Jump to content

धूळपाटी/मानवाची एकात्मता

रिचर्ड लेवोन्टिन हा एक अग्रगण्य अनुवंशशास्त्रज्ञ होता. १९५३ सालीच अनुवंशिकतेचा आधार असलेल्या डी एन ए रेणूची रचना उलगडली गेली होती. परंतु १९६६ सालापर्यंत डी एन ए च्या घटकांचा निश्चित क्रम अजून ठरवता येत नव्हता. डी एन ए प्रथिनांच्या रेणूंची रचना ठरवते. प्रथिनांचे रेणु वेगवेगळ्या भूमिका बजावतात. ते स्नायूंचे रचनात्मक घटक आहेत. पण याहून महत्त्वाचे म्हणजे विकर म्हणून ते शरीरातील अनेक रासायनिक प्रक्रिया नियंत्रित करतात. हे विकर वेगवेगळ्या समविकारांच्या रूपात आढळतात. ही वेगवेगळी रूपे ठरवण्याची तंत्रे विकसित करून लेवोन्टिनने प्रथमच सजीवांच्यात जनुकीय वैविध्य किती प्रमाणात आहे हे मोजले. आधी कल्पना होती त्याहून हे जनुकीय वैविध्य खूप जास्त प्रमाणात असते हे त्याने दाखवून दिले. असे असल्यास मानव समाजाच्या वेगवेगळ्या घटकांच्यात मोठ्या प्रमाणात परपरस्पर व्याप्ती असण्याची शक्यता आहे. त्याने अमेरिकेतील गोऱ्या आणि काळ्या वंशांतील व्यक्तींच्या जनुकीय रचनेचा अभ्यास करून त्यांच्यात भरपूर परस्पर व्याप्ती आहे असे दाखवून दिले. मानवजातीच्या मूलभूत समानतेचा हा भक्कम पुरावा होता.