निर्माण शिक्षण प्रक्रिया
‘निर्माण’ ही युवकांसाठीची शिक्षण प्रक्रिया डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्या सर्च या संस्थे मार्फत 2006 साली सुरू करण्यात आली.
प्रयोजन
युवकांनी केवळ पैसा मिळवण्यामागे आपले बहुमोल जीवन घालवू नये यासाठी ही प्रक्रिया. आपण ज्या समाजात व सृष्टीत जगतो आहोत त्यासमोर अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांशी जोडून घेऊन, हे सोडवण्यासाठी योगदान देत आपले जीवन युवकांनी जगावे हा विचार रुजवण्यासाठी ही शैक्षणिक प्रक्रिया आहे.
प्रक्रिया
आपल्या जीवनाला अर्थपूर्ण प्रयोजन असावे हा निर्माण प्रक्रियेचा गाभा. हा शोध युवकांनी आपापलाच घ्यावा. मुळात हा विचार आणि मग तो घेण्यासाठीची संधी पुरवणे हे निर्माणच्या शैक्षणिक प्रक्रियेचे उद्देश. यासाठी ‘सर्च’च्या गडचिरोली येथील ‘शोधग्राम’ या ठिकाणी चार शिबिरे होतात.
सुरुवात स्वतःला व स्वतःच्या शरिराला समजून घेण्यापासून होते. यासाठी पहिले शिबिर डॉ. राणी बंग लैंगिक शिक्षणावर घेतात. दुसऱ्या शिबिराचा विषय ‘समाज व सृष्टी यांच्याशी माझे नाते व जबाबदारी’ यावर होते. यात समाजातील वेगवेगळ्या प्रश्नांवरती काम करणारे लोक येऊन युवकांशी त्या प्रश्नावर व त्यांच्या कामाबद्दल संवाद करतात.
तिसऱ्या शिबिरात युवक प्रत्यक्ष गावामध्ये राहून तिथल्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. चौथे शिबिर हे आपल्या पुढच्या जीवनात आपण कोणती कृती करणार या बद्दल विचार करायला आहे. प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय फक्त विचार किंवा चर्चा करून शिक्षण होत नाही. निर्माण शिबिरांच्या मधल्या काळात केलेल्या विचाराला कृतीत उतरवून बघण्याची संधी असते.
व्याप्ती
सुरू झाल्यापासून निर्माणची व्याप्ती वाढत आहे. सर्च सोबतच महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, भारत ऍग्रो इंडस्ट्रिज फाउंडेशन, ग्राम मंगल, मेट्रिक कंसल्टंसी, अशा अनेक संस्थाचा या प्रक्रियेत आता सहभाग आहे. या संस्थांमार्फत युवकांना निर्माण फेलोशिप दिली जाते. एक प्रश्न निवडून त्यावर एक वर्ष काम करत असताना आपल्या जीवनाचे प्रयोजन शोधण्याची संधी फेलोशिप मध्ये युवकाला मिळते.
संदर्भ व नोंदी
- निर्माणचे अधिकृत संकेतस्थळ
- निर्माण वरील डॉक्युमेंटरी
- निर्माण फेलोशिप Archived 2009-05-28 at the Wayback Machine.
- निर्माण प्रक्रियेचे मेन्टर्स Archived 2010-01-09 at the Wayback Machine.
- निर्माणचा ब्लॉग
- निर्माणचे इंग्लिश विकी पेज
- डॉ. अभय व डॉ. राणी बंग
- सर्चचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2017-02-25 at the Wayback Machine.
- एमकेसीएलचे अधिकृत संकेतस्थळ