नागपूर
?नागपूर महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: संत्रानगरी Tiger Capital of India" | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | २१७.६५ चौ. किमी • ३१० मी |
जवळचे शहर | वर्धा आणि बुटीबोरी |
प्रांत | महाराष्ट्र |
जिल्हा | नागपूर |
लोकसंख्या • घनता | २४,२०,०००[२] (२००६) • ११,११९/किमी२ |
भाषा | मराठी |
महापौर | |
उपमहापौर | |
आयुक्त | |
स्थापना | १७०२ [१] |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • ४४०००१ • +०७१२ • MH-३१ (नागपूर पश्चिम) MH-४९ (नागपूर पूर्व) MH-४० (नागपूर ग्रामीण) |
संकेतस्थळ: www.nagpur.nic.in | |
नागपूर (इंग्रजी : Nagpur) हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील तेरावे मोठे नागरी क्षेत्र (urban conglomeration) आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपूरास संत्रानगरी असेही म्हणतात, कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे.[३] २००२ साली शहराचा ३००वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. नजीकच्या संभाव्य आर्थिक गुंतवणुकीमुळे नागपूर शहर बहुचर्चेत आहे.
इतिहास
नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख १०व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो. हा ताम्रपट देवळी (वर्धा) येथे मिळाला असून तो इ.स. ९४०चा आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२ साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. देवगड राज्यात त्या काळी नागपूर, सिवनी, बालाघाट, बैतूल आणि होशंगाबाद यांचा समावेश होत असे. बख्त बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपूरास हलवली. त्याने जवळजवळ ३३ वर्षे राज्य करून नागपूर शहर भरभराटीस आणले.राजा चांद सुलतान याच्या मॄत्यूनंतर नागपूरवर भोसल्यांचे राज्य आले.इ.स. १७४२ मधे रघूजीराजे भोसले नागपूरच्या गादीवर आरूढ झाले. इ.स. १८१७ मध्ये सीताबर्डीच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी नागपूरचा ताबा घेतला. इ.स. १८६१ मध्ये नागपूर ही सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी झाली.
इ.स. १८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली. टाटा समूहाने देशातील पहिला कापड उद्योग याच शहरात सुरू केला.त्याच एम्प्रेस व मॉडेल मिल होत. भारतीय स्वातंत्र्य युद्धातदेखील शहराने महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात कॉॅंग्रेसची दोन अधिवेशने नागपूरात झाली व असहकार आंदोलन नागपूरच्या १९२० च्या अधिवेशनापासून सुरू झाले.१९२५ सालि डॉ.केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी नागपूर इथे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ [आरएसएस] 'ची स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार भारताच्या एक प्रांत बनला. १९५० साली मध्य प्रदेश राज्याची निर्मिती झाली व वऱ्हाड (विदर्भ)नव्या राज्यात आला. नागपूरला भारताची राजधानी करण्याचाही प्रस्ताव होता. आज, नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते.
१९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये येऊन आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
भूगोल व हवामान
नागपूर शहरामधून नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी जाते. पैकी नाग नदी ही शहराच्या संस्कृतीशी जोडलेली आहे. ही नदी शहरातून एकूण १७ किलोमीटरचा प्रवास करते. सर्व नद्यांची एकूण लांबी ४८ किमी. आहे.
नागपूर शहर ज्या नदीवर वसले आहे त्या नाग नदीचे अनेक वर्षांच्या अनास्थेमुळे नाल्यात रूपांतर झाले होते. पिवळी नदी आणि पोरा नदीचीही हीच परिस्थिती होती. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनासंबंधित लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शहरातील नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवन प्रकल्पांचे काम हाती घेऊन ते २०२० सालच्या पावसाळ्याआधीच पूर्ण केले. त्यानंतर या नद्या पूर्वीप्रमाणेच मुक्तपणे वाहू लागल्या असाव्यात.
नागपूरचे क्षेत्रफळ २२० चौरस किलोमीटर असून समुद्रसपाटीपासूनची उंची ३१० मी (१०२० फूट)आहे. समुद्रापासून दूर असल्यामुळे पावसाळ्याव्यतिरिक्त शहराचे हवामान शुष्क व थोडे उष्ण असते. शहरातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,२०५ मिलिमीटर इतके आहे. पाऊस जून-सप्टेंबर महिन्यांदरम्यान पडतो. मार्च ते जून उन्हाळा असतो व मे महिन्यात पारा सर्वांत वर असतो.उन्हाळ्यात घराबाहेर पडणे अशक्य असते आणि जरी पडले तरी शरीर पूर्ण झाकून बाहेर पडावे लागते. या काळात नागपूरचे उच्चतम तापमान ४५° सेल्सियसपर्यंत वर जाते. हिवाळा नोव्हेंबर-जानेवारी महिन्यात असतो व तेव्हा शहराचे न्यूनतम तापमान १०° सेल्सियसच्याही खाली जाते. डिसेंबर २०१८ मध्ये सर्वात कमी म्हणजे ३.५ सेल्सियस होते.
माहिती हवामान तक्ता - नागपूर | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
जा | फे | मा | ए | मे | जु | जु | ऑ | स | ऑ | नो | डी | ||||||||||||||||||||||||||||||||||||
10 31 10 | 12 34 13 | 18 38 17 | 13 42 22 | 16 45 26 | 172 40 24 | 304 34 22 | 292 32 22 | 194 34 21 | 51 35 18 | 12 32 13 | 17 30 10 | ||||||||||||||||||||||||||||||||||||
तापमान °C मध्ये • पाउस मात्रा mm मध्ये दुवा: World Weather Information Service... | |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
इंपेरीयल कंव्हर्जन
|
प्रशासन
लोकसभा आणि विधानसभा
नागपूर मध्ये एक लोकसभा मतदारसंघ व सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. विधानसभा मतदारसंघ पुढीलप्रमाणे :
- नागपूर उत्तर
- नागपूर दक्षिण
- नागपूर पूर्व
- नागपूर पश्चिम
- नागपूर मध्य
- नागपूर दक्षिण पश्चिम
हे सगळे मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतात.
शहरी प्रशासन
नागपूरमध्ये १८६४ साली नगरपालिका स्थापन झाली व त्यावेळेस नागपूरची लोकसंख्या ८२,००० एवढी होती. नागपूर मध्ये महानगरपालिकेची स्थापना मार्च,१९५१ साली झाली. नागपूर शहराचे व्यवस्थापन नागपूर महानगरपालिका करते. महानगरपालिकेचे सभासद महापौर व उपमहापौर यांची निवड करतात व ते महानगरपालिका चालवतात. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख हा महानगरपालिका आयुक्त असतो व तो भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतो व त्याची निवड महाराष्ट्र शासन करते. नागपूर महानगरपालिकेचे काम हे वेगवेगळ्या विभागीय कार्यालयाद्वारे होते. नागपूरमध्ये दहा विभागीय कार्यालय आहेत, ते पुढील प्रमाणे :
- लक्ष्मी नगर
- धरमपेठ
- हनुमान नगर
- धंतोली
- नेहरू नगर
- गांधीबाग
- सतरंजीपुरा
- लकडगंज
- आसी नगर
- मंगळवारी
हे दहा विभाग १४५ प्रभागांमध्ये विभागल्या गेले आहेत. नगरसेवक हा प्रत्येक प्रभागाचा प्रमुख असून तो सार्वजनिक निवडणुकीद्वारे निवडला जातो.
कायदा व सुव्यवस्था
नागपूरच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी नागपूर पोलीस दल कार्यरत असून त्याचे प्रमुख पोलीस आयुक्त हे असतात. नागपूर पोलीस आयुक्त हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असतात व ते महाराष्ट्र पोलीसच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक या श्रेणीचे असतात.
नागपूर पोलीस हे पाच विभागात विभागले गेले असून उप पोलीस आयुक्त / उपायुक्त हे प्रत्येक विभागाचे प्रमुख असतात. उप पोलीस आयुक्त हेही भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असतात.
नागपुरातील नामांकित संस्था
हे शहर महाराष्ट्राची उपराजधानी असल्यामुळे सुमारे दोन आठवडे चालणारे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठदेखील येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे जन्मस्थान व मुख्यालय येथेच आहे.
नागपूरात अनेक राष्ट्रीय स्तराच्या सरकारी वैज्ञानिक संस्था आहेत- राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नॅशनल एनवायरन्मेंटल इंजिनियरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) (NEERI), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च (CICR), नॅशनल रिसर्च सेंटर फॉर सायट्रस, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल-सर्वे ऍण्ड लॅंड-यूज प्लॅनिंग, जवाहरलाल नेहरू नॅशनल अल्युमिनियम रिसर्च ॲंन्ड डेवलपमेंट सेंटर, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंडियाज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, चीफ कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव्ह्वज ऑफ द पेट्रोलियम ॲंन्ड एक्सप्लोसिव्ह्ज सेफ्टी ऑर्गनायझेशन, साऊथ सेंट्रल झोन कल्चरल सेंटर व भारतीय हवामान खात्याचे विभागीय मुख्यालय.
भारतीय सैन्याच्या दृष्टीने नागपूर महत्त्वाचे आहे. भारतीय वायुदलाच्या निर्वहन (maintenance) विभागाचे मुख्यालय नागपूरात असून दारुगोळा कारखाना, स्टाफ कॉलेज या संस्थादेखील शहरात आहेत. नागपूरजवळील कामठी (Kamptee) हे उपनगर भारतीय सैन्याने रेजिमेंटल सेंटर ऑफ इंडियन आर्मीज ब्रिगेडसाठी स्थापन केलेली लष्करी संस्था(कॅंटाॅन्मेंट बोर्ड) आहे. या लष्कर हद्दीत नॅशनल कॅडेट कोअर ऑफिसर्स ट्रेनिंग स्कूल, इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी लॉ व इतर अनेक लष्करी संस्था आहेत. त्याचबरोबर नागपूरचे राष्ट्रीय नागरी संरक्षण महाविद्यालय भारत व परदेशातील विद्यार्थांना नागरी-रक्षण व आपत्कालीन व्यवस्थापनाचे शिक्षण देते. शहरात भारतीय वायुदलाच्या आय.एल-७६ या वाहतूक विमानांचा तळ(गजराज) आहे. नागपूरच्या भौगोलिक स्थानामुळे देशांतर्गत सर्व अंतराचे मोजमाप येथील सिव्हिल लाईन्स या भागात असलेल्या शून्य मैलाच्या दगडापासून (zero milestone) केले जाते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्या गैर-शासकीय स्वयंसेवी संस्थेचे मुख्यालय नागपूर येथे डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार ह्यांनी १९२५ साली प्रस्थापित केले. मोहन मधुकर भागवत सध्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आहेत. पेशाने ते पशुवैद्य आहेत.
हल्ली नागपूरचा विकास माहिती व तंत्रज्ञान विभागात जोर पकडत आहे. व्ही.आर.सी.ई. (Visvesvaraya Regional College of Engineering) म्हणजेच आताचे VNIT अर्थात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था
टेलिफोन एक्स्चेंजला लागून एस टी पी आय (Software Technology Parks of India)ची स्थापना झाली असून तिथे बऱ्याच कंपन्यांनी आपल्या शाखा उघडल्या आहेत. त्यात प्रामुख्याने Persistent Systems Limitedचा समावेश आहे.
पर्यटन व धार्मिक स्थळे
नागपूर शहरात टेकडी गणेश मंदिर, बेसातील गुरूमंदिर, साई मंदिर, बालाजी देवस्थान, कोराडीतील देवी मंदिर, पारडीतील भवानी देवी मंदिरासह छोटी मोठी १२४० धार्मिक स्थळे आहेत. शहरातील प्रत्येक भागात मोठमोठी हिंदू प्रार्थनास्थळे असून रामनगर येथील अध्यात्म मंदिर (श्रीराम मंदिर) व रेल्वे स्थानकाजवळील श्री पोद्दारेश्वर राम मंदिर सर्वांत प्रसिद्ध आहे. दरवर्षी या दोन्ही मंदिरातुन रामनवमीस भव्य शोभायात्रा निघतात.कोराडी येथील प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिरात भक्तांची नेहमी आणि नवरात्रात तर विशेष गर्दी असते. व कॅथॉलिक सेमिनरी आहेत.
- ड्रॅगन पॅलेस टेंपल
कामठी या गावाजवळील ड्रॅगन पॅलेस हे बौद्ध विहार देखील प्रसिद्ध आहेत. या विहारामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विपश्यना केंद्र आहे.
- दीक्षाभूमी
दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला होता. दीक्षाभूमी हा जगातील सर्वात मोठा पोकळ स्तूप आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन या दिवशी देश व विदेशातील बौद्ध विशेषतः नवबौद्ध येथे अभिवादन करण्यासाठी येतात.
- सिताबर्डीचा किल्ला
सीताबर्डी किल्ल्यात इ.स. १८१७ मध्ये ब्रिटिश व राजे रघुजी भोसले यांच्यामध्ये मोठी लढाई झाली होती. तीत ब्रिटिश जिंकले व नागपूर शहर त्यांच्या ताब्यात गेले.
- विद्युत निर्मिती केंद्रे
नागपूर शहराजवळा कोराडी आणि खापरखेडा ही औष्णिक वीज निर्मितीची ठिकाणे आहेत.
नागपूर येथे एक मध्यवर्ती संग्रहालयही आहे. त्याची गणना देशातील मोठ्या व जुन्या संग्रहालयांत होते. संग्रहालयात गुप्त, मगध, मौर्य, वाकाटक, सातवाहन आदी वेगवेगळ्या राज्यकालासाठी स्वतंत्र दालने आहेत. तसेच यात पुरातत्त्व, पक्षीदालन, कला व उद्योग, चित्रकला, शस्त्रदालन आदी दालनेपण आहेत. स्थानिक लोक यास 'अजबबंगला' म्हणतात. या संग्रहालयाची स्थापना ब्रिटिश काळात सन १८६३ साली झाली आहे.[४]
येथे शून्य मैलाच्या दगडाशेजारीच गोवारी स्मारक आहे.
- तलाव
शहरातील अंबाझरी, तेलंगखेडी, गांधीसागर, सक्करदरा, गोरेवाडा व सोनेगाव हे तलाव पर्यटकात प्रिय आहेत.सेमिनरी हिल्स परिसरात सातपुडा बोटॅनिकल गार्डन आहे. पैकी अंबाझरी परिसरात रम्य उद्यान आहे. ते अगदी जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे. नागपूर शहराचा पाणीपुरवठा पूर्वी या व गोरेवाडा तलावातून होता. भोसले शासकांनी विकसित केलेल्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयात अनेक दुर्मिळ प्राणी-पक्षी आहेत. पेंच संरक्षित वने (यांचा रुडयार्ड किपलिंग यांच्या जंगल-बुक या पुस्तकात उल्लेख आहे) नागपूरापासून ४५ किलोमीटर उत्तरेस आहेत.
- मैदाने, चित्रपटगृहे आणि हाॅटेले
विदर्भ क्रिकेट संघटनेचे मैदान हे देशातील कसोटी क्रिकेट खेळल्या जाणाऱ्या ९ मैदानांपैकी आहे. नागपूर- वर्धा रस्त्यावर जामठा या गावानजीक बनलेल्या या नव्या मैदानात ४५,००० प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था आहे. नागपूरात अनेक उपहारगृहे (हॉटेल्स) आहेत. तिथे भारतीय व आंतरराष्ट्रीय पद्धतीचे जेवण मिळते. लिबर्टी व स्मृती ही लोकप्रिय चित्रपटगृहे आहेत. शहरातील पहिले मल्टिप्लेक्स वर्धमाननगरात आहे तर आणखी तीन तयार होत आहेत. या चित्रपटगृहांत मराठी, हिंदी व इंग्लिश भाषेतील चित्रपट प्रदर्शित होतात. नागपूरात हॉटेल तुली इंटरनॅशनल व हॉटेल प्राईड ही पंचतारांकित हॉटेल आहेत. सेंट्रल ॲंव्हेन्यू परिसरात अनेक लहान-मोठी उपहारगृहे आहेत.
लोकजीवन व संस्कृती
मराठी ही नागपूरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची वऱ्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. हिंदी व इंग्रजी या शहरातील इतर भाषा आहेत. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्या २१,२९,५०० इतकी होती. काही वर्षांपूर्वी नागपूरला भारताच्या सर्वांत स्वच्छ व (बंगळूर नंतरचे) दुसरे सर्वांत हिरवे शहर असल्याचा मान मिळाला आहे. नागपूरमध्ये जागेच्या किंमती अजूनतरी मर्यादेत आहेत. पण रामदासपेठ व सिव्हिल लाइन्स परिसरातल्या जागांचे भाव मात्र खूप जास्त आहेत. नागपूर महानगरपालिका पुरेसे पाणी पुरवते त्यामुळे येथे पाणीटंचाई नाही, परंतु राज्यातील वीजटंचाईमुळे येथे भारनियमन होते. शहरात वर्षभरात अनेक सण-उत्सव साजरे होतात. पोद्दारेश्वर राम मंदिर हे रामनवमीला भव्य शोभायात्रा आयोजित करते.सन २०१० हे या शोभायात्रेचे ३८वे वर्ष आहे.तसेच पश्चिम नागपूरात रामनगर येथूनही एक शोभायात्रा निघते.ती सन १९७६ साली सुरू झाली.उर्वरित भारताप्रमाणेच दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे होतात. गणेशोत्सव व दुर्गापूजा हे सण अनेक दिवस चालतात. ईद, गुरुनानक जयंती, महावीर जयंती व मोहर्रम हे सणदेखील साजरे होतात.'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपूरातच आहे. इतिहासकाळी, बांकाबाई हिने इंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणून बांकाबाईच्या, कागद व बांस वापरून केलेल्या पुतळयाची तान्हा पोळ्याच्या दिवशी (पोळ्याचा दुसरा दिवस)मिरवणूक काढण्यात येते व मग पुतळ्याचे दहन होते. तिच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या म्हणतात.
सार्वजनिक उत्सवादरम्यान मानवी वाघ हा देखील एक प्रकार येथे बघावयास मिळतो.
वाठोडा रिंग रोड येथे भव्य स्वामिनारायण मंदिर उभारण्यात आले आहे.
नागपूरात वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. महाराष्ट्र शासन आयोजित कालिदास महोत्सव आठवडाभर चालतो. या महोत्सवात अनेक संगीत-नृत्य विषयक कार्यक्रम होतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार त्यात भाग घेतात. संत्रानगरी क्राफ्ट मेळा, लोकनृत्य- महोत्सव हे कार्यक्रम दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे होतात. नागपूरकर भारतीय शास्त्रीय संगीताचे चाहते आहेत. पं.भीमसेन जोशी व इतर अनेक सुप्रसिद्ध कलाकारांनी येथे बऱ्याचदा आपले कार्यक्रम केले आहेत. मराठी नाटकांना नागपूरमध्ये मोठाच लोकाश्रय मिळतो.
नागपूर आकाशवाणी, नागपूर दूरदर्शन ही माध्यमे स्थानिक बातम्या, घडामोडी व कार्यक्रम प्रसारित करतात. लोकमत, सकाळ, तरुण भारत व लोकसत्ता ही मराठी दैनिके येथून निघतात. हितवाद,नवभारत,लोकमत समाचार, टाईम्स ऑफ इंडिया यासारखी अनेक इंग्रजी व हिंदी वृत्तपत्रे देखील येथे सहज मिळतात.
येथे जवळच असलेल्या बुटीबोरी या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ फ्रीडम ऑफ प्रेस (प्रसिद्धीमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा पुतळा) आहे. हा जगातील अशा प्रकारचा पहिलाच पुतळा असल्याचा दावा करण्यात येतो.[५]
प्रमुख स्थळे
मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ, विधान भवन, जनरल पोस्ट आफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, इत्यादी अनेक शासकीय कार्यालये सिव्हिल लाइन्स भागात आहेत. सीताबर्डीत शहराची प्रमुख बाजारपेठ आहे सीताबर्डीचा मुख्य रस्ता खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. याच भागात सिताबर्डी किल्ला आहे. धर्मपेठ (धरमपेठ)येथे मोठी दुकाने, उपहारगृहे व बाजारपेठ आहे. रामदासपेठेत अनेक कार्यालये व दुकाने आहेत. इतवारी येथे मालाच्या किरकोळ/घाऊक विक्रीची प्रसिद्ध बाजारपेठ आहे. महाल व ईतवारी हा शहराचा जुना भाग असून येथे छोट्या गल्ल्या असल्याने फार गर्दी असते. कळमना येथे संत्री, धान्ये व कृषी उत्पन्नाची मोठी बाजारपेठ आहे. लक्ष्मी नगर, आठ रस्ता चौक, रामदासपेठ, बजाज नगर, सुरेंद्र नगर, नीरी, अजनी, तात्या टोपे नगर, खामला, शंकर नगर, धरमपेठ, सिमेंट रोड, कोर्पोरेशन कॉलनी या पश्चिम नागपूरमधील प्रसिद्ध वस्त्या आहेत. रामदासपेठ ह्या भागात भरपूर रुग्णालये आढळतात. आठ रस्ता चौकात आठ दिशातून आठ रस्ते येऊन मिळतात. नीरीच्या भल्या मोठ्या जंगलामुळे हिवाळ्यात येथे कमालीची थंडी पसरते.
येथील जाटतरोडी या परिसरातील बोरकरनगर येथे 'गांधी विहीर' आहे. महात्मा गांधी नागपूर येथे कॉग्रेसच्या अधिवेशनासाठी आले आले त्यांनी ८ नोव्हेंबर १९३३ रोजी या विहिरीचे उद्घाटन केले. कमला नेहरू यांनी ही विहीर खोदण्यासाठी आपली सोन्याची बांगडी काढून दिली असे सांगण्यात येते. बाकी धनराशी ही लोकांच्या सहभागातून जमा झाली.[ संदर्भ हवा ] ही विहीर केवळ १२ दिवसात खोदून पूर्ण झाली. यासाठी अनेक लोकांनी श्रमदानही केले.[६]
नागभूषण पुरस्कार
नागपूरच्या नागभूषण ॲवार्ड फाऊंडेशन या संस्थेतर्फे राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व त्याद्वारे विदर्भाचा लौकिक वाढविणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा युवकाला नागभूषण हा पुरस्कार देण्यात येतो.[७]
अर्थव्यवस्था
नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपूरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे. इ.स. २००४ साली नागपूरात रु. ५,००० कोटी इतकी गुंतवणूक झाली आहे. नागपूरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मालसामान व प्रवासी केंद्राची (मल्टिमॉडल इंटरनॅशनल हब एरपोर्ट ॲट नागपूर-MIHAN) निर्मिती होत आहे. हा प्रकल्प आग्नेय व मध्य-पूर्व आशियातील सामान-वाहतुकीकरिता महत्त्वाचा थांबा (break of bulk) बनणार आहे. विमाने बनवणाऱ्या जगप्रसिद्ध बोइंग कंपनीने नागपूरात १८.५ कोटी डॉलर भांडवलाचा प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
क्षेत्रफळानुसार बुटिबोरी आशियातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत आहे. बुटिबोरीतील सर्वांत महत्त्वाची संस्था म्हणजे इंडो-रामा सिंथेटिक्स आहे तर केईसी, ह्युंदाई, एसीसी निहोन कास्टिंग्ज, अनेक टेक्सटाइल उद्योग, विडियोकॉन हे इतर मुख्य प्रकल्प येथे आहेत. अनेक मध्यम आकाराचे उद्योग व महाराष्ट्रातील पहिले फूड पार्क येथे आहे. मुंबई-ठाणे-पुणे औद्योगिक पट्ट्याची क्षमता जवळजवळ संपल्यामुळे बुटिबोरी वसाहतीत अनेक उद्योग येत आहेत.
शहरातील पश्चिम भागातील हिंगणा औद्योगिक वसाहतीत जवळजवळ ९०० लहान व मध्यम आकाराचे उद्योग आहेत. महिंद्र आणि महिंद्र, नेको कास्टिंग, बजाज ऑटो ग्रुप, कॅंडिगो, अजंता टुथब्रशेस, सन्विजय ग्रुप, विको लेब्रॉरेटरीज, दिनशा, हल्दीराम हे उद्योग विशेष उल्लेखनीय. शहराचे भौगोलिक स्थान, सोयी-सुविधा, स्वस्त मनुष्यबळ यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात पुणे-मुंबई नंतर नागपूरलाच पसंती दिली जाते. नागपूरात १०,००० कोटी रुपये गुंतवणूक असलेले विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
शिक्षण
नागपूर मध्यवर्ती भारताच्या प्रमुख शैक्षणिक केंद्र असून देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यायला येतात. नागपूरमध्ये विद्यापीठ आहे. नागपूरमधील सगळी महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्नित आहेत. याशिवाय नागपूर मध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) व महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ असे तीन विद्यापीठ आहेत.
नागपूरातील शिक्षण संस्थांमधून मराठी, इंग्रजी व हिंदी माध्यमातून शिक्षण मिळते. येथील शाळा महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न आहेत. केंद्रीय बोर्डाचा (CBSE) अभ्यासक्रम शिकवणाऱ्याही शाळा शहरात आहेत. येथील महाविद्यालये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रात येतात. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचे विभागीय केंद्र नागपूर येथे आहेत व मुक्त विद्यापीठाची अनेक अभ्यासकेंद्रे आहेत. नागपूर शहराची साक्षरता ८९.३% आहे.
नागपूरात दरवर्षी आसपासच्या जिल्ह्यांमधून हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण प्राप्ती साठी हजेरी लावतात. येथे आय.आय.टी.जे.ई.ई व इतर अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या तयारी करून घेणारे शेकडो कोचिंग क्लासेस उघडले आहेत.
नागपूर मध्ये विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान व भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान हे राष्ट्रीय पातळीवरचे अभियांत्रिकी संस्थान असून याशिवाय बरीच स्यायत्त अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.
नागपूर हे वैद्यकीय क्षेत्रात भरपूर प्रगत असून इथे अनेक नामवंत संस्था व रुग्णालये आहेत. नागपूर मध्ये अखिल भारतीय वैद्यकीय संस्था चालू होणार असून याशिवाय नागपूर मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व शासकीय दंत महाविद्यालय अशी चार शासकीय महाविद्यालय आहेत. तसेच नागपूर मध्ये वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या खाजगी संस्था पण भरपूर आहेत.
नागपुरातील काही महाविद्यालये
अभियांत्रिकी महाविद्यालय
शासकीय
- विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान
- भारतीय सूचना प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर.
- लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्था, नागपूर. (एल.आई.टी)
- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर.
खाजगी/निम-शासकीय
- स्वायत्त महाविद्यालये
- (नागपूर विद्यापीठ संलग्नित)
- रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय, नागपूर.
- यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर. (वाय.सी.सी.ई)
- जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर.
- ईतर नागपूर विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये
- प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर. (पी सी.ई.)
- कर्मवीर दादासाहेब कन्नमवार (के.डी.के.) अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर.
- सेंट. व्हिन्सेंट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर.
- एस. बी. जैन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूर.
- नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
- तुलसीरामजी गायकवाड अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूर.
वैद्यकीय संस्था
शासकीय
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.
- शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर.
खाजगी/निम-शासकीय
- एन.के.पी. साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर.
- भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविद्यालय, नागपूर.
कृषी संस्था
- कृषी महाविद्यालय, नागपूर. (स्थापना-१९०६)
पशुवैद्यकीय संस्था
- नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.
मत्स्यविज्ञान संस्था
- मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूर.
ईतर संस्था
- आय.एम.टी. व्यवस्थापन संस्था
- इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
- एस एफ एस कॉलेज
- जी एस कोलेज
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, नागपूर
- शिवाजी विज्ञान महाविद्यालय
- हिस्लॉप महाविद्यालय
- संताजी महाविद्यालय
नागपुरातील काही मोठ्या शाळा
- जवाहर नवोदय विद्यालय नागपूर
- केंद्रीय विद्यालय
- न्यू इंग्लिश हाय स्कूल
- डी पी एस
- माउंट कार्मल स्कूल
- सरस्वती विद्यालय
- सेंटर पॉइंट स्कूल
- सांदीपनी
- सेंट जॉन्स हायस्कूल
- सोमलवार हायस्कूल
- हडस हायस्कूल
- हिंदू ज्ञानपीठ शाळा
- जाईबाई चौधरी ज्ञानपीठ
- तिडके महाविद्यालयीन
वाहतूक व्यवस्था
रेल्वे
नागपूराच्या भौगोलिक स्थानामुळे येथील रेल्वे स्थानक महत्त्वाचे जंक्शन बनले आहे व देशातल्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या रेल्वे गाड्या (विशेषतः मुंबई, दिल्ली, चेन्नई व कोलकाता या महानगरांना जोडणाऱ्या) ते मध्यवर्ती असल्यामुळे येथूनच जातात. नागपूर रेल्वे स्थानकाबरोबरच अजनी, इतवारी, कळ्मना, कामठी व खापरी ही स्थानके शहराच्या जवळ आहेत.
नागपूर स्टेशनात जवळपास १६० रेल्वे गाड्या थांबतात. त्यात प्रवासी, दुरंतो एक्सप्रेस, मेल, राजधानी एक्सप्रेस, गरीब रथ ह्यांचा प्रामुख्यानी समावेश आहे. त्यात ६५ गाड्या दररोज धावतात. दररोज जवळपास दीड लाख प्रवासी नागपूर रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात.
नागपूर रेल्वे स्थानक तयार झाल्यानंतर १५ जानेवारी, इ.स. १९२५ साली तत्कालीन ब्रिटिश गवर्नर फ्रॅंक यांच्या हस्ते या स्थानकाच्या इमारतीचे उदघाटन करण्यात आले. सद्यस्थितीत या स्थानकावर १० प्लेटफॉर्म असून पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशांकडून गाड्यांची ये-जा सुरू असते.
रस्ते वाहतूक
भारताच्या दोन महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग (कन्याकुमारी-वाराणसी क्र.७) व (हाजिरा- कोलकाता क्र.६) नागपूरात एकमेकास मिळतात. तसेच महामार्ग क्र.६९ नागपूर-भोपाळ येथूनच सुरू होतो. दोन आशियाई महामार्ग ए.एच ४७- आग्रा-मटारा (श्रीलंका) व ए.एच ४६ खरगपूर-धुळे येथून जातात. नागपूर आपल्या चांगल्या दर्जाच्या रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. नागपूर इनलॅंड पोर्ट हे देशातील सर्वाधिक वेगाने विस्तारणारे अंतर्गत बंदर (Inland port) ठरले आहे.शहरातल्या शहरात वाहतुकीचा प्रश्न मात्र येथील रहिवाशांना भेडसावत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची सेवा नागरी व ग्रामीण जनतेस अपुरी ठरत आहे. येथे इंटिग्रेटेड बस व मोनोरेल प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. नव्या राष्ट्रीय राजमार्ग जो नागपूर ते मुंबई ह्या प्रमुख महाराष्ट्रातील शहरांना जोडेल, त्याचे बांधकाम सुरू आहे.
वैदर्भीय प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, याकरिता पुढाकार घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने गुरुवार (ता. आठ) (महिना, वर्ष, शतक???)पासून नागपूर ते पुणे वातानुकूलित व्हॉल्व्हो (शिवनेरी) बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
विमान वाहतूक
नागपूरातील विमानवाहतूक नियंत्रण केंद्र देशातील बऱ्यापैकी व्यस्त आहे. दिवसाला ३००हून जास्त विमान उड्डाणे या शहरावरच्या आकाशातून जातात. देशातर्गत विमानवाहतूक सेवा इंडियन एरलाइन्स, जेट, एर डेक्कन, इंडिगो, गो एर, स्पाईस जेट, जेट लाईट इत्यादी नागपूरला मुंबई, दिल्ली, हैद्राबाद व कोलकाता,पुणे,बंगरुळ, चेन्नई, इंदूर, अहमदाबाद, जयपूर, कोची, नांदेड, औरंगाबाद, रायपूर या शहरांना जोडतात. १ ऑक्टोबर २००५ रोजी नागपूरातील सोनेगाव विमानतळास आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला व त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव ठेवले. सोनेगाव-नागपूरचा विमानतळ हा मध्यवर्ती भारताच्या महत्त्वाचा विमानतळ असून एर अरेबिया (शारजा), एर इंडिया (बँकॉक), कतार एरवेझ (दोहा) यांची आंतरराष्ट्रीय उड्डाणे येथून होतात.
नागपूर विमानतळ हे देशाच्या मध्यभागी असल्याने देश-विदेशातील विमाने नागपूरच्या आकाशातून जातात. त्यामुळे नागपूरला स्टॅण्डबाय एरपोर्ट म्हणून मान्यता मिळाली आहे. येथे दोन एरोब्रिज आहेत.
नागपूर शहरात इ.स.२००६ साली मल्टिमोडल इंटरनॅशनल हब एरपोर्ट अॅट नागपूर अर्थात मिहान प्रकल्प सुरू झाला. नागपूराच्या भारताच्या मध्यवर्ती स्थानाचा उपयोग करून, रस्ते व रेल्वे वाहतुकीचे जाळे जोडून सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या मालवाहतूक व प्रवासी वाहतूक केंद्रामध्ये रूपांतर करणे, हे मिहान प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. हा मोठ्याच आर्थिक गुंतवणुकीचा प्रकल्प आहे[८]. मिहान प्रकल्प आग्नेय आशियाकडील व पश्चिम आशियाकडील मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा थांबा बनणार आहे. या मालवाहतूक प्रकल्पामुळे नागपूर शहराची तसेच विदर्भ विभागाची आर्थिक प्रगती जोमाने होईल. विमानउत्पादक कंपन्यांमधील अग्रगण्य अश्या बोइंग कंपनीचे येथे निर्वहन (?) केंद्र उभारले जाणार असून त्यासाठी १८.५ कोटी अमेरिकी डॉलर गुंतवणूक प्रस्तावित आहे[ संदर्भ हवा ].
मेट्रो
बहुचर्चित आणि नागपूरची नवी ओळख निर्माण करणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने मंजूरी प्रदान केली आहे. हा प्रकल्प सुमारे २५ किलोमीटर लांबीचा राहणार असून, जानेवारी २०१५मध्ये या कार्याला प्रारंभ झाला. नागपूर हे महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर मेट्रो रेल्वेसाठी तयार झाले असून, या कार्यावर १२५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे काम डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण होईल अशी अपेक्षा होती, पण तसे होऊ शकलेले नाही.
नागपूरची लोकसंख्या २०२०साली २५ लाख असून, २०३० पर्यंत ती ५० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे (दहा वर्षात दुप्पट?). त्यामुळे नागपूर शहर मेट्रो रेल्वे सेवेसाठी पात्र ठरणार आहे. मिहान प्रकल्पाच्या प्रारंभी प्रकल्प सल्लागार एल ॲन्ड टी रॅम्बोल यांनी २००१ मध्ये आपल्या सक्षमता अहवालात मेट्रो रेल्वेची प्रस्तावना केलेली आहे. त्यांनी तर १०० किलोमीटरपर्यंत मेट्रो रेल्वे प्रस्तावित केली होती. मात्र शासनाने २५ किलोमीटरपर्यंत तिचा मार्ग राहील असे म्हणले आहे. दरम्यान यातील दुसऱ्या टप्प्यात पारडी ते हिंगणा, कस्तुरचंद पार्कचा एक विभाग जोडण्यात येईल. तर पहिल्या टप्प्यात ऑटो मोटिव्ह ते मिहान असा मार्ग प्रस्तावित केला होता. एकंदरीत हा मेट्रो रेल्वेचा प्रकल्प नागपूरसाठी वरदान ठरेल..
मिहान
बोइंग
नागपूरच्या मिहान प्रकल्पात सुरू असलेले बोइंग एमआरओचे काम २०१३ जून अखेर प्रत्यक्ष एमआरओ कार्यान्वित होईल, असे सांगितले जात होते..
विश्रामगृह व हॉटेल्स
नागपूरला बरीच विश्रामगृहे, हॉटेल्स व मोटेल्स उपलब्ध आहेत. काही पंचतारांकित हॉटेल्सची यादी अशी :
- रेडीसून ब्लू हॉटेल
- प्राईड हॉटेल
- सन 'न' सॅंड
काही त्रितारांकित हॉटेल्सची यादी अशी :
- हॉटेल सेंटर पॉइंट
- तुली इंटरनॅशनल
एम्प्रेस सिटी येथे "ताज हॉटेल" बांधण्यात येत आहे.
हे सुद्धा पहा
- नागपूर जिल्हा
- मिहान
- गोवारी स्मारक
संदर्भ
- ^ /NMCEIP/city_info.jsp[permanent dead link]
- ^ ""The world's largest cities"".
- ^ [१]
- ^ लोकमत,नागपूर, ई-पेपर-हॅलो नागपूर, दि. २२/०९/२०१३ Archived 2016-01-30 at the Wayback Machine. दि. २२/०९/२०१३ रोजी ११.०८वाजता बघितले तसे.
- ^ लोकमत,नागपूर,ई-पेपर दि. १५/१०/२०१३ पान क्र.१ Archived 2013-10-23 at the Wayback Machine. दि.१५/१०/२०१३ रोजी १४.३९ वाजता जसे दिसले तसे.
- ^ "लोकमत,नागपूर-ई पेपर-दि.०२/१०/२०१३,हॅलो नागपूर पुरवणी,पान क्र. १ व २". 2016-01-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-09-22 रोजी पाहिले.
- ^ तरुण भारत, नागपूर-ई-पेपर-आपलं नागपूर पुरवणी - दि. ०७/१०/२०१३,पान क्र.१
- ^ "मिहान इज बिगेस्ट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट (मिहान सर्वांत मोठा विकासप्रकल्प आहे)" (इंग्लिश भाषेत). 2012-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-12-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
- नागपूर शहराचा नकाशा
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
- नागपूर एन.आय.सी
- नागपूर पर्यटन-विकिट्रॅव्हेल
- नागपूरचे गॅझेट-१
- नागपूरचे गॅझेट-२ Archived 2009-08-23 at the Wayback Machine.