नागपुरी म्हैस
नागपुरी म्हैस ही एक विदर्भातील भारतीय म्हशीची एक जात आहे. प्रतिकूल हवामानात दूध आणि दुष्काळी गुणांचा उत्तम मेळ घालणाऱ्या म्हशींच्या जातींमध्ये हिची गणना होते. नागपुरी म्हैस ही एक मूळ भारतीय जात आहे.[१] या जातीचे ‘बेरारी’, ‘गावराणी’, ‘पूर्णाथडी’, ‘वऱ्हाडी’, ‘गवळाऊ’, ‘आर्वी’, ‘गंगौरी’, ‘शाही’, 'एलीचपुरी' आणि ‘चंदा’ असे विविध उपप्रकार आढळून येतात.[२][३]
मूळ
नावाप्रमाणेच नागपुरी म्हैस ही महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील एक मूळ गावरान बहुमुखी जात आहे. या जातीचे प्राणी विदर्भातील खडतर-अर्ध-शुष्क परिस्थितीशी उत्तम प्रकारे जुळवून घेतात.
शारीरिक वैशिष्ट्ये
नागपुरी म्हशीच्या कातडीचा रंग काळा आहे. [१] ही जात काळी असून चेहऱ्यावर, पायांवर आणि शेपटीच्या टोकांवर पांढरे ठिपके असतात. तथापि, नागपुरी म्हशीच्या उपप्रकारांपैकी एक असलेल्या "पुरनथडी" जातीचा रंग किंचित तपकिरी असतो. शिंगे लांब, सपाट आणि वक्र असतात, मानेच्या प्रत्येक बाजूला जवळजवळ खांद्यापर्यंत मागे वाकतात आणि शिंगाची टोके बहुतेक वरच्या दिशेने वळलेले असतात. नागपुरी म्हशीची सरासरी उंची १३५ सेमी तर रेड्याची १४५ सेमी पर्यंत असते. छातीचा घेर रेडा व म्हशीचा अनुक्रमे २१० आणि २०५ सेमी इतका असतो.
संगोपन आणि उत्पादन
म्हशीची अर्धबंदिस्त व्यवस्थापन प्रणालीमध्ये देखभाल केली जाते. [४] रेड्याच्या शरीराचे वजन सरासरी ५२५ किलोग्रॅम तर म्हशीचे वजन ४२५ किलो पर्यंत असते. [५] या भागातील म्हशी आणि गायी प्रामुख्याने दुग्धोपादनासाठी पाळल्या जातात. प्रति वेत सरासरी दूध उत्पादन १०३९ किलोग्रॅम असून ते ७६० - १५०० किलोग्रॅम च्या दरम्यान आढळून येते. तर दुधातील फॅट चे सरासरी प्रमाण ७.० - ८.८ % पर्यंत आढळून येते. [६] दुग्धोत्पादन आणि प्रजननक्षमतेच्या बाबतीत नागपूर परिसरातील ४७ अंश सेल्सियस पर्यंतच्या प्रतिकूल हवामानाचा सामना करू शकते. [६] बैलापेक्षा थोडा सुस्त आणि हळूहळू काम करणारा असला तरी काही ठिकाणी रेडा शेतीकामासाठी वापरला जातो.[४]
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ a b Banerjee,G.C, Animal Husbandry (8th edition)
- ^ "उष्ण हवामानात टिकून राहणारी पूर्णाथडी म्हैस". ॲग्रोवन. ४ मार्च २०२४ रोजी पाहिले.
- ^ A. R. Sirothia, D.S. Kale and S.B. Kamble
- ^ a b A Report on Nagpuri Buffalo by Kazi Abdus Sobur
- ^ Banerjee,G.C, Animal Husbandry
- ^ a b Lactational performance of Shahi strain of Nagpuri buffalo