Jump to content

नाझी पक्ष

नाझी पक्षाचा लोगो

राष्ट्रीय समाजवादी जर्मन कामगार पक्ष जर्मन: De-Nationalsozialistische_Deutsche_Arbeiterpartei.ogg Nationalsozialistische Deutsche Arbeiterpartei ), किंवा नाझी पक्ष हा जर्मनीमधील इ.स. १९२० ते इ.स. १९४५ दरम्यान अस्तित्वात असलेला एक राजकीय पक्ष होता. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये वाहणाऱ्या वर्णद्वेषी व कम्युनिस्टविरोधी चळवळींमध्ये ह्या पक्षाची मुळे रोवली गेली.

१९२० साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाची सुत्रे ॲडॉल्फ हिटलरने १९२१ साली आपल्या हातात घेतली. वाढती बेरोजगारी, महायुद्धानंतर जर्मनीला मिळालेली हीन वागणूक, ज्यूविरोध व देशप्रेम भावना ह्यांचे भांडवल करून नाझी पक्ष १९३० सालापर्यंत जर्मनीमधील एक बलाढ्य राजकीय पक्ष बनला होता. १९३३ साली हिटलरला जर्मनीचा चॅन्सलर घोषित करण्यात आले. त्यानंतर हिटलर व त्याच्या नाझी सहकाऱ्यांनी जर्मनीमधील इतर सर्व पक्ष बरखास्त केले व राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबले अथवा ठार मारले. ह्याच वर्षी नाझी जर्मनीची स्थापना झाली व ह्या राष्ट्राचा संपूर्ण अंमल नाझी पक्षाच्या हातात आला.

हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी पक्षाने अनेक फॅसिस्ट कायदे लागू केले ज्यामध्ये जर्मन समाजाचे शुद्धीकरण करण्यासाठी आर्य जर्मनेतर सर्व वंशाच्या (मुख्यतः ज्यू) तसेच अपंग, समलिंगी, काळे, मतिमंद इत्यादींचे खच्चीकरण करणाऱ्या योजनांचा समावेश होता. ह्याचे रूपांतर होलोकॉस्टमध्ये झाले ज्यात सुमारे ६० लाख लोकांची कत्तल करण्यात आली.

दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पाडाव झाल्यानंतर नाझी पक्ष नष्ट पावला.

नाझी पक्षाचा मार्क्सवाद, लोकशाही, उद्योगीकरण इत्यादी अनेक राजकीय विचारधारांना पूर्ण विरोध होता व एक-पक्ष हुकुमशाहीवर विश्वास होता.