निहाल अहमद
निहाल अहमद | |
---|---|
जन्म | डिसेंबर, इ.स. १९२६ मालेगाव, महाराष्ट्र |
मृत्यू | २९ फेब्रुवारी, २०१६ (वय ८९) नाशिक, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
निहाल अहमद (१९२५-२०१६) प्रजा समाजवादी पक्षाचे प्रसिद्ध पुढारी होते. गरिबांचा नेता अशी त्यांची राजकारणात आणि समाजात ओळख होती. निहाल अहमद मौलवी मोहमद उस्मान असे त्यांचे पूर्ण नाव होते. तरी महाराष्ट्राला मात्र, ते निहालभाई म्हणूनच परिचित होते.[१] निवडणूक आयोगाकडे नोंदवलेल्या माहितीनुसार त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले होते.[२] सोशालिस्ट पार्टी, प्रजा समाजवादी पक्ष, जनता पक्ष, जनता दल, जनता दल (सेक्युलर) असा राजकीय प्रवास करीत त्यांनी राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता.[३]
निहाल अहमद १९६४ मध्ये मालेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते. त्यांनी १९६७ मध्ये प्रजा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवून विजयश्री संपादन केली होती. त्यानंतर १९७२चा अपवाद वगळता १९७८ ते १९९५ पर्यंत त्यांनी आमदारकी भूषविली होती.[४] पुलोद मंत्रिमंडळात १९७८ मध्ये रोजगार हमी योजनामंत्री होते. १९८६ ते ९० दरम्यान विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी भूमिका बजावली. मालेगाव महापालिका अस्तित्वात आल्यानंतर २००२ मध्ये प्रथम महापौर होण्याचा मानही त्यांना मिळाला होता.[४]
मालेगाव नगर परिषदेचे अध्यक्ष, महापौर, सात वेळा आमदार अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द त्यांनी गाजवली.[५] एस.एम. जोशी यांचे मानसपुत्र म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती.[६] मधु दंडवते, मधु लिमये आदी समाजवादी नेत्यांच्या बरोबरीने समाजवादी चळवळीचा खंदा आधारस्तंभ बनले.[७] नानासाहेब गोरे, माजी पंतप्रधान व्हीपी सिंह, देवेगौडा, बापूसाहेब काळदाते आणि जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या दिग्गज समाजवादी नेत्यांशी त्यांचा संबंध होता.[८]
लोकसेवक
निहाल अहमद यांचे वडील स्वतंत्र्य सैनिक होते. त्यामुळे सामाजिक कार्याचा वारसा त्यांना घरातूनच लाभला होता. भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी १९४७ला सोशालिस्ट पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय करकीर्दीला सुरुवात केली. तरुणपणातच समाजवादी विचारांशी जोडले गेले. नाशिकला आचार्य नरेंद्र देव, डॉ.राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्षाची स्थापना झाली; तेव्हापासून निहालभाईंनी समाजवादाचा झेंडा हाती धरला.[५] आणीबाणीत लोकशाहीहक्कांच्या लढ्यात ते महाराष्ट्राचे नेते बनले. या लढ्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला. मालेगाव शहरातील गरीब जनतेच्या यंत्रमाग कामगारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आंदोलनं केली. त्यामुळे गरिबांचे नेते अशी लोकप्रिय ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांनी जनता दलाचे प्रदेशाध्यक्षपदही भूषविले.[९]
१९५४ च्या निवडणुकीत पहिल्यांदा ते नगरसेवक झाले. १९६२ ला नगराध्यक्षपद त्यांनी भूषवले. या नंतर अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले. तर १९७८ ते ८७ दरम्यान ते कॅबिनेट मंत्री राहिले. रोजगार हमी योजनामंत्री खात्याचे प्रमुख काम करताना त्यांनी दुष्काळ हटवण्यासाठी शेती सुधारणा, जलसंधारण कार्यक्रम राबवला. मजुरांना धान्य देण्याची योजना सुरू केली. या रोजगार योजनेची पुढे मनरेगा झाली. देशभर ही योजना पोचली. २००२ मध्ये मालेगाव महापालिकेचे पहिले महापौर होण्याचा मान त्यांना मिळाला.
केवळ आमदारकीच नव्हे; तर राज्यमंत्रीपदावर असतानाही त्यांनी कधी बडेजाव मिरविला नव्हता. नेहमी सायकलीवर फिरणारे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व जनसामान्यात 'सायकलवाला आमदार' म्हणून परिचित होते. निहालभाई सायकलवर फिरतात याची राज्यभर चर्चा होई. त्याची दखल घेऊन वसंतदादा पाटील आणि शिवाजीराव देशमुख यांनी आमदारांच्या पगारवाढीचा प्रस्ताव आणला होता. लोकांच्या प्रश्नांवर- (उदाहरणार्थ महागाई, भाडेवाढ)आंदोलन करण्याची निहालभाईंची खास पद्धत होती. उदाहरणार्थ- एसटीची भाडेवाढ झाली तर ते कार्यकर्त्यांना घेऊन एसटी बसमध्ये चढत. ‘आम्ही वाढीव भाडेवाढ देणार नाही’ असे कंडक्टरला सांगत. मालेगावात सगळ्या एसटी बसमध्ये अशी आंदोलने होत, तेव्हा महामंडळ गांगरून जात असे. ‘जुनेच भाडे घ्या, अन्यथा आम्हाला जेलमध्ये घाला’ असा निहालभाईंचा युक्तिवाद असे.[१०]
विधिमंडळाच्या परिसरात निदर्शने, निषेधाची आंदोलने करणे संकेताला धरून नाही. तरीही, १९९२ नंतर याच विधिमंडळातील एक व्यक्ती आपल्या दंडावर कायमस्वरूपी काळी फीत चिकटवून कामगाराच्या, मजुरांच्या आणि गरिबांच्या समस्या सोडविण्याकरिता विधानसभेत आवाज उठवत राहिली. अयोध्येतील बाबरी मशीद आंदोलनानंतर त्याचा निषेध म्हणून निहालभाईंनी आपल्या दंडावर बांधलेली काळी फीत नंतर कधीच दूर केली नाही. उलट, त्यानंतर प्रत्येक अंगरख्याच्या उजव्या बाहीवर कायमस्वरूपी काळी पट्टी शिवून घेतली.[११]
न झालेले मुख्यमंत्री
आणीबाणीनंतर केंद्रात जनता पक्षाचे सरकार आले. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्यानंतर एक वर्षानंतर महाराष्ट्रात निवधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या. आणीबाणीचा फार मोठा फटका इंदिरा काँग्रेसला बसला होता. अखेरीस पक्षात फूट पडून त्याचे दोन गट झाले. महाराष्ट्रातही याचे परिणाम उमटले आणि काँग्रेसचे दोन गट निर्माण झाले.
निवडणुकीत जनता पक्षाच्या विरोधात काँग्रसेचे दोन्ही गट मैदानात होते. निवडणुकीनंतर जनता पक्षाने सर्वाधिक ९८ जागा जिंकल्या आणि इंदिरा काँग्रेसला ६२, तर रेड्डी काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. शेकापला १३, माकपला ९ आणि अपक्षांना ३६ जागा मिळाल्या होत्या. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. अखेरीस दोन्ही काँग्रेस गटाचे विलीनीकरण होऊन वसंतदादा राटील यांचे सरकार सत्तेवर आले.
परंतु चारच महिन्यात हे सरकार कोसळलं. त्याला अतर्गत धुसफूस आणि दोन गटातील वर्चस्वाचे राजकारण जबाबदार होते. शरद पवार ४० आमदार घेऊन सरकारमधून बाहेर पडले. परिणामी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शरद पवारने जनता पक्षाशी बोलणी सुरू केली. जनता पक्षाने शरद पवार यांना पाठिंबा देऊ केला. शरद पवार यांनी एस.एम. जोशी यांना नेतृत्व बहाल केलं. समाजवाद्यांनी निहाल अहमद यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सूचवले. एस.एम. जोशी यांनीही निहाल अहमद यांच्या नावाला पसंती दर्शवली. परंतु जनता पक्षाचा भाग असलेल्या जनसंघाने निहाल अहमद यांच्या नावाला प्रखऱ विरोध दर्शवला. आरएसएसने उत्तमराव पाटील यांचे नाव पुढे केले. त्याचवेळी जनता पक्षाच्या वतीने एस.एम. जोशी यांचे नाव आले. जोशीनी नकार दिला. त्पयानंतर निहाल अहमद यांच्रंया नावाला सर्तुवांची पसंती मिळाली. पण जनसंघाच्या विरोधामुळे अखेर शरद पवार यांचे नाव एसेमनी सूचलवले. अशा रीतीने पवार भारतीतल सर्वात तरुण (वय-३८) मुख्यमंत्री झाले. जनसंघाचा विरोध झाला नसता तर निहाद अहमद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते.[१०]
निधन
चळवळीतील झुंझार नेता, उत्कृष्ट वक्ता, तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती. गोरगरीब, शोषित, दलित, मुस्लिम व कामगारांच्या प्रश्नांसाठी ते आयुष्यभर झटत राहिले. निहाल अहमद यांची विधानसभेतील भाषणे अभ्यासपूर्ण असायची. तसंच ती खुसखुशीत होती. त्यांची भाषणे म्हणजे सभागृहाचा एक ‘अभ्यासवर्ग’ असायचा.[१२] निहाल अहमद यांचे २९ फेब्रुवारी २०१६ रोजी नाशिक येथे निधन झाले. मृत्युसमयी त्याचे वय ९० होते. नाशिक येथील वोक्तरा या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. २९ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
निहाल अहमद यांच्या निधनाने कामगार व कष्टकरी वर्गाच्या हितासाठी लढणारा एक महत्त्वपूर्ण नेता राज्याने गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली होती. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, "निहाल अहमद यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासह गोवा मुक्ती आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यात हिरीरीने सहभाग घेतला होता. मालेगाव परिसराच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अल्पसंख्याकांचा विकास, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासह कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सदैव आवाज उठविला. विशेषतः वस्त्रोद्योगातील हातमाग व यंत्रमाग कामगारांच्या हितासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. राज्यात पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार सत्तेवर असताना त्यांनी रोजगार, मनुष्यबळ विकास, तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण खात्याचे मंत्री म्हणून चांगली कामगिरी बजावली होती."[१३]
संदर्भ
- ^ "माजी मंत्री निहाल अहमद यांचे निधन". Maharashtra Times. 2023-08-02 रोजी पाहिले.
- ^ "NIHAL AHMED MAULLAWI MOH.USMAN(JD(S)):Constituency- MALEGAON(Nashik) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2023-08-02 रोजी पाहिले.
- ^ "निहाल अहमद यांचे निधन". Maharashtra Times. 2023-08-02 रोजी पाहिले.
- ^ a b "समाजवादी नेते निहाल अहमद निवर्तले". Lokmat. 2016-03-01. 2023-08-02 रोजी पाहिले.
- ^ a b "निहाल अहमद". www.weeklysadhana.in (इंग्रजी भाषेत). 2023-08-02 रोजी पाहिले.
- ^ https://www.india.com/author/press-trust-of-india. "Former Maharashtra minister Nihal Ahmed passes away | India.com". www.india.com (इंग्रजी भाषेत). 2023-08-02 रोजी पाहिले.
- ^ "माजी मंत्री निहाल अहमद यांचे निधन". Maharashtra Times. 2023-08-02 रोजी पाहिले.
- ^ "Former Maharashtra Minister Nihal Ahmed Maulavi Mohammed Usman died". Jagranjosh.com. 2016-02-29. 2023-08-02 रोजी पाहिले.
- ^ "Latest Marathi News- Breaking News Today | Read Marathi Batmya from Maharashtra, India ब्रेकींग मराठी न्यूज at https://loksatta.com/". Loksatta. 2016-03-02. 2023-08-02 रोजी पाहिले. External link in
|title=
(सहाय्य) - ^ a b "निहाल अहमद". www.weeklysadhana.in (इंग्रजी भाषेत). 2023-08-02 रोजी पाहिले.
- ^ "Latest Marathi News- Breaking News Today | Read Marathi Batmya from Maharashtra, India ब्रेकींग मराठी न्यूज at https://loksatta.com/". Loksatta. 2016-03-02. 2023-08-02 रोजी पाहिले. External link in
|title=
(सहाय्य) - ^ "Latest Marathi News- Breaking News Today | Read Marathi Batmya from Maharashtra, India ब्रेकींग मराठी न्यूज at https://loksatta.com/". Loksatta. 2016-03-02. 2023-08-02 रोजी पाहिले. External link in
|title=
(सहाय्य) - ^ "माजी मंत्री व ज्येष्ठ समाजवादी नेते निहाल अहमद यांचे निधन". ८ ऑगस्ट २०२३ रोजी पाहिले.