Jump to content

नाळ

गर्भावस्थेत गर्भ व अपरा (वार) यांना जोडणाऱ्या नलिकेसारख्या अवयवाला नाळ म्हणतात. गर्भकालातील गर्भाचे जीवन संपूर्णपणे नाळेवर अवलंबून असते. गर्भाची वाढ होण्याकरिता आवश्यक असलेली पोषकद्रव्ये, ऑक्सिजन, संप्रेरके इत्यादी घटकांचा पुरवठा करणे, गर्भाच्या चयापचयातून उत्पन्न झालेले कार्बन डाय-ऑक्साइड, यूरिया इत्यादी टाकाऊ पदार्थ वाहून नेणे ही महत्त्वाची कार्ये नाळेमार्फत घडत असतात. गर्भ जेव्हा चलनक्षम बनतो तेव्हा तो वारेला जोडलेला असूनही नाळेद्वारे गर्भाशयात मोकळेपणे फिरू शकतो. नाळेमध्ये प्रामुख्याने रक्तवाहिन्या, संयोजी ऊती व मूलपेशी असतात. मात्र नाळेत चेता नसते.

   जन्मपूर्व विकासावस्थेत नाळ ही शारीरिकदृष्ट्या अर्भकाचा भाग असते. नाळेमधील व्हॉर्टन जेलीच्या द्रवात एक शीर (नीला) आणि दोन धमन्या (रोहिण्या) असतात. नाळेतील धमन्या शिरेपेक्षा अधिक लांब असतात. व्हॉर्टन जेली हा जिलेटिनासारखा पदार्थ असून हा म्युकोपॉलीसॅकॅराइडापासून (श्लेष्मबहुशर्करा) बनलेला असतो.
   नाळेतील शिरेवाटे गर्भाला ऑॅक्सिजनयुक्त व पोषणसमृद्ध रक्त मिळते, तर धमन्यांवाटे

ऑक्सिजनविरहित व पोषकहीन रक्त गर्भापासून वाहून नेले जाते. गर्भावधिकाल पूर्ण होण्याच्या सुमारास नाळेची लांबी सु. ५० सेंमी. आणि व्यास सु. १.५ सेंमी. असून तिचे ताणबल ३.६ किग्रॅ. इतके असते. तसेच नाळेला वारेच्या टोकाकडून पीळ पडू लागतात. प्रसूतीनंतर नाळ कापून अर्भकाला मातेपासून वेगळे केले जाते. नाळेत चेता नसल्यामुळे ती कापतात तेव्हा मातेला अथवा अर्भकाला कोणतीही वेदना होत नाही.

 नाळेबाबत काही अपसामान्य लक्षणे दिसून येतात आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांमुळे माता आणि अर्भक या दोघांना धोका पोहोचू शकतो. उदा., नाळेची अपसामान्य लांबी, वारेशी जुळलेल्या ठिकाणी पीळ बसणे अथवा रक्तस्राव होणे. काही वेळा गर्भाच्या मानेभोवती नाळेचा वेढा पडतो. ही सामान्य बाब असून बहुधा प्रसूतीपूर्वी हा वेढा आपोआप सुटतो. मात्र असे न घडल्यास प्रसूतीच्या वेळी हा वेढा काळजीपूर्वक सोडविला जातो. काही वेळा नाळेमध्ये केवळ एकच धमनी असते.

याचे प्रमाण ५०० गर्भांमागे १ असते. त्यामुळे अर्भकाला कोणताही धोका नसतो. परंतु नियमितपणे गर्भाची श्राव्यातीत ध्वनिप्रतिमादर्शन(सोनोग्राफी) करून योग्य ती काळजी घेतली जाते. काही वेळा अर्भक जन्माला येण्याआधी नाळ गर्भाशयातून बाहेर येते. त्यामुळे अर्भकाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. परिणामी तत्काळ प्रसूती करावी लागते.

  नवीन संशोधनामुळे असे लक्षात आले आहे की, नाळेतील रक्त मूलपेशींचा (स्टेम सेल) समृद्ध आणि सहज उपलब्ध होणारा स्रोत आहे. नाळेतील रक्तपेशी अस्थिमज्जेच्या रोपणासाठी वापरता येतात. त्यामुळे हल्ली काही वैज्ञानिक संस्थांमध्ये नाळ फेकून न देता त्यातील रक्त गोठवून ठेवले जाते. काही वैज्ञानिकांच्या मते नाळेतील मूलपेशींचा वापर करून आनुवंशिक रोगांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. प्रामुख्याने, थॅलॅसेमिया या आनुवंशिक रोगाच्या नियंत्रणासाठी मूलपेशींचा वापर करण्याचे वैज्ञानिकांचे प्रयत्न चालू आहेत.
 अनेक अपरास्तनी प्राणी, विशेषेकरून मादी, पिलाची नाळ दाताने चावून तोडतात व खातात. चिंपॅंझीची मादी नाळ तोडत नाही. ती जन्मलेल्या अर्भकाला वार व नाळेसकटच बाळगते. दिवसभरात नाळेभोवतालची जेली वाळून तुटली की अर्भक आपोआप वेगळे होते.