Jump to content

नारायणगाव (निफाड)

(हा लेख नाशिक जिल्ह्यातीत नारायणगांव या गांवासंबंधी आहे. पुणे-नाशिक गाडीरस्त्यावर येणारे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव वेगळे आहे.)

भौगोलिक

नारायणगांव निफाड तालुका, नाशिक जिल्हा. गांवाचे पूर्वीचे नाव खेरवाडी. ही खेरवाडी गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या चांदोरी या गावाची, चांदोरीपासून ३ कि.मी अंतरावरची वाडी होती. याच वाडीस सन १९६१ नंतर ग्रामपंचायतीचा दर्जा मिळून खेरवाडी ग्रामपंचायत असे स्वतंत्र नाव मिळाले मात्र सन १९८१ नंतरच्या रेल्वे रोको आंदोलनानंतर या गावाचे रेकॉर्ड वर नारायणगाव तयार केले. हे गाव नाशिक शहरापासून अवघ्या २९ कि.मी अंतरावर तर जवळच असलेल्या ओझर(मिग) पासून अवघ्या सात-आठ किलोमीटरवर वसलेले आहे. नारायणगावचे रेल्वे स्थानक, हे खेरवाडी या नावाने मध्य रेल्वेच्या नाशिक रोड व मनमाड या स्थानकांदरम्यान येते. नारायणगांव एक प्रगतशील गाव आहे

कृषी प्रगती

या गावातली प्रमुख पिके द्राक्ष, कांदा, ऊस, टॉमॅटो व भाजीपाला ही आहेत. नाशिक भाजीमंडईतील भाजीपाल्याचा ३० टक्के वाटा हा ह्या गावाचा असतो. नारायणगावातील जमीन खूप सुपीक असल्याने येथील भाजीपाल्याचा एक वेगळाच सुगंध येतो, असे म्हणतात.

शेती व्यवसायात असलेल्या येथील द्राक्ष उत्पादकांनी आपला माल नेदरलँड्स, जर्मनी, इंग्लंड अशा देशांना निर्यात केला आहे. नारायणगावच्या रेल्वे (खेरवाडी)माल धक्क्यावरून देशाच्या इतर भागांत कांदा पाठविला जातो. जवळच असलेले पिंपळगाव (बसवंत), सायखेडा, सिन्नर, चांदवड, लासलगाव येथील बाजारांमधील कांदा लोडिंगसाठी खेरवाडी स्टेशनवर येतो. या गावाचे शिवार चार भागात विभागलेले असून चांदोरी, चितेगाव, पिंप्री सय्यद, ओझर, तसेच ओणे ही गावे शिवारालगत आहेत.

धार्मिकता

धार्मिक गाव म्हणूनही नारायणगांव प्रसिद्ध आहे. या गावात पूर्वीपासूनचे भगवान श्री दत्तात्रय प्रभू मंदिर, श्री भैरवनाथ मंदिर आणि हनुमान मंदिर आहे. या सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार दिनांक ६ नोव्हेंबर २००२ मध्ये झाला. यापूर्वी ही सर्व मंदिरे अगदी जुन्या पद्धतीची व लहान होती.मात्र आता या तीनही मंदिरांना अतिशय मोठे सभा मंडप बांधले गेले आहेत.
या तीनही मुख्य मंदिरांव्यतिरिक्त महादेव मंदिर, सप्तशृंगी देवी मंदिर तसेच आता नवीनच तयार होत असलेले संत जनार्दनस्वामी मंदिरदेखील आहे.

नारायणगावची धार्मिक यात्रा फाल्गुन महिन्याच्या सरतेशेवटी म्हणजेच गुढीपाडव्याच्या चार दिवस आधी असते. प्रथम भगवान श्री दत्तात्रय प्रभू यात्रा, नंतर हनुमान यात्रा, व शेवटी श्री भैरवनाथाची यात्रा होते. या यात्रेचे वैशिष्ट्य असे की यात्रेत दरवर्षी भैरवनाथाच्या रथाचा लिलाव होतो. साधारण २०,००० ते ५०,००० पर्यत लिलावाची बोली केली गेल्याचे उदाहरण आहे. ही यात्रा पंचांची समिती भरवते. प्रत्येक कुळाचे लोक पंचसमितीत समाविष्ट असतात. गावातला आठवडे बाजार हा रविवारी होत असतो. दरवर्षी आठवडे बाजारपेठेचाही ग्रामपंचायतीतर्फे लिलाव होतो.

इतिहास

दि.१०/११/१९८० साली येथे

शरद जोशी (शेतकरी नेता) आणि माधव खंडेराव मोरे यांच्या उपस्थितीत ऊस आंदोलन नावाचे भारतातील पहिले शेतकरी रेल्वे रोको आंदोलन झाले होते. या आंदोलनात खेरवाडीचे भास्कर धोंडीबा जाधव व बाबुराव पांडुरंग रत्ने असे दोन शेतकरी बळी गेले होते. आंदोलनात नाशिक जिल्हातील सर्व शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानक जाळून खाक केले होते, त्यामुळे मध्य रेल्वेची येथून होणारी वाहतूक पाच-सहा तास बंद ठेवली गेली होती. हे नारायणगाव निफाड तालुक्यात येते.गावाच्या सर्व रेकॉर्डवर नारायणगाव हे नाव असून रेल्वेच्या नकाशात मात्र खेरवाडी हेच नाव अद्यापपर्यत आहे. थोडक्यात ----- [] मोरे-कराड-जोशी, ऊस आंदोलनातील त्रिमूर्ती... १० नोव्हेंबर १९८०, रास्ता रोको सुरू... रेल रोको... पोलिसांचा अघोरी लाठीमार... खेरवाडी गोळीबार... तीनशेचा भाव मंजूर... घुमरेवकिलांचे सहाय्य... एकूण ३१,००० शेतकऱ्यांना अटक... एक ऐतिहासिक विक्रम.

संदर्भ

http://nashikgrapes.blogspot.com/

दत्तात्रय विठ्ठल आवारे

  1. ^ दत्तात्रय विठ्ठल आवारे