नागरमोथा
नागरमोथा, अर्थात लव्हाळे, (शास्त्रीय नाव: :Cyperus rotundus, सायपेरस रोटंडस / सायपेरस रोटुंडस ;) ही आफ्रिका, दक्षिण व मध्य युरोप व दक्षिण आशिया या भूप्रदेशांत आढळणारी एक तृणवर्गीय वनस्पती आहे. हे बारमाही वाढणारे गवत असून पाणथळ, ओलसर जागी निसर्गतः आढळतो. नागरमोथा ४० सें.मी. उंचीपर्यंत वाढतो. त्याची कांडे त्रिधारी व भरीव असतात. खोड बारीक, जमिनीखाली पसरत जाणारे असते.
उपयोग
नागरमोथ्याच्या बारीक खोडाला काही ठिकाणी उभट, लंबगोलाकार कंद येतात. त्यातून वासाचे दाट तैलार्क निघतो. या तैलार्कात स्निग्ध अम्ले असल्यामुळे त्यास सुगंध येतो. या तेलाचा वापर सुवासिक उटणी, साबण किंवा अत्तरे बनवण्यासाठी केला जातो.
नागरमोथ्याच्या मुळास छोटा कंद असतो. मराठा पाकपद्धतीतल्या काळ्या मसाल्यात नागरमोथ्याचा कंद घटकपदार्थ म्हणून वापरतात.
आयुर्वेदिक औषधयोजना
नागरमोथ्याच्या कंदांची आणि मुळांची पूड त्वचादोषांवर गुणकारी असल्याचे मानले जाते. त्वचेला सुटणारी खाज, कंड, त्वचेवरील पुरळ इत्यादी त्वचाविकारांवर या पुडीची बाह्य योजना करतात किंवा कंदाचे पाणी पोटातून घेतात. मूत्रविकारांवरही नागरमोथा उपयुक्त असल्याचे मानले जाते.
बाह्य दुवे
- चिनी व आयुर्वेदिक वैद्यकातील नागरमोथ्याचा उपयोग (इंग्लिश मजकूर)