नांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाज
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात, पैनगंगेच्या परिसरात निसर्गरम्य अशा घनदाट जंगलात आणि गिरीकुहरातून आदिवासींची वस्ती पहायला मिळते. आदिवासी जमातीपैकी परधान, गोंड, आंध, पारधी, फासेपारधी,भिल्ल, कोलाम, कोमा, थोटी यांचे तांडे आणि खेडी मोठ्या प्रमाणात आढळतात.या जमातीच्या भाषेवर मराठी आणि तेलुगू भाषेचा काही प्रमाणात प्रभाव असला तरी त्यांच्या मूळच्या भाषाच अजूनही बोलल्या जातात.
जिल्ह्यातील आदिवासी जमाती
मानव वंशशास्त्रदृष्ट्या वन्यजाती हा भारतीय लोकसमाजाचा प्राचीनतम् विभाग आहे. भारतीत प्राचीन काळी प्रोटो-ऑस्ट्रालॉईज, मंगोलाईड व नेग्रिटो हे भिन्न वंश राहत होत.सांप्रत आपण ज्यांना आदिवासी म्हणतो त्यांची उत्पत्ती वरीलपैकी कोणत्यातरी मानव वंशापासून झाली असली पाहिजे, हे मत आता दृढ झाले आहे. आदिवासी हे लोक भारतातील आद्य वसाहतकार होत. ते आत्मसंरक्षणास तितकेसे समर्थ नव्हते. जेव्हा भादेरून आर्य आणि द्रविड लोक आले, तेव्हा त्यांच्यापुढे आदिवासींचा टिकाव लागला नाही. आणि आदिवासी डोंगर, दऱ्या-खोऱ्यात तथा जंगलाचा आश्रय घेऊन राहू लागले. तसेच आजही ते अशाच जागी कायमची वस्ती करून राहिलेले दिसतात.
राजगोंड, गोंड किंवा कोईटोर
सन १९८१ च्य जनगणनेनुसार नांदेड जिल्ह्यातील आदिवासींमध्ये गोंड आणि राजगोंड यांची संख्या जास्त आहे. आपण त्यांना गोंड असे म्हणत असलो तरी ते स्वतःला कोईटोर म्हणून घेतात. राजपुतांनी प्रथम गोंडाना आपल्या सत्तेखाली आणून त्यांना हिंदुधर्मात घेतले[१] असे कळते. राजपुतांनी टोळी प्रमुखाशी रोटीबेटी व्यवहार सुरू केला व यातून राजगोंड निर्माण झाले. ते स्वतःला गोंडापेक्षा श्रेष्ठ मानतात. ते गळ्यात जानवेही घालतात. हलक्या जमातीतील लोकांबरोबर पाणी व हुक्का पीत नाहीत. या राजगोंडानी १३ ते १७ व्या शतकापर्यंत मध्यप्रदेशात (गोंडवन) अनेक राज्ये स्थापिली होती. मंढला, गढ, देवगड, खेरळा व चांदा ह्या त्यांच्या राजधान्या होत्या. किनवट परिसरातील माहूरचा भाग बल्लाळपूरच्या गोंड राज्यात होता. [२] हा भाग इ. स. १३५० पर्यंत बहामनीच्या ताब्यात येऊ शकला नाही. गोंड राज्यात हा भाग समाविष्ट असल्याने त्या काळात येथे गोंड आणि राजगोंडाची वस्ती वाढली.[३]
माहूर भागातील अदिवासींमध्ये गोंडाची वस्ती अधिक आहे.
येथील गोंड जवळ-जवळ अर्धनग्न राहणारे, सहसा अंघोळ न करणारे, शेंडू ठेवून बाकीचा चमनगोटा करणारे, कानात अनेक वलये, कमरेला चंची, सुरा, खांद्यावर कुऱ्हाड बाळगणारे आहेत. स्त्रिया सामान्यपणे फक्त कटीवस्त्र आणि कधी सधी एखादे उत्तरीय वापरतात. त्यांच्या कानात पितळेची लहान लहान वलये असतात. गळ्यात मण्याच्या माळा, साखळ्या, लोखंडी व पितळी सरी अडकवलेली असतात. त्या नाकात बिंदी, नथनी घालतात. दंडात कोपऱ्या, पायात बेड्या इ. दागिणेही प्रचारात आहेत. त्यांच्यात अंगावर गोंदवून घेण्याचीही प्रथा आहे. त्या आपल्या तोंडावर, दंडावर आणि विशेष म्हणजे नितंबावरही गोंदवून घेतात.[४] हे गोंदवणच मृत्यूनंतर त्यांच्याबरोबर भगवान देवापुढे साक्ष देण्यासाठी येते अशी त्यांची कल्पना आहे. त्यांच्या या गोंदवण्यातही एक प्रकारची कला आहे. गोंड राजवंशातील दहावा परंतु चंद्रपूर येथे राज्य करणारा पहिला राजा खांडक्या बल्लाळशहा याने १४७२ च्या सुमारास घातला व त्याची राजधानी बल्लारपूर येथून चंद्रपूरास हलवली.[५][६] तेल ठाकूर नावाच्या वास्तुशिल्पकाराने परकोटाचा नकाशा तयार केला व साडेसात मैल परिघाची आखणी करून पायाभरणी केली. कर्णशहाचा नातू धुंड्या रामशहा (१५९७ - १६२२) याच्या कारकिर्दीत परकोटाचे काम पूर्ण झाले. परकोटाचा आकार दीर्घ वर्तुळाकार असून पूर्व-दक्षिण बाजूंना झरपट तर पश्चिमेस इरई नदी वाहते. परकोटाच्या चार प्रवेशद्वारांची नावे जटपुरा, अचलेश्वार, पठाणपुरा व बिनबा अशी आहेत, तर त्यास बगड, हनुमान, विठोबा, चोर व मसाण अशा पाच खिडक्या आहेत. खिडक्यांचा आकारही प्रचंड असून त्यातून ट्रक-ट्रॅक्टर यांची वाहतूक सहज होत असते. ही सर्व नावे भोसल्यांच्या अमलात पडली आहे. जटपुरा दरवाज्यावर गणेशराव जाट, अचलेश्वार दरवाज्यावर भानबा माळी, पठाणपुरा दरवाज्यावर अलिखान पठाण आणि बिनबा दरवाज्यावर बिनबा माळी असे जमादार होते. ते सगळ्या प्रकारच्या आवक-जावकीची नोंद ठेवत असत. त्यांच्याच नावावरून पुढे या दरवाज्यांना नावे देण्यात आली.[७]
परधान
नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर परिसरात परधान या अदिवासी जमातीची वस्ती बरीच मोठी आहे. परधान गोंड राजाचे पुरोहित व भाट म्हणून काम करीत असत.[८] त्यांना दरबारात गोंडराजांच्या वंशावळी ठेवण्याचे काम करावे लागत असे. परधानांना 'पन' पहाडी(पठारी), देसाई, मोकाशी किंवा भाऊ अशी नावे आहेत. यांची उत्पत्ती दोन प्रकारे सांगितली जाते. जो पराचे म्हणजेच दुसऱ्याचे धान्य खातो तो परधान होय अशी एक कथा आहे, तर दुसरी पहिला परधान एका धान्याच्या परावर(बांधावर) जन्मला आणि परधान जमात अस्तित्वात आली.[९] परधान हे आपल्यापैकीच आहेत असे गोंड सांगत असले तरी ते परधानाशी लग्न संबंध करीत नाहीत. परधान गोंडाकडे जेवतात, पण गोंड परधानाकडे जेवत नाही. कारण त्यांना ते हीन समजतात. हरधा-गोंडसंबंध हा 'नोकर-मालक' प्रकारातील आहे. परधान आपले गोत्र, वंशावळ, रूढी, परंपरा ह्या गोंडाच्या परंपरातूनच मानतात.
मध्य प्रदेश राज्यातील एक आदिवासी जमात. यांची वस्ती महाराष्ट्रातील विदर्भातही आढळते. १९७१ च्या जनगणनेनुसार यांची लोकसंख्या ३,९८५ होती.[१०] परधान, देसाई, पठारी, पनाल या नावांनीही ते ओळखले जातात. या प्रत्येक नावाची व्युत्पत्ती जमातीत सांगितली जाते. गोंडांच्या आश्रयाने व त्यांच्या आसपास हे राहतात. मूळ गोंड ज्या सात भावांपासून झाले, त्यांतल्या सातव्या भावाचे हे वंशज आहेत, असे गोंडी दंतकथा सांगते. गोंडांची ही एक गौण शाखा असून गोंडांचे हे राजघराण्यातले प्रधान, पुजारी व भाट आहेत. आंध्र, महाराष्ट्र, मध्य प्रदेश व ओरिसा या ठिकाणी जिथे जिथे गोंड वस्ती आहे, तिथे तिथे काही परधानही आढळतात. यांचे रीतिरिवाज व कुळगोत्रे गोंडांप्रमाणेच आहेत धार्मिक विधींतील वस्तू व अंत्यसंस्काराच्या वेळेचे कपडे ते घेतात, म्हणून गोंड यांना कमी लेखतात. मध्य प्रदेशात यांना परगनिहा, देसाई अशीही बिरुदे आहेत. छत्तीसगढच्या बाजूला त्यांना ‘परधान पठारिया’ म्हणतात. बालाघाटाच्या बाजूला त्यांना ‘मोकाशी’ म्हणतात. गोंडांना रामराम करताना परधान त्यांना ‘बाबू जोहार’ असे म्हणतात पण गोंड परधानांना ‘जोहार पठारी’ असे म्हणतात. परधान किंगरी उर्फ एकतारी घेऊन तिच्यावर गोंडांची पुराणगीते गात असतात. गोंडांच्या वंशावळी व दैवतकथा यांच्याबद्दल तंतोतंत माहिती त्यांना असते. गोंडांच्या घरी जाऊन गाणी गाऊन ते देतील ती भीक घेऊन उदरनिर्वाह करणे, ही पूर्वपरंपरा असल्यामुळे परधान लोकांना गौणत्व आले आहे. जिथे लग्नसमारंभ व दुसरे काही कार्य असेल, तिथे त्यांना जावे लागते. त्यामुळे ते एका जागी स्थिर राहू शकत नाहीत. भटकत राहिल्यामुळे पुष्कळदा मिळेल त्याच्या हातचे अन्नही त्यांना भक्षण करावे लागते.
परधानांत राजपरधान, गोंडा परधान आणि थोटिया परधान असे तीन पोटभेद आहेत. राज गोंड पुरुष व परधान स्त्री यांच्यापासून झालेली संतती म्हणजे राजपरधान. पूर्वी बडा देवाची पूजा करणाऱ्या पुजाऱ्याला ब्रह्मचर्य पाळावे लागे. एकदा पुजारी स्त्रीच्या नादी लागून पळाला. त्या देवाची पूजा करायला कोणी राहिले नाही. त्या वेळी एक किंगरी स्वर्गातून एका राजपरधानाच्या मांडीवर पडली. तेव्हापासून पुजाऱ्यांना लग्न करण्याची अनुज्ञा बडा ऊर्फ बुढा देवाने दिली. थोटिया ही परधानांची मूलतः अनौरस संतती आहे. गोंडा परधान म्हणजे गोंडा व परधानांची मिश्र संतती. याशिवाय चंद्रपूर भागात माडे ऊर्फ माडिया गोंड आहेत, तसेच माडे परधान आहेत. छत्तीसगढातल्या मैदानी भागातल्या परधानांना खलोटिया परधान म्हणतात. छिंदवाड्यात देवगढच्या परधानांना देवगढिया परधान म्हणतात. छत्तीसगढात उपाध्यायाचे काम करणारे जे परधान आहेत, त्यांना गैता म्हणतात. बांबू कापून बुरूडकाम करणाऱ्यांना काडेर असे नाव आहे. चंद्रपूरजवळ परधानांचे दोन भाग आहेत : गोंड-पठारी व चोर-पठारी. रायपूर भागात गोंड स्त्रियांना इतर जातींपासून झालेल्या संततीला पठारी म्हणतात.
मुले-मुली वयात आल्यानंतर विवाह होतात. लग्नात देज देण्याची प्रथा आहे. मुलाकडे देज देण्यास पैसे नसल्यास तो मुलीच्या घरी काम करतो. बहुतेक विवाह वडीलधाऱ्या व्यक्ती ठरवितात. वधूने काळ्या पोतीची माळ घातली की, ती पत्नी झाली असे समजतात.
परधानांत नवरामुलगा लग्नाच्या वेळी वधूच्या घरी जातो, त्या वेळी त्याच्या हातात खंजीर असतो आणि त्याने घोंगडी पांघरलेली असते. तिथे एक वर्तुळ काढलेले असते. त्याला तो पाच प्रदक्षिणा घालतो व वधूचा हात पकडतो. तिने मूठ घट्ट वळलेली असते, ती सोडवून तो तिच्या करंगळीत एक लोखंडाची अंगठी घालतो. नंतर आपला उजवा पाय तिच्या पायावर दाबून धरतो आणि हा लग्नविधी संपतो. त्यांच्यात घटस्फोटास मान्यता आहे तसेच सख्ख्या भावाची विधवा पत्नी धाकट्या दिराबरोबर लग्न करू शकते.
प्रेत पुरण्याची व जाळण्याची पद्धत त्यांच्यात रूढ आहे. अग्निदहनाचे विशिष्ट संस्कार असून ते मृताचा ज्येष्ठ मुलगा करतो. दहाव्या दिवशी स्त्रिया रक्षा गोळा करतात. सहा महिन्यानंतर किंवा वर्षाने श्राद्ध करतात. वर्षानंतर मृताच्या नावाने कुंडनामक एक विधी करतात. [११]
भिल्ल
भिल्ल ही भारतातील लोकसंख्येने मोठी असलेली एक अनुसूचित जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र व त्रिपुरा या राज्यांत आढळते. अरवली, विंध्य व सातपुडा पर्वतांवरील दाट वन्य पठारे हे त्यांचे राहण्याचे मूळ ठिकाण होय. वैदिक वाङ्मयात भिल्लांचा उल्लेख निषाद म्हणून असल्याचे विद्वान मानतात. त्यांचा पौराणिक वाङ्मयातूनही उल्लेख आढळतो. भिल्ल हा शब्द विल्सन यांच्या मतानुसार द्राविडी भाषासमूहातील ‘विल्लू’ वा ‘बिल्लू’ (धनुष्यबाण) या शब्दापासून आलेला आहे. १९७१ च्या जनगणनेनुसार भिल्लांची लोकसंख्या ५१,९९,०८६ इतकी होती.[१२] त्यांची भाषा भिल्ली असून तिच्या अनेक बोली भाषा आहेत. त्यांत अहिराणी, पावरी इ. बोली भाषा असून प्रादेशिक भाषांतील शब्दांची सरमिसळ झालेली आहे. भिल्ल गरासिया, ढोली भिल्ल, डुंगरी भिल्ल, नेवासी भिल्ल, ताडवी भिल्ल, रावळ भिल्ल, भिलाला, भिल्ल मीना इ. भिल्ल जमातीच्या पोट जमाती आहेत.
किनवट परिसरात भिल्लांची जवळपास अडीच हजारांची वस्ती आहे. भिल्लांच्या उपपत्तीविषयी विचार करताना भिल्लांच्या धनुष्यबाणाचा संबंध त्याच्या भिल्ल या नामाभिधानाशी जोडला जातो. तमिळ भाषेत काही आदिकाव्यातून आदिवासींना 'विल्लुवरू' असे संबोधले आहे.[१३] विल्ल म्हणजे धनुष्य आणि विल्लुवरू म्हणजे धनुर्धारी या अनुषंगाने विचार केल्यास धनुर्धारी ते विल्लुवरी म्हणजे भिल्लुवरू आणि भिल्लुवरू वरूनच भिल्ल असे नामाभिधान त्यांना देण्यात आले आहे[१४] असे नाईक यांचे मत आहे.
किनवट परिसरातील भिल्लांमध्येही काही परंपरागत उपपत्तीकथा जोपासल्या गेल्या आहेत. या कथांचे अनेक पाठभेद आढळतात. या कथांचा संदर्भ पुराणाशी जोडला जातो. या कथांवरून भिल्लांची उपपत्ती 'वेन' नावाच्या पुरुषापासून झाली असे दिसते. अंगाचा पुत्र वेन याने आपली मांडी चोळली आणि तिच्यातून जळक्या लाकडासारखा रुंद चेहऱ्याचा व ठेंगणा एक पुरूष उत्पन्न केला. वेनाने त्याला निषाद खाली बैस म्हणले. त्यावरून त्याला निषाद हे नाव मिळाले. निषाद म्हणजेच भिल्ल.[१५] तसेच एका कथेमध्ये शिवाचाही या उपपत्तीचा संबंध जोडला जाते.[१६]
आंध आणि कोलाम
नांदेड परिसरातआंध जमात बऱ्याच मोठ्या संख्येने आहे. गोंडाच्या खालोखाल त्यांची वस्ती आहे. ते मूळचे आंध्रातील. ते आंध्रातून आले म्हणून त्यांना आंध हे नाव पडले.[१७] शेती आणि शिकार हा अजूनही त्यांचा व्यवसाय आहे. आंध जमातीने काही प्रमाणात आपली परंपरागत पोशाखसंस्कृती, भाषा रीतिरीवाज कायम राखले असले तरी बऱ्याच अंशी आधुनिकीकरणाचा साज ज्यांच्या समाजजीवनावर पडलेला आहे. इतर ग्रामीण समाजाशी तो बराच एकरूप झालेला आहे.
गोंड, आंध आणि परधान यांच्या तुलनेत कोलामांची फारशी वस्ती नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर परिसरात आढळत नाही. या भागात हजार बाराशे कोलमांची वस्ती असेल. त्यांच्या स्वतंत्र वाड्या किंवा तांडे नाहीत. कोलाम मात्र अजूनही बराचसा परंपरा टिकऊन आहे. या भागातील अनेक वस्त्यांमधून ते विखुरलेले आहेत. ते कोलामी भाषा बोलतात. या कोलामी भाषेचा अभ्यास विशेषतः किनवट परिसरातील कोलामच्या संदर्भात १९५०-५१ च्या दरम्यान डॉ. ब्युरो आणि एस. बी. भट्टाचार्य यांनी केला आहे.[१८] कोलाम आदिवासी समाज ही जमात प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यात वस्ती करून राहते.
नांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाजजीवन व संस्कृतिदर्शन
किनवट तालुक्यात गोंड, पारधी, फासेपारधी,आंध, परधान, भिल्ल, कोलाम अशा या आदिवासी जमाती या परिसरातील जंगल भागात असलेल्या तांड्यावर, वाड्यावर आणि गावांमधून राहतात. त्यांचे प्रत्येकाचे असे वेगळे तांडे नाहीत. त्यामुळे निरनिराळ्या जमातीची वैशिष्ट्ये घेऊन एक वेगळीच आदिवासी संस्कृती-धर्म या परिसरात आकारला आलेला आहे.[१९] ज्यात या सर्व आदिवासींना एका संस्कृतीबंधनात बांधणाऱ्या काही चालीरिती, रूढी, परंपरा, विवाहपद्धती आणि धर्मसंकेताचा समावेश हतो. यांच्या देव-देवता व सण-उत्सवही वैशिष्ट्येपूर्ण आहेत.
सामान्यत: सर्वच आदिवासी समाजाचे राहणीमान अत्यंत साधे आहे. बांबू, लाकूड व गवतांपासून झोपड्यांची घरे बांधून त्यातून ते राहतात. त्यातील काहींनी शेतीचा व्यवसाय स्वीकारलेला आहे तर काही लोक लाख, बिब्बे, डिंक, टोई, मेण, गोडंबी, टेंभर, चारं, मध, मोहाची फुले व इतर वनस्पतीजन्य वस्तू विकून उदरनिर्वाह करतात. लाकूडफाटा विकून उदरनिर्वाह करणारा मोठा समाज त्याच्यात आहे. दारिद्र्यामुळे आजही अनेक जमाती जेमतेम लज्जारक्षण होईल इतक्या तुटपुंच्या वस्त्राचा वापर करताना दिसतात.
आदिवासी लोकजीवन]]पोशाखातील पारंपारिकता आहे. गोंदण्याची सोस कायम आहे. त्यांच्यातील भाषिक देवाण-घेवाण त्यांच्या मूळ भाषेतच होत असते. कोलामी,होंडी, भिल्लाची भाषा या त्यांच्या आदिवासी भाषेबरोबरच मराठी तेलुगु व हिंदी भाषेचाही काही प्रमाणात वापर करताना दिसतात. या भाषेतील शब्दांचा वापर मूळ भाषेत केला जात आहे. आताची नवीन पिठी मराठी तेलुगु, हिंदा या भाषेचा स्वीकार तरत आहेत.[२०] आश्रम शालेतून आधुनिकतेचे पाठ गिरवले जात आहे. या आधुनिकतेच्या स्वीकारालाही मर्यादा आहेत. त्यांची विवाहपद्धती, चालीरिती, धर्म यांमधून त्यांची मूळ संस्कृतीस्त्रोत कायम राहणारच आहे.
नांदेड जिल्ह्यातील आदिवासींच्या विवाहातील रूढी
किनवट परिसरातील आदिवासी जमातीत आई-बापच आपल्या मुलाचे लग्न ठरवितात. परंतु त्यात मुलांची पसंती मात्र विचारात घेतात. विवाद जुळवताना मुलाचे आई-वडील व भावकीचे चार-पाच लोक दोन बाकरी व गूळ फडक्यात बांधून व सोबत बांबुची काठी घेतात. त्या काठीला त्यांचे जे देव आहेत ते त्याकाठीला डोळे बसवतात. ती काठी नवरी मुलीच्या घरासमोर दाराला रोवतात किंवा छपराला बांधतात. सर्वप्रथम त्या मुलीची आई व बाप नवऱ्या मुलाकडून आलेल्या काठीला किती डोळे म्हणजेच गोत्र आहे हे मोजतात. जर दोघांचेही गोत्र एकच असेल तर त्यांच्यात विवाह होत नाही. तसेच जर होणारा नवरा मुलगा सगोत्र नसला तरी मुलांचे आई-बाप आणि ते देत असलेली भाकरी व गूळ हे ग्यायचे की नाही ग्यायचे हे सर्वस्वी होणाऱ्या नवरी मुलीच्या मनावर असते. [२१] जर मुलीने भाकरी नाकारली तर मुलाकडील मंडळी आठ दिवस घरात बसून राहते. म्हणजेच जर मुलीने भाकरीला नकार दिला तर तो लग्नाला नकार मानला जातो.
सर्वसामान्यपणे गोंड, परधान. भिल्ल यांच्यामध्येही मुलींना हुंडा देण्याची पद्धत आहे. त्याला देज किंवा हुडा वा सिंनतेर असे म्हणतात. भिल्लांमध्ये नवरा मुलगा मुलीच्या आईला काही पैसे भेट देतो. ह्या पैशाचा तिने स्वीकार केला तर साखरपुड्याचा विधी पर्ण झाला असे समजतात.[२२] गोंड जमातीत मुलीला हुडा देतात तो प्रतिकात्मक स्वरूपात १४ रु. असतो तर परधानात पूर्वी ८० रुपये देज होता. तो आता १०१ रुपयांपर्यत वाढविण्यात आला आहे. देज हप्त्यानेही स्वीकारला जातो तर कधी गाई, बैलाच्या स्वरूपातही दिला जातो. परधानाच्या देजामध्ये भात, डाळ, दारू, मीठ, दोन ढोलकी, साड्या, कापड व रोख पैसे याचा समावेश असतो.
ज्या मुलाला देज देण्याची ऐपत नाही तो नवरा मुलगा मुलीच्या घरी आधी काही वर्षे नौकरी करतो. त्याला घरजावाई किवा गोंडी भाषेत "लामसडे" असे म्हणतात. लामसडे म्हणले की गोंड लोकांना हसू येते. कारण लामसडे त्यांना हलका, कमकुवत वाटतो. लामसडेचा नौकरीचा काळ संपल्यावर तो त्या मुलीशी तो लग्न करतो. त्यालाही आपल्या पत्नीला घरी नेतेवेळी एक साडी, एक पासोडी व अडीच रुपये बांधावे लागतात व बकरा कापून गाव जेवण देऊनच नेता येते.
पूर्वी नवऱ्यामुलाच्या हुशारीची व बहादुरीची कसोटी घेतली जात असे. एका मारक्या बैलाच्या शिंगाला फडके बांधून मोठा आवाज करून त्या बैलाला सोडले जात असे. तरुणाने बैलाच्या शिंगाला बांधलेले फडके आपल्या अंगाल कसलीही इजा न पोचता सोडायचे असते. किंवा मुलगा आणि मुलगी जंगलात जाऊन शेकोटीजवळ बसतात. दोघे एकमेकाशी गप्पा मारता मारता ती मुलगी त्या तरुणाला चटके देत राहते. यावेळी नवऱ्यामुलाने वेदनेचा हुंकारही काढायचा नसतो.[२३] या प्रकारातून मुलाची परीक्षा केली जात असे. अशा घटना आता कमी दिसून येतात. पण किनवट परिसरात अशा प्रथा होत्या असे वडिलधारी मंडळी सांगतात. याच परिसरात अशाही काही जमाती आहेत, त्यांचा संबंध क्वचितच शहरी संस्कृतीशी येतो. त्यांच्यात लग्नाआगोदर तरुण तरुणीला जंगलात पाठवून नवरामुलगा भावी वंश वाढविण्यास योग्य आहे का नाही याचीही परीक्षा घेतली जाते. ही प्रथा काही अंशी कोलाम पोडातील आणि जंगली भागात राहणाऱ्या जमातीत दिसून येते.[२४]
'पेज कांदे' हा आदिवासी समाजजीवनात लग्नकार्यातील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. नवरीचे वऱ्हाड शिवेवर आले की नवरदेवाडील मंडळी कांदे आणि अंबिल घेऊन त्यांना भेटायला जातात. त्यांचे पाय धुऊन त्यांना खायला कांदे व प्यायला अंबील देतात. यास पेजकांदे कार्यक्रम म्हणतात. पेजकांद्यानंतर त्यांना जानोसा दिला जातो. जानोसा म्हणजे मुलीच्या आडनावाच्याच घरी वऱ्हाडीमंडळीला बिऱ्हाड लावायला जागा द्यावी लागते. जानोस्याला दुसऱ्या आडनावाचे घर चालत नाही. लग्नविधीनंतर दारूचा विशेष वापर होतो. भरपूर दारू प्यायला देणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते.
आदिवासींच्या मर्तिकांचा विधी
माणसाच्या आयुष्यातील शेवटचा मुक्काम म्हणजे मृत्यू. मृत्यूविषयी त्या त्या धर्मात वा समाजात अनेकविध कल्पना असतात तसेच त्यांच्या विधीही अनेकविध प्रकारच्या असतात. आदिवांसींमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या तोंडात साखरपाणी वा दूध टाकतात. त्याच्या कपाळाला रुपया लावतात व प्रेत पुरतात. नांदेड परिसरातील अदिवासींमध्येही अशीच प्रथा आहे. दफनविधीनंतर साक केला जातो. साक म्हणजे प्रेत पुरल्यानंतर अंघोळ करून मृत व्यक्तीच्या घरी जायचे व चार चार आणे गोळा करून त्यातून फुटाणे आणि चहाचे साहित्य खरेदी करायचे. सर्वांनी फुटाणे खायचे व चहा पियाचा. ज्या जागेवर मृत व्यक्तीचा विधी केला आहे त्या ठिकाणी दोन-चार फुटाण्याचे दाणे व चहा शिपडला जातो. त्यास साक म्हणतात. आदिवासी जमातीत खांदे उतवण्याचाही कार्यक्रम केला जातो. माणूस मेलेल्या जागेवर नारळ फोडतात व दिवा लावतात. त्या दिव्यावर नारळाच्या जटा पेटवतात, आणि खांदेकऱ्यांच्या प्रेत ज्या खांद्यावरून नेले त्या खांद्याला पोळेपर्यंत फिरवात. त्याला खांदा उतरवणे म्हणतात.
आदिवासींच्या देवदेवता
आदिवासींच्या अनेक देवता आहेत. भाऊ मांडवकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कोलामांच्या देवतेचा आढावा घेतला आहे.[२५] कोलामचे सर्वच देव भिल्ल, गोंड, परधान, आंध मानतातच असे नाही. आदिवासींची अनेक देव समानरुपी असले तरी नावे मात्र वेगवेगळी आहेत. किनवट परिसरातील आदिवासी वस्त्यांमधूनही अनेक ग्रामदेवता आणि लोकदेवतांची पूजा प्रचलित आहे. त्यांच्या देवतांमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात. एक अत्यंत कोपिष्ट, आरिष्ट आणणाऱ्या, भुताखेतांच्या स्वरूपात आहेत. त्यांना संतुष्ट केले नाही तर त्या भक्तांना झपाटतात. तर दुसऱ्या प्रकारातील देवता कल्याणकारी स्वरूपातील आहे.
पेरसापेन
आदिवासींचे प्रमुख देव म्हणजे भगवान आणि बडापेन किंवा पेरसापेन हे होय. पेरसापेन याला बडादेव, बडापेन, बुढादेव किंवा बुऱ्हादेव असेही म्हणले जाजे. तो रानात सजा नावाच्या झाडावर राहतो. प्रत्येक आिवासी त्याला पूजतात. पेरसापेन देवाचे प्रतीक म्हणजे चंदनाचा मोठा खांब आणि त्याच्या एका टोकाला गायीच्या केसाचे आच्छादन लावलेले असते. त्याला 'चवरे' म्हणतात. असे चवरे तांड्यावर उभे करून ठेवलेले असतात. व ह्या चवऱ्यास पौष महिन्यात नदीवर नेऊन आंघोळ घालतात. परधान जमात बडादेवला पूर्वी दर तीन वर्षाला एक लाल कोंबडी झडती गेऊन कापत असे. आता दर वर्षाला कापली जाते. झडती देण्यासाठी त्याच्या कानात पाणी टाकतात. जर कोंबड्याने झडती दिली तरच त्याला कापतात. ह्या देवाला कोंबडी कापली की तो प्रसन्न होतो ही ह्या परिसरातील आदिवासींची श्रद्धा आहे[२६] आदिवासी जमातीत ह्या देवतेला महत्त्वाचे स्थान आहे.
भीमदेव
आदिवासी जमातीतील कोलाम जमात भीमदेवाला भीम्या, भीम्याय्याक म्हणून ओळखतात. कोलामी भाषेत 'अय्याक' म्हणजे देव. गोंडामध्ये ही देवता भिवसन, भिवसेन वा भिमसेन ह्या नावाने ओळखली जाते. आषाढात 'संजरी बीद्री' नामक भिमसेनाचा उत्सव होतो. ह्यानंतरच पेरणीला सुरुवात होते. ह्या देवाला बकऱ्या, कोंबड्याचा बळी चालतो. त्यालाही झडती द्यावी लागते.
जयतूर देव अथवा पांढरा सेवर
गोंडांमध्ये पांढरा सेवर म्हणून एक देव पूजतात. तसेच कोलाम जयतूर नावाचा देव पूजतात. दोन्हीचे कार्य एकच आहे. काळे लुगडे नेसणाऱ्या बायकांना तो लागतो, म्हणजेच झपाटतो अशी कोलामामध्ये समजूत आहे. बोंड, परधान यांच्यातही असा समजुती आहेत. त्यामुळे सदसा जयतूर देवाजवळ स्त्रिया जात नाहीत. कारण हा देव लागल्यास भगताकडून उतारा करून घ्यावा लागतो.
माट्याल देव
गोंडामध्ये वावटलीला माट्याळ म्हणतात. वावटळीत कुणी सापडला तर त्याला भूल लागले असे म्हणतात. वावटळीत सापडणारा कधी पडतो, वाकडा होतो तर कधी मरण पावतो. म्हणून वावटळीचा संबंध भुताशी लावून त्याची देव म्हणून पूजा करतात. कोलाम याला चुराघाली देव म्हणून पूजतात. तो जर घरात शिरला तर संपूर्ण झोपड्यांचा सत्यानाश करतो म्हणून आदिवासी या माट्यालला खूप घाबरतात.त्याचा कोप शमविण्यासाठी भगताकून कोंबडे, बकरे यांचा बळी देऊन त्याची पूजा करतात.
दईत किंवा अंड्या दईत
कोलाम ही आदिवासी जमात या देवाला खूप मानतात. त्याला ते 'दईत' असे म्हणतात. दईत हा शब्द 'दैत्य' असावा, कारण कोलाम या देवजावळून जात नाहीत, कारण तो लागतो असा त्यांचा समज आहे. गोंड, परधान दईत किंवा अंड्या दईय यांना मानतात, पण त्याची पूजा करीत नाहीत. तो लागला तर भगताकडून पट् मांडून, मंत्र टाकून उतरवितात. कधी कधी चाबकाच्या मारानेही दईत उतरविला जातो.[२७]
भैस किंवा बहिसदेव
हा देवही दईता सारखाच लागणारा-झपाटणारा आहे. भैस आली की भेंस आला असे म्हणून कोलाम गोंड दचकतात. यावरून म्हशी प्रमाणे प्रचंड अशा दैत्याची कल्पना. यातून हा देव पूजला जात असावा. गोंडामध्ये जो भैसासुरदेव पूजला जातो त्याचीही निर्मिती अशाच प्रकारे झाली आहे.
नागोबा
कोलामांत "सकोबा" म्हणजे नागोबा हा देव पूजला जातो. गोंडामध्ये नागभिडे नावाचे लोक नागोबाला पूजतात. किनवट परिसरातील यंदा पेंदा गावचा नागडोह देव सर्व आदिवासी श्रद्धेने पूजतात.
महादेव
कोलामांच्या गांवबांधणी उत्सवाच्यावेळी एका कोनावरचा देव म्हणून पूजतात. महादेव हा मूळ आदिवासींचा देव आहे. गोंडाची शेंदरी काठी म्हणजे सामान्यतः महादेवाची काठी मानली जाते. गोंडाचा भिवसेन याला मोठादेव किंवा बडादेव म्हणून ओळखतात. गोंडामध्ये मोरपंख लावलेल्या उंचकाठीला भिवसन म्हणले जाते. कोलाम, गोवारी यांतही अशीच काठी नाचविली जाते. सामान्यपणे सर्व आदिवासी भिवसन किंवा बडादेवाला मानतात. महादेवाचे नावही मोठादेव व बडादेव याच स्वरूपात त्यांच्यात प्रचलित आहे.
मारुती, म्हसोबा आणि भैरव
येथील आदिवासीत हनुमानाचीही पूजा करण्यात येते. मारुतीच्या वंशातील एका वानराने गोंडाना वाचविले म्हणून गोंड मारुतीला पूजीत असावेत. त्याबरोबर म्हसोबा आणि भैरवाची पूजा त्यांच्यात प्रचलित आहे.
माहुर्तादेवी
देवी हे आदिवासींचे मख्य दैवत आहे. ते तिला मोठया भक्तीभावाने पुजतात. या देवीचे ठाणे माहूर येथे गडावर आहे. दरवर्षी अनेक आदिवासी माहूरच्या देवीच्या दर्शनाला जातात. नवस वगैरे असतील तर ते फेडतात. गांवामध्येही देवी पूजता यावी म्हणून चावडीच्या अंगणात दीड ते दोन फूट उंचीचा ओटा करून (जो माहूरच्या गडासारखा दिसेल) त्यावर देवीची स्थापना करतात. या देवीला ते देवीच हा शब्द वापरतात किंवा माहुर्ती देवी असे म्हणतात. सेतू माधवराव पगडींनी कोलामांची देवी "आवाल (Awal)" या नावाची असल्याची माहिती आपल्या कोलामी व्याकरणाच्या प्रस्तावनेत दिली आहे.[२८] गोंडी भाषेत आवाल "माय" म्हणन या देवाला माय, माता किंवा आवाल म्हणले जाते.
शितलामाता
ग्रामीण लोक "आई" नावाची देवता पूजतात. तशीच गोंडाची सुद्धा ही आई देवी असते. कोलाम तिला “आय" “आया" किंवा "आई" या नावाने पूजतात. तर इतर सर्व आदिवासी तिला “शितलामाता" म्हणन पूजतात. या देवीची प्रतिकृती एखाद्या झाडाखाली ठेवलेली असते. देवी, पटकी, महामारीसारखे रोग लोक नयेत म्हणन तिला पूजतात. कोंबडे, बकरे, कापूनही या देवतेला संतुष्ट करण्याचा प्रयत्न होतो.[२९]
भुताय
भुताई देवी ही भुताखेतांना दूर ठेवणारी देवी म्हणून भुताई या नावाने ओळखली जाते. कोलाम हिला भुताय म्हणतात. ह्या देवीची पूजा सर्वच करतात असे नाही. भूत लागलेल्या व्यक्तीला भगत या देवीजवळ नेतो आणि पूजा करून नवस किंवा तांत्रिक पूजा करून भूत उतरवितो.
वाघ्या किंवा वाघाई
आदिवासींचे वास्तव्य जंगल, दऱ्याखोऱ्यात असल्याने सतत वाघाशी त्यांचा नेहमी संबंध येतो. वाघोबा त्यांची जनावरे पळवून नेऊन खातो. त्याने ती कृती करू नये, म्हणून वाघाई देवी पूजली जाते. वाघोबाला जनावरे मारावयाची असल्यास तो प्रथम मारुतीच्या पुढे जातो असे खेड्यापाड्यात मानले जाते. तर आदिवासीत वाघ प्रथम वाघाईजवळ जातो आणि जनावर मारण्याची परवानगी मागतो. तिने परवानगी दिली तरच तो जनावर मारू शकतो अशी त्यांची धारणा आहे. आपल्या जनावरांचे रक्षण करणारी देवता म्हणन वाघाईला पूजतात.
ही देवता ओबडधोबड दगडाची, लाकडाची गावाच्या बाहेर असते. कधी वाघाची मूर्तीही दगडावर कोरतात. किनवट तालुक्यात वाघदरी या गावी ३X२ फूट उंचीच्या आकाराच्या शिळेवर वाघप्रतिमा कोरलेली आढळून आली आहे.[३०] कोलामांत नकली वाघ करून वाजतगाजत पूजतात.
या पूजेच्या वेळी लोक आपल्या गाईची टापरे वाघाईला वाहतात. जंगलात चुकलेल्या गाई, टापऱ्यांच्या आवाजाने परत आणता येतात, म्हणून वाघाईला लाकडी, लोकंडी, पितळी घंट्या वाहतात. बंजारी लोक अशीच एक फत्तेपुरी देवी पूजतात. तिलाही ते लोक टापरे किंवा काठ्या वाहतात.
हिमायतनगराजवळ बोरगडी या गावी एक मारोती आहे. ज्याला मोठा मारोती म्हणतात. तिथे मारुतीच्या मूर्तिऐवजी विशाल दगड आहे. त्यालाच ते मारोती समजतात. या देवालाही टापरे वाहतात. याला हिमदू आणि आदिवासी दोन्ही पूजतात. [३१]
भोवानी
भोवानी ही देवताही आदिवासी जमातीत पूजतात. ही देवता इतर लोकांच्या संपर्कामुळे आदिवासींत आली असणे शक्य आहे.[३२] कोलाम भगताच्या अंगात ही देवी येते. या देवीचा दिवस मंगळवार असून या दिवशी उपवालही करतात.
जव्हारनू ,कंदोरी
पारधी, फासेपारधी समाजामध्ये भवानी माता, दुर्गा माता, सप्तश्रृंगी देवी गड मान्य आहे, दर दसरा व दिवाळी मध्य देवीला प्रसन्न करण्यासाठी बकरा बळी पडतात, तीन दिवस चालणाऱ्या सण आहे. त्यामध्ये मंगळवार दिवस सण साजरा करतात.
सटीची पूजा आणि मामाने फुटाणे खाणे
सर्व वैद्यकीय सोयी असलेल्या आजच्या काळातही आदिवासी स्त्रियांची बाळंतपणे त्यांच्या तांड्यावर केली जातात. परंपरागत तज्ञ राईणी आहेत. त्या मुलाची नाळ दगडाने किंवा विळ्याने कापतात. परधान, गोंडात मलगा झाला तर अंगणात एक भाला रोवण्याची पद्धत आहे. मुलगी झाली तर मुलीच्या मामाच्या अंगणात भाला रोवावा लागतो. भाला रोवणे म्हणजे एक क्षत्रिय जन्माला आला आणि मुलगी म्हणजे मामाच्या घरच्या क्षत्रियाला पत्नी जन्माला आली असे सूचित करणे. मामाला मुलगा असेल तरच त्याच्या अंगणात भाला रोवता येतो. मूल जन्मल्यावर रडणे चांगले समजतात. जन्मताच मूल शिंकले तर अशुभ मानतात. गोंड स्त्री महिनाभर बाळंतपणात घराबाहेर पडत नाही.
आदिवासी समाजजीवनात सटीच्या पूजेची प्रथा आहे. त्या दिवशी सर्व बायकांना दारु, कण्या आणि पिठलं (बेसन) जेवायला देतात. “वंजुर” म्हणून तीळ आणि गूळ त्यांना वाटतात. जन्म झालेल्या जागेवर दिवा पेटवतात. तो दिवा मलाला दिसू नये याची काळजी घेतात. हा दिवा मलाने बघितल्यास ते मल तिरळे होते असा समज आहे. बाराव्या दिवशी नांव ठेवतात. मुलाचे दात निघतांना मामा फुटाणे खातो व तोंडाने तांदुळ मुलाच्या तोंडावर फुकतो. असा एक प्रघात आहे. हा प्रघातही विधीवत पाळला जातो.
आदिवासींचा गावबांधणी उत्सव
नांदेड जिल्ह्यातील आदिवासींच्या धार्मिक उत्सवात गांवबांधणी उत्सवाला विशेष महत्त्व आहे. वैशाख किंवा ज्येष्ठ महिन्यात हा उत्सव साजरा होतो. चैत ही की महत्त्वाची. चैत्री पौर्णिमेला देवीची पूजा केली जाते. तीच ही चैत. त्याशिवाय भिमदेव आणि वाघाईची पूजाही होते. दसरा, दिवाळीपासून मोहरमपर्यन्तचे सगळेच सण येथील आदिवासी उत्साहाने करतात.
या उत्सवातून आदिवासींची कला साकारते. निरनिराळे रंगीबेरंगी कपड़े, मोरपिस, अंगावरचे रंगीत पट्टे आणि नैसर्गिक फुलांची सजावट यांनी नटलेले आदिवासी अनेक प्रकारची नृत्ये करतात. डंडार, घोरपडी, मोर, घुसाडी, ढेमसा, कोठाल, मुखवटा हे काही विशेष आदिवासी नृत्यप्रकार. कालीकोम म्हणजे तुतारी, बना किवा किंगारी, ढोल, डफ, पावा इत्यादी वाजवून-गाऊन उत्सवाच्या रात्री जागवल्या जातात. आदिवासींनी अनेक चालीरिती, परंपरा, देव, देवता, वैदिक हिंदू धर्मातूनही उचलल्या, त्या जोपासल्या आणि त्यांचे वेगळेपण निर्माण केले.[३३] त्यात देवतांची नांवे, त्यांच्या भाषेला शोभतील अशीच आहेत. उदा. बडादेव, मोठादेव आणि महादेव हे एकच दिसतात. गोंडांची शेंदरी काठी, गाईचे चवरे किंवा मोरपिस लावलेली आणि हिंदूच्या यात्रेमध्ये दिसून येणारी महादेवाची काठी दोन्ही एकच आहेत. हिंदूचे दैवत माहूरची देवी गोंडांनी, परधानांनी "माहूर्ती देवी" म्हणून स्वीकारली. अशा अनेक गोष्टी आदिवासीनी वैदिक-हिंदू संस्कृतीमधून आत्मसात केल्या. त्याचप्रमाणे आदिवासीच्या काही परंपरा, प्रथा, रूढीचा स्वीकार किनवट परिसरातील ग्राम संस्कृतीने केला. काही गोष्टी काळजीपूर्वक जोपासल्या. उदा. 'नांगराचा कुशा" आज किनवटमध्ये सर्व ठिकाणी वापरात आहे. शेतीच्या अगदी प्राथमिक अवस्थेत आदिवासी कुदळीने किंवा कुशाने जमीन उकरीत असत किंवा जमिनीला छिद्रे करून त्यात बी पेरले जाई.
कालांतराने नांगराचा वापर होऊ लागला. ह्या नांगरलाही येथील लोक ससाच फाळ म्हणून लावू लागले. आजही किनवट परिसरात नांगराला त्रिकोण फाळाऐवजी कुसा लावला जातो. हा आदिवासी संस्कृतीचा प्रभाव आहे.
किनवट परिसरातील बैलगाड्या आदिवासी पद्धतीच्याच साठा नसलेल्या आहेत. पूर्वी त्यांच्या गाड्यांना तर दगडी चाके वापरली जात. जवळगांव (जलगांव) तालुका हदगाव येथे मध्ययुगीन गाडीची चाके सापडली आहेत. ती पूर्णपणे दगडातून बनवलेली आहेत. ज्यांचा आकार, गोलाई २६, २८, ३१ आणि ३४ इंच एवढी आहे. पूर्वी अशी चाके गाडीला वापरीत अशी गाववाल्यांनी माहिती दिली.[३४] या परिसरातील अनेक गावांची नावे सुद्धा आदिवासी भाषेतूनच निर्माण झाली आहेत. वाघदरी, गोंडगांव, गोंडवडसा, कुंडरा, पिंपळ सेंडा, पिपापोडी, भिमपुर, गोंडवाडी, परधान सांगवी, कोलामपोड, टिटवी, गौरी, घोघरवाडी, डुंडरा, अंजनखेड आणि सिडामखेडा ही नावे आदिवासीप्रभाव दर्शवितात.
आदिवासींच्या केशभूषा, वेषभूषेचा व अलंकारांचा प्रभाव या परिसरातील शिल्पपरंपरेवरही पडलेला आढळतो. जलधारा येथे अलीकडेच दोन मूर्ति सापडल्या.[३५] त्यात एक पार्वती तर दुसरी अन्नपूर्णा असावी, या मूर्तीची केशभूषा लक्षणीय आहे. गोंड किंवा भिल्ल स्त्रिया ज्या पद्धतीची केशभूषा करतात तशा प्रकारची ही केशभूषा आहे. हा पूर्णपणे आदिवासी संस्कृतीचा परिणाम आहे. कलाकाराने पार्वतीलाही सर्पमकूट घालन पूर्णपणे “भिल्लीन" किंवा गिरजा गोंडीन रूपात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
अशीच आदिवासी संस्कृतीचा परिणाम झालेली एक मर्ति कळंब येथेही सापडली आहे.[३६] ' ही मूर्ति अभिचारक विष्णची आहे. चतुर्भुज विष्णूला शंख, गदा, चक्राशिवाय अक्षमाला, त्रिशळ, नरमुंड माळही आहे.
नांदेड परिसरातील आदिवासी संस्कृती अनेक दृष्ट्या वैशिष्टपूर्ण ठरते. पारंपारिक रुढी, धर्म, रिती, नृत्यप्रकार, पोषाखपद्धती, दागदागिने गोंदणपद्धती यांचा प्रभाव कायम आहे. आदिवासी भाषा अजूनही मोठ्या प्रमाणात रुढ आहे. काही बाबतीत ग्राम-जीवनात ते रुळले असले तरी त्यांच्या मूळ संस्कृतीला त्यांनी त्यागिले नाही. त्या परंपरा टिकल्या आहेतच. आदिवासी संस्कृतीच्या रूपाने नांदेड जिल्हयातील सामाजिक, सांस्कृतिक जीवनावर एक नवा साज चढलेला आढळतो.
संदर्भग्रंथ
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १२७
- ^ राजूरकर, अ. ज., चंद्रपूरचा इतिहास, पृष्ठ - ११७
- ^ पगडी, सेतुमाधवराव, मोगल-मराठेसंबंध, पृष्ठ. १९
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १२८
- ^ गारे, (डॉ) गोविंद, महाराष्ट्रातील आदिवासी जमाती, पृष्ठ - ६७
- ^ "संग्रहित प्रत". 2020-01-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-29 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2020-01-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-29 रोजी पाहिले.
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड दिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १२९
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १२९
- ^ Russell, R. V. Hira Lal, Tribes and Castes of the Central Provinces of India, Vol. IV., Delhi, 1975
- ^ भागवत, दुर्गा, मराठी विश्वकोष खंड-९
- ^ मांडके, म, बा. मराठी विश्वकोश खंड - १२
- ^ Naik, T. B. The Bhils : a Study, Delhi, 1956.
- ^ Naik, T. B. The Bhils : a Study, Delhi, 1956.
- ^ कर्वे, इरावती, मराठी लोकांची संस्कृती
- ^ वाडगोंडे, गुरूनाथ, भारतीय आदिवासी, पृष्ठ - १११
- ^ कर्वे, इरावती, मराठी लोकांची संस्कृती
- ^ मांडवकर, भाऊ, कोलाम, पृष्ठ - ३०७
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १३१
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १३१
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १३१
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १३२
- ^ वाडगोंडे, गुरुनाथ, भारतीय आदिवासी, पृष्ठ-१११
- ^ लोकडे, एस. एम., नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १३२
- ^ मांडवकर, भाऊ, कोलाम, पृष्ठ - १६७
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १३५
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १३६
- ^ पगडी, सेतू माधवराव, ग्रॅमर ऑफ दि कोलामी लॅंग्वेज, १९५०
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १३७
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १३७
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १३८
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १३८
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १३८
- ^ लोकडे, एस. एम. नांदेड-स्थानिक आणि साहित्य : एक शोध, नांदेड जिल्हा संदर्भ ग्रंथ समिती, १९८६, पृष्ठ - १३९
- ^ देव, प्रभाकर, गिरीजा मूर्तीशिल्प आणि परंपरा (लेख)
- ^ लोकडे, एस. एम., पार्वती मूर्ती, किनवट समाचार, दिवाळी १९८५
बाह्य दुवे
https://www.thinkmaharashtra.com/node/2412 Archived 2020-01-29 at the Wayback Machine.