Jump to content

नवबौद्ध

नवबौद्ध (Neo-Buddhist) ही भारतीय धर्मांतरित बौद्धांना किंवा आंबेडकरवादी बौद्धांना दिलेली एक 'शासकीय संज्ञा' आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेतून इ.स. १९५६ मध्ये व त्यानंतर बौद्ध धम्म स्वीकारलेल्या व्यक्तींना 'नवबौद्ध' म्हणले जाते. इ.स. १९५६ पासूनच्या बौद्धांत 'नवबौद्ध' हा प्रघात आढळत नाही, हे लोक स्वतःला केवळ 'बौद्ध' समजतात. बहुतांश नवबौद्ध हे विशेषतः पूर्वाश्रमीचे दलित (आजचे अनुसूचित जाती) आहेत. समस्त नवबौद्ध हे आंबेडकरवादी बौद्ध आहेत.

नवबौद्ध हे नवयान किंवा नवबौद्ध धर्माचे अनुयायी असतात. ‘नवबौद्ध’चा शब्दशः अर्थ ‘नवीन बौद्ध’ असा घेतला जातो, पण याचा सांप्रदायिक वा मूळ अर्थ ‘नवयानी बौद्ध’ असा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना ज्या बौद्ध धम्माची दीक्षा दिली तो महायान किंवा थेरवाद बौद्ध धर्म नव्हता, तर तो 'नवबौद्ध धम्म' (नवयान) होता. नवयान एक आंबेडकरकृत बौद्ध संकल्पना वा संप्रदाय आहे. बरेचशे भारतीय बौद्ध आंबेडकरांच्या बौद्ध धर्माला नवा संप्रदाय (नवयान) मानत नाहीत कारण त्यांनी तशी घोषणा केलेली नाही व आपण स्वीकारलेला बौद्ध धम्म हा मूळचा बुद्धांचा धम्म असल्याचे त्यांनी म्हणले आहे.

लोकसंख्या

इ.स. २०११च्या जनगणनेनुसार, भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ८७% बौद्ध (७३ लाख) हे नवबौद्ध आहेत. ते इतर धर्मांतून धर्मांतरित होऊन झालेले बौद्ध आहेत, आणि उर्वरित १३% बौद्ध (११ लाख) हे हिमालयीन ईशान्य भारतातील असून ते पारंपरिक बौद्ध आहेत.[][] भारतातील एकूण बौद्धांपैकी ७७% बौद्ध अनुयायी हे महाराष्ट्र राज्यात आहेत तर भारतातील नवबौद्धांपैकी सुमारे ९०% नवबौद्ध महाराष्ट्रात आहेत.[] महाराष्ट्रातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी साधारणपणे ९९.९८% नवबौद्ध आहेत.

‘नवबौद्ध’ बद्दल गैरसमज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रभावित होऊन बौद्ध बनलेले काही नवयान बौद्ध अनुयायी स्वतःला नवबौद्ध म्हणवून घेत नाहीत कारण त्यांनी नवबौद्धचा 'नवयानी बौद्ध' असा सांप्रदायिक अर्थ न घेता केवळ ‘नवीन बौद्ध’ असा शाब्दिक अर्थ घेतला. वास्तवात मात्र ‘नवयानी बौद्ध’ व ‘नवयान बौद्ध धर्म’ याचे संक्षिप्त रूप अनुक्रमे ‘नव-बौद्ध’ व ‘नव बौद्ध धर्म’ असे आहे.

इतिहास

इ.स.१९५६ मध्ये १४ ऑक्टोबर रोजी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे ५ लाख अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन भारतात बौद्ध धर्माची पुनःस्थापना केली. हा धर्म अंगीकारून अस्पृश्य हे बौद्ध धम्मात आले. भारतातील कोट्यवधी अस्पृश्यांना यामुळे अधिक संधी उपलब्ध झाल्या आणि हजारो वर्षांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय गुलामगिरीमधून त्यांची मुक्तता झाली. या ऐतिहासिक सोहळ्याच्या दिवसाला "धम्मचक्र प्रवर्तन दिन" हे नाव मिळाले. या दिवशी आणि या दिवसानंतर बौद्ध धम्म स्वीकारून बौद्ध बनलेल्या व्यक्तींना नवबौद्ध किंवा नवयानी बौद्ध म्हणले जाते.

बावीस प्रतिज्ञा

धम्म दीक्षेबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या धर्मांतरित बौद्ध अनुयायांना बौद्ध धम्माचे सार असलेल्या बावीस प्रतिज्ञा दिल्या. या प्रतिज्ञांत नवबौद्ध धर्माचे सार आहे.

हे सुद्धा पहा

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Buddhism has brought literacy gender equality and well being to Dalits (in Hindi)". 2018-08-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-07-20 रोजी पाहिले.
  2. ^ "Buddhism has brought literacy gender equality and well being to Dalits". 2020-09-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-07-20 रोजी पाहिले.
  3. ^ [१]

बाह्य दुवे