Jump to content

ना.घ. देशपांडे

ना.घ. देशपांडे
ना.घ. देशपांडे यांचे एक धवल-कृष्ण चित्र
जन्म नाव नागोराव घनश्याम देशपांडे

नागोराव घनश्याम देशपांडे (ऑगस्ट २१, इ.स. १९०९ - मे १० इ.स. २०००) हे मराठी कवी होते.

जीवन

ना.घ. देशपांड्यांचा जन्म २१ ऑगस्ट इ.स. १९०९ रोजी झाला. या दिवशी नागपंचमी होती, म्हणून नाव नागोराव ठेवण्यात आले.[] बुलडाणा जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध साखरखेर्डा हे त्यांचे मूळ गाव. परंतु त्यांचे बालपण हे आजोळी, म्हणजे जवळच्याच सेंदुरजन या गावी गेले. शिक्षण मेहकर, खामगाव व त्यानंतर नागपूर येथे झाले. त्यांना लहानपणापासूनच कविता करण्याचा छंद होता. चित्रकलेचेही उत्तम अंग होते. व्यवसायाने ते वकील होते. इ.स. १९३० साली त्यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजातून बी.ए. पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यासक्रम पुरा करून एल्‌एल.बी. पदवी कमवली. बी.ए.ला असताना इ.स. १९२९ साली त्यांनी लिहिलेली शीळ ही कविता वर्गमित्र गायक गोविंदराव जोशी (जे पुढे जी.एन. जोशी या नावाने प्रसिद्ध झाले) यांनी कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली. ती अतिशय लोकप्रिय झाली. पुढे इ.स. १९३२ साली एच.एम.व्ही.ने ती जी.एन.जोश्यांच्याच आवाजात ध्वनिमुद्रित केली. यातून भावगीत हा प्रकार मराठी संगीतक्षेत्रात रूढ झाला. इ.स. १९५४ साली शीळ याच नावाने त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. इ.स. १९६४ साली अभिसार हा नाघंचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्याला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. पुढे इ.स. १९८६ साली प्रकाशित झालेल्या ख़ूणगाठी या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

याशिवाय कंचनीचा महाल (चार दीर्घकवितांचा संग्रह) व गुंफण (शीळ काव्यसंग्रहाच्या काळापासून तोवर अप्रकाशित राहिलेल्या कवितांचा संग्रह) यांचाही त्यांच्या ग्रंथसंपदेत समावेश होतो. इ.स. १९८० च्या दशकात कोल्हापूर सकाळ दैनिकात प्रसिद्ध झालेल्या आठवणींचे फुले आणि काटे हे संकलन प्रकाशित झाले.

अन्य कार्य

साहित्य क्षेत्राखेरीज इतरही क्षेत्रात त्यांनी कार्य केले. मेहकर येथील मेहकर एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. इ.स. १९३५ साली स्थापलेल्या या संस्थेचे ते इ.स. १९६९-२००० या दीर्घ काळात अध्यक्ष होते. इ.स. १९३५पासून इ.स. १९९२पर्यंत त्यांनी मेहेकरच्या सत्र न्यायालयात वकिली केली. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासही दांडगा होता.

ते काही काळ नागपूर आकाशवाणीवर कार्यक्रम सल्लागार समितीचे सदस्य होते. त्याकाळी आकाशवाणीवर फक्त पुरुष निवेदक असत. नाघंचे म्हणणे होते की, स्त्रियांच्या आवाजाचा स्वर पुरुषांपेक्षा उंच असल्यामुळे त्यांना निवेदक म्हणून नेमावे[ संदर्भ हवा ]. त्यांची ही सूचना केंद्राने मान्य केली, व तेव्हापासून रेडिओवर निवेदिकांना प्रवेश मिळाला.

विशेष

काही अपुऱ्या दिवसांचा जन्म असल्यामुळे नाघंचे लहानपण तर अशक्ततेत गेलेच, शिवाय आजारपणही आयुष्यभर पुरले. एक्क्याण्णव वर्षे जीवन, असेच अशक्ततेत व्यतीत होऊन अखेर त्यांचे मेहेकर येथे देहावसान झाले. नाघंची 'कंचनीचा महाल' ही कविता १९८० नंतरच्या काळात विशेष गाजत राहिली. मेहेकर गावाच्या वेशीवर अजूनही 'कंचनीचा महाल' ही वास्तू आहे. ती त्यांच्या एकूण कवितेचेच स्मारक होऊ शकेल काय; याबाबत सध्या विदर्भातील संस्था व रसिकांत विचार सुरू आहे. तेथील परिसरातच नाघंच्या काव्यधर्माशी जुळेल असे स्मारक उभारले जाणार आहे.

अपूर्व योग

ना.घ. देशपांडे यांच्या 'रानारानात गेली बाई शीळ' ह्या 'कविते'चा जन्म ता. २८ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. याच दिवशी गानकोकिळा लता मंगेशकर ह्यांचा जन्म झाला आहे! या दिवसाने इतिहास रचला.

प्रकाशित साहित्य

काव्य संग्रह

  • अभिसार (इ.स. १९६३)
  • कंचनीचा महाल, मौज प्रकाशन गृह (इ.स. १९९६)
  • खूणगाठी, मौज प्रकाशन गृह (इ.स. १९८५)
  • गुंफण, मौज प्रकाशन गृह (इ.स. १९९६)
  • शीळ, मौज प्रकाशन गृह (इ.स. १९५४)
  • सुगंध उरले, सुगंध उरले (ना. घ. देशपांडे यांची निवडक कविता. संपादक - अरुणा ढेरे)

आत्मकथन

  • फुले आणि काटे, मेहता पब्लिशिंग हाऊस (इ० स० १९९०)

ना.घ. देशपांडे यांनी लिहिलेली आणि ध्वनिमुद्रित झालेली भावगीते

  • अंतरीच्या गूढ गर्भी
  • काळ्या गढीच्या जुन्या
  • घर दिव्यात मंद तरी
  • डाव मांडून भांडून
  • तुझ्याचसाठी कितीदां
  • नदीकिनारीं नदीकिनारीं गं
  • फार नको वाकू जरी
  • बकुळफुला कधीची तुला
  • मन पिसाट माझे अडले रे
  • रानारानांत गेली बाई शीळ

ना.घ. देशपांडे यांच्याविषयीची पुस्तके

१. ना.घ.देशपांडे आणि ना.धों.महानोर यांची कविता, डाॅ.राजेंद्र नाईकवाडे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २५ फेब्रुवारी २००३ २. ना.घ. देशपांडे : कवी आणि कविता, डाॅ. राजेंद्र नाईकवाडे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, ६ एप्रिल २०१९ ३. ना.घ. देशपांडे यांची कविता, सुधीर रसाळ, मौज प्रकाशन गृह, मुंबई, १६ मार्च २०१० ४.ना घ देशपांडे ह्यांच्या काव्यातील स्त्री ( अभ्यासलेख- किरण शिवहर डोंगरदिवे, तरुण भारत, काव्यप्रदेशातील स्त्री ह्या स्तंभातील महत्त्वाचा लेख, 2019 ५. नाघंचे अखेरच्या दिवसांतील दर्शन(ग्रंथातील लेख), मराठी काव्यधारा : स्पंद आणि छंद, डाॅ. राजेंद्र नाईकवाडे, लाखे प्रकाशन, नागपूर ३१ जुलै २०१५

पुरस्कार

नाघंना ख़ूणगाठी या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. गदिमा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात आलेली साहित्य वाचस्पती ही उपाधी आणि विदर्भ साहित्य संघाचा अत्यंत मानाचा 'जीवनव्रती' पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी व मानसन्मानांनी त्यांची साहित्यिक कारकीर्द गौरवण्यात आली. इ.स. १९८४ साली त्यांच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून विदर्भ साहित्य संघाने मेहकर येथे साहित्य संमेलन आयोजित केले.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ शिरीष गोपाळ देशपांडे. "नादमधुर कवितेचा धनी". महाराष्ट्र टाईम्स. १५ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्य दुवे