नवेगाव राष्ट्रीय उद्यान
?नवेगाव राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र • भारत | |
— राष्ट्रीय उद्यान — | |
IUCN वर्ग Ia (संरक्षित वनक्षेत्र) | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची | १,३३०.१२ चौ. किमी • ७ मी |
हवामान • वर्षाव तापमान • उन्हाळा • हिवाळा | • १,९२० मिमी (७६ इंच) • ३४ °C (९३ °F) • २० °C (६८ °F) |
जवळचे शहर | अर्जुनी मोरगाव |
जिल्हा | गोंदिया |
स्थापना | २२ नोवेंबर १९७४ |
नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान भारताच्या महाराष्ट्र राज्यातील गोंदिया या जिल्ह्यात असून अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे.
जंगलाचा प्रकार
हे जंगल मुख्यत्वे मध्य भारतीय पानगळी प्रकारात मोडते. ऐन, हळदू, कलाम धावडा, बीजा, साग, सूर्या अशा प्रकारची झाडे या अरण्यात आढळतात.
भौगोलिक
उद्यानाचा मुख्य भाग हा डोंगराळ आहे डोंगराच्या पायथ्याशी नवेगाव नावाच्या तळ्याने वेढलेले आहे. इटिडोह धरण आणि नवेगाव बांध तलाव असे दोन मोठे जलाशय येथे आहेत. या जंगलाचा विस्तार सुमारे १३४ चौरस किलोमीटर आहे. माधव झरी, राणी डोह, कामझरी, टेलनझरी, अंगेझरी, शृंगार बोडी हे झरे आणि पाणसाठी येथे आहेत. हा विभाग पाणथळ आणि दलदल असलेला आहे.
प्राणी जीवन
नवेगावचे उद्यान हे मुख्यत्वे विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. नवेगावच्या तळयात हिवाळ्यात हजारोंनी स्थलांतरित पक्षी येतात. यात विविध प्रकारची बदके, हंस, क्रौंच, करकोचे, बगळे, पाणकोंबडया, पाणकावळे इत्यादी. तळ्यात विविध प्रकारचे पाणथळी पक्षी बघायला मिळतात तर जंगलामध्येही विविध प्रकारचे झाडीझुडुपातील पक्षी पहावयास मिळतात. प्राणी जीवनात येथे वाघ, बिबट्या, अस्वल, तरस, सांबर, नीलगाय, रानगवा, रानडुक्कर, माकडे व वानरे तसेच विविध प्रकारचे साप आढळतात यात पट्टेरी मण्यार ही दुर्मिळ सर्पाची जात येथे आढळते. येथील सर्वात विशेष म्हणजे तलावात पाणमांजरे आढळतात. निसर्गसाहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांनी पाणमांजरांवरती अभ्यास याच उद्यानात केला होता. तसेच येथे कधी कधी रानकुत्रीही आढळतात. त्यांचे वास्तव्य काही काळापुरते असते. उद्यानात सारस क्रौंचाची एक जोडी नेहेमी असते. विदर्भातील पक्षीअभ्यासकांनुसार महाराष्ट्रात केवळ येथील सारस क्रौंचाची वीण केवळ नवेगाव मध्ये होते.
कसे जाल
- नागपूरहून कोलकाताच्या दिशेने राष्ट्रीय महामार्ग ५३ वरून कोहमारा नावाचे गाव आहे.येथून गोंदिया-अर्जुनी मोरगाव-गडचिरोली प्रमुख राज्य महामार्ग क्र-११ वरून नवेगाव राष्ट्रीय उद्यान येथे जाण्यासाठी फाटा आहे.
- रेल्वे मार्गाने जायचे असल्यास गोंदिया येथुन मेमु ट्रेन उपलब्ध आहे. तसेच देवलगाव रेल्वेस्थानक, अर्जुनी रेल्वेस्थानक पर्यंत ट्रेन उपलब्ध आहे.
- महाराष्ट्र राज्य परिवाहन मंडळाच्या साकोलीहून नवेगावला जाण्यासाठी एस्.टी बसेस मिळतात.
संदर्भ
- अरण्यपुत्र -माधवराव पाटील
बाह्य दुवे
- नवेगाव उद्यानातील भ्रमंतीवर भालचंद्र पुजारी यांचा ब्लॉग व छायाचित्रे Archived 2008-12-06 at the Wayback Machine.