडलेला पतंग जसा दिसेनासा होतो तसा तो दैत्य निस्तेज झाला. नरसिहांनी त्याला गदेसह वर उचलले व संध्याकाळच्या वेळी दारामध्ये उंबऱ्यावर बसून त्याला आपल्या मांडीवर उताणा पाडून नखांनी त्याचे हृदय विदीर्ण केले. त्यांचे नेत्र क्रोधाने लाल झाल्यामुळे त्यांच्याकडे पाहणेही कठीण झाले. त्यांचे मानेवरील केस रक्ताने माखले होते.

हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर नृसिंहांनी त्याचे शरीर मांडीवरून फेकून दिले व आयुधे उचलणाऱ्या राक्षसांनाही त्यांनी ठार केले व ते स्वतःच सिंहासनावर जाऊन बसले.[] त्यांचे स्तवन करण्यास कोणी धजेना, देवांनी मात्र त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या व गंधर्व गायन करू लागले. नरसिंहांचा राग शांत करणे गरजेचे होते, रागाने तप्त झालेल्या नरसिंहांच्या मुखातून आग बाहेर पडू लागली, तेव्हा सर्वांनी प्रल्हादाला देवांना शांत करण्याची विनंती केली. प्रल्हाद नरसिंहांकडे गेला व त्याने देवाला साष्टांग नमस्कार केला, तेव्हा प्रत्यक्ष प्रभूने शांतपणे प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला. प्रल्हाद नरसिंहांची विनवणी करीत होता, हे प्रभू आता शांत व्हा. हे नृसिंहा, भयनिवृत्तीकरिता सर्व लोक ह्या नरसिंह अवताराचे स्मरण करतील. भक्त प्रल्हादाच्या प्रेमरूपी भक्तीने भगवान प्रसन्न झाले व देवी लक्ष्मी आणि डोक्यावर शेषनागासह त्यांनी त्यांच्या नरसिंह अवताराचे दर्शन दिले. नंतर प्रल्हादाला अनेक आशीर्वाद देऊन देव निघून गेले.[]


नरसिंह अवताराचे वैशिष्ट्य

हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागताना म्हणले होते की "तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री,ना शस्त्रानेना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे."

या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी (सूर्यास्ताच्या वेळी);. न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबऱ्यावर मृत्यू दिला.ना शस्त्रना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकशिपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला.[]

नृसिंह नवरात्र

नृसिंह जयंती उत्सव

नृसिंहाच्या सन्मानार्थ वैशाख शुक्ल षष्ठीपासून ते चतुर्दशीपर्यंत नृसिंहाचे नवरात्र साजरे होते. वैशाख शुक्ल चतुर्दशीला नृसिंह जयंती येते.[] नृसिंह जयंती या दिवशी संध्याकाळी नृसिंह जन्मोत्सव साजरा केला जातो. नृसिंह मंदिरात कीर्तन आयोजित केले जाते. भाविक कीर्तन आणि प्रसादाचा लाभ घेतात.

नरसिंह पुराण

नृसिंहाच्या कथेवर नरसिंह पुराण हे इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिले गेलेले एक उपपुराण आहे. या पुराणात ६८ अध्याय असून एकूण ३४६४ श्लोक आहेत. हे पुराण भगवान व्यासांनी लिहिले असे समजले जाते.[]

नृसिंहशिल्पे

नृसिंहाच्या मूर्ती भारतातील अनेक देवालयांत आहेत. त्यांपैकी काही देवालये ही :-

  • नृसिंहाची प्राचीन सिंहरूपातील प्रतिमा आंध्र प्रदेशातल्या गुंटूर जिल्ह्यातील कोंडामठ येथील एका शिल्पपटात आहे.
  • पुणे जिल्ह्यातील रांजणी गावात ब्रह्मे नावाच्या ब्राह्मणाच्या घरी नृसिंह केवळ चतुष्पाद सिंहाच्याच रूपात आहे.
  • परभणी जिल्ह्यातल्या पिंगळी येथे उडत्या गरुडाच्या पाठीवर बसलेला नृसिंह आहे.
  • वेरूळच्या १५ व १६व्या लेण्यांत नृसिंह-हिरण्यकश्यपू युद्धाचा प्रसंग दर्शविला आहे. तसेच शिल्प बीड जिल्ह्यातील धर्मपुरी येथील केदारेश्वराच्या देवळात आहे.
  • निरानरसिंहपूर - पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील भीमा-नीरा संगमाजवळच्या देवालयाच्या गाभाऱ्यात वीरासनातील नृसिंहाची द्विभुज मूर्ती आहे. डावीकडे लक्ष्मीचे स्वतंत्र देऊळ आहे.

निरानरसिंहपूर हे स्थान पुणे सहराच्या आग्नेय दिशेस असून पुणे जिल्ह्याचे ते शेवटचे टोक आहे.क्षेत्राच्या एका बाजूने निरा तर दुसऱ्या बाजूने भीमा नदी आणि तिसऱ्या बाजूस या उभयतांचा संगम आहे. तीन बाजूने पाणी व एका बाजूस जमीन असे हे रमणीय स्थान आहे. या क्षेत्राचा आकार सिंहाच्या नखासारखा आहे.

निरानरसिंहपूर येथील श्री नरसिंह हा महाराष्ट्र ,कर्नाटक आणि मध्य-प्रदेश यातील अनेक नरसिंह भक्तांचा कुलस्वामी आहे. ते या क्षेत्रास मानतात.इतकेच काय तर ज्यांचा कुलस्वामी नाही अशाही अनेकांना क्षेत्राचे माहात्म्य व रमणीयता जाणवते. या क्षेत्राला शास्त्रीय महत्त्व देखील आहे. शास्त्रज्ञानी या क्षेत्राचा अभ्यास केला होता. त्यात असे दिसून आले की निरा- नरसिंहपूर हे पृथ्वीचे मध्यस्थान/ नाभिस्थान आहे. तसे शास्त्रीय पुरावे देखील आहेत. हे एक भू वैज्ञानिक सत्य आहे, ते अनेक लोकांना निरा-नरसिंहपुरला भेट देण्यास आकर्षित करतात.

या पवित्र स्थानाला खूप मोठा इतिहास आहे. पूर्वीपासूनच हे स्थान प्रसिद्ध आणि धार्मिक आहे. रावणाचा वध केल्यानंतर मुनी अगस्ती यांच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्र यांनी आपली पवित्र यात्रा पूर्ण केली. त्यांनी ही यात्रा निरा-नरसिंहपूर येथूनच सुरू केली होती. हे स्थान खूप सुंदर आणि धार्मिक आहे. अनेक मुनी आणि भक्त येथे पूजेसाठी येतात. असे म्हणले जाते की महर्षी व्यास सुद्धा येथे काही कालावधीसाठी राहिले होते. समर्थ रामदास यांनी दोन वेळा निरानरसिंहपूरला भेट दिली होती. शके १५५३ च्या एकादशीस समर्थ पंढरपुरास आले होते. चंपाषष्ठीसाठी त्यांना पालीच्या खंडोबाला जायचे होते. ते येथे आले होते आणि त्यांनी संगमावर स्नान,संध्या आटपून त्यांनी एक सुंदर कीर्तन सादर केले होते.

  • सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा नदीकाठच्या वाळवे तालुक्यातील कोळे नरसिंहपूरगावी नृसिंहाचे एक देऊळ आहे.
  • शिवाय, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, अंजी, नांदेड, पुसद, पैठण, पोरवर्णी, बेळकोणी, रत्‍नागिरी जिल्ह्यातले संगमेश्वर, रामटेक,, शेळगाव आणि, सातारा जिल्ह्यातील धोम व पाल येथे नृसिंहाची शिल्पे आहेत.
  • सांगली नरसिंहपूर :

इस्लामपूरहून बहे या गावावरून पुढे नरसिंहपूरला जाता येते. तेथे श्री नृसिंहाचे मंदिर भुयारामध्ये आहे. मंदिर पुरातन असून, मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. बहे गावी कृष्णा नदीवर पूल आहे. बहे गावी कृष्णा नदी दोन प्रवाहांनी वाहते, त्यामुळे मध्ये बेट तयार झाले आहे. त्या बेटावर रामदासस्वामींनी स्थापन केलेला मारुती आहे. कथा अशी, की श्रीराम दंडकारण्यामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी आले व दैनंदिन आन्हिके करण्यासाठी बेटावर बसले असताना कृष्णा नदीला पूर आला. त्यावेळी मारुतिरायांनी दोन्ही हात आडवे धरल्यामुळे नदीचे दोन प्रवाह निर्माण झाले व रामाचे आन्हिक निर्विघ्नपणे पार पडले! बहे या गावाचा ‘श्रीगुरुचरित्र’ पोथीत ‘बाहे’ असा उल्लेख आढळतो.

नरसिंहपूर येथील मंदिर तीन पिढ्यांनी बांधले असल्याचा शिलालेख भुयारात जाण्याच्या पहिल्या पायरीवर दगडात कोरलेला आहे. मूर्तीपर्यंत जाण्यासाठी एकावेळी एक व्यक्ती जाऊ शकेल असा वेडावाकडा मार्ग भुयारातून आहे. प्रत्यक्ष मूर्ती कृष्णा नदीच्या जलस्तरावर प्रतिष्ठित असून ती अखंड काळ्या शाळिग्रामामध्ये कोरलेली आहे. नृसिंहाने त्याच्या मांडीवर हिरण्यकशपूस आडवे घेतले असून त्याने त्याची बोटे त्याच्या पोटात खुपसली आहेत. मूर्तीच्या प्रभावळीवर दशावतार कोरलेले आहेत. मूर्ती सुबक आहे. नृसिंहाच्या हातावरील रेषाही दृष्टीस पडतात. हिरण्यकशपूच्या शेजारी लक्ष्मीची मूर्ती आहे.

नृसिंहमूर्तीला ‘ज्वाला नृसिंह’ असे म्हणतात. भुयारात जेथे नृसिंहाची मूर्ती आहे त्याच्या वरील बाजूस तुळशी वृंदावन असून, खाली भुयारात जाता येत नाही, असे वृद्ध, अशक्त भक्त वरूनच त्या तुळशी वृंदावनासमोर भुयारात असलेल्या मूर्तीला वंदन करतात. तुळशी वृंदावनातून निघालेला एक छोटा मार्ग मूर्तीच्या गाभाऱ्यापर्यंत जातो. तुळशीवृंदावनातील लहानशा मार्गातून भाविक वरून देवासमोर पैसे ठेवतात. तो मार्ग भिंतीत अशा तऱ्हेने तयार केला आहे, की वरून टाकलेले पैसे-सुपारी खाली नृसिंहाच्या मूर्तीच्या पायाशी जाऊन पडतात!..

नृसिंहाच्या मूर्ती विविध प्रकारच्या असतात. स्थौण नृसिंह, गिरीज नृसिंह, केवल नृसिंह, विदरण नृसिंह, योग नृसिंह, नृत्य नृसिंह आणि लक्ष्मी नृसिंह वगैरे. महाराष्ट्रात नरसिंहाची मंदिरे थोडीच आहेत. त्यांच्यावर पूर्वा अष्टपुत्रे यांनी एक शोधग्रंथ लिहिला आहे.

नृसिंहावतारावर मराठी पुस्तके

  • श्री नृसिंहकवचम् व इतर स्तोत्रे (पारंपरिक)
  • नृसिंह पुराण (चिंतामणी देशमुख)
  • महाराष्ट्रातील नृसिंह मंदिरे- एक शोध (डॉ. पूर्वा अष्टपुत्रे)



  1. ^ a b Soifer, Deborah A. (1991-11-08). The Myths of Narasimha and Vamana: Two Avatars in Cosmological Perspective (इंग्रजी भाषेत). SUNY Press. ISBN 9780791408001.
  2. ^ Kaushik, Jai Narain (2002). Hamare Teej-Tyohar Aur Mele (हिंदी भाषेत). Star Publications. ISBN 978-81-85244-67-9.
  3. ^ Shri Vishnu Aur Unke Avtar (हिंदी भाषेत). Vani Prakashan. ISBN 978-81-7055-823-1.
  4. ^ Wilkinson, Philip (2009-07-01). Myths and Legends (इंग्रजी भाषेत). Dorling Kindersley Limited. ISBN 9781405344036.
  5. ^ "about Narasimha jayanti".
  6. ^ Dalal, Roshen (2010). The Religions of India: A Concise Guide to Nine Major Faiths (इंग्रजी भाषेत). Penguin Books India. ISBN 9780143415176.