Jump to content

नाट्यदर्पण (ग्रंथ)

नाट्यदर्पण हा नाट्यशास्त्रावरील; प्रसिद्ध संस्कृत ग्रंथ आहे. हा ग्रंथ आचार्य हेमचंद्रांचे शिष्य, आचार्य रामचंद्र आणि आचार्य गुणचंद्र यांनी लिहिला. त्यांचा जीवनकाल गुजराथच्या सिद्धराज, कुमारपाल आणि अजयपाल या तीन राजांच्या शासनकाळात होता. शेवटच्या अजयपाल राजाने काही कारणाने क्रुद्ध होऊन या दोघांना मृत्युदंड दिला, असे सांगितले जाते.

आचार्य गुणचंद्रांचा ’नाट्यदर्पण’ या ग्रंथाखेरीज दुसरा ग्रंथ सापडलेला नाही; पण त्यांनी जवळजवळ १९० ग्रंथांचे लेखन केले होते असे म्हणले जाते. त्यांनी लिहिलेल्या ११ नाटकांमधून घेतलेली अवतरणे ’नाट्यदर्पण’मध्ये आली आहेत. याशिवाय या ग्रंथात, इतर नाटककारांच्या अनेक दुर्मीळ नाटकांचा उल्लेख आहे. विशाखदत्ताने लिहिलेले ’देवीचंद गुप्त’ हे असेच एक नाटक.

’नाट्यदर्पण’ हा ग्रंथ कारिका रूपात आहे. म्हणजे त्यात केलेले विषयाचे विवरण श्लोकबद्ध आहे. त्यावरील वृत्ती म्हणजे स्पष्टीकरणात्मक टीकासुद्धा या दोन्ही आचार्यांनीच लिहिली आहे.

’नाट्यदर्पण’चेे चार ’विवेकां’मध्ये विभाजन केलेले आहे. सदर ग्रंथात नाटक, कल्पित कथानक असलेले नाटक, दृश्य अभिनय, रसाविष्कार वगैरे विषयांचाही ऊहापोह केलेला आहे.

'’नाट्यदर्पण’चा हिंदी अनुवाद १९९०साली दिल्ली विद्यापीठाने प्रकाशित केला आहे.