Jump to content

धुंडिराज गोविंद फाळके


दादासाहेब फाळके
भारतीय चित्रपट जनक A FATHER OF INDIAN CINEMA
जन्मधुंडिराज गोविंद फाळके
एप्रिल ३०, १८७० ब्रिटिश भारत
त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, भारत
मृत्यूफेब्रुवारी १६, १९४४ ब्रिटिश भारत
नाशिक, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, निर्माता
कारकीर्दीचा काळ १९१३ ते 194 4
भाषामराठी
प्रमुख चित्रपट राजा हरिश्चंद्र
वडील दाजीशास्ञी
आई द्वारकाबाई
पत्नी सरस्वतीबाई फाळके
टिपा
भारतीय चित्रपटकला वैभवाप्रत नेली

धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (जन्म : त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, - नाशिक, १६ फेब्रुवारी १९४४) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातीलभारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली.

भारतीय अभिनेत्यांना त्यांच्या जन्मभरच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वांत मोठा पुरस्कार दिला जातो.

जीवन

दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशकाहून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृत तज्ञ होते.

इ.स. १८८५ साली त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्रवेश घेतला. इ.स. १८९० साली जे. जे. तून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, बडोदा येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले.

त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु, गोध्रा येथे झालेल्या ब्युबॉनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४० 'जादूगारां'पैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्‌झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे'साठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे त्यांनी स्वतःचा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला जर्मनीची वारी केली.

छपाई व्यवसायात त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांचे विवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास कायमचा रामराम ठोकला. पुढे "लाईफ ऑफ ख्रिस्त" (Life of Christ) हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या व्यवसायाकडे वळवले व १९१२ साली त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट काढला. तो ३ मे १९१३ या दिवशी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रेक्षकांना पहिल्यांदा दाखवण्यात आला.

सरस्वतीबाई धुंडिराज फाळके

सरस्वतीबाई या दादासाहेब फाळके यांच्या पत्नी. दादासाहेबांचा पहिला चित्रपट बनवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. चित्रपटाच्या निर्मितीखर्चासाठी सरस्वतीबाईंनी आपले सोन्याचे दागिने विकले. त्या फिल्म डेव्हलपिंग, मिक्सिंग आणि फिल्मवर रसायनांचा उपयोग शिकल्या. त्या फिल्मचे परफोरेटिंग (फिल्मवर दोन्ही कडांना भोके पाडणे), एडिटिंग (फिल्मचे तुकडे जोडणे) करीत. शूटिंगच्या वेळी कॅमेरा असिस्टंट, स्पाॅट बाॅय, सूर्याच्या उन्हासाठी रिफ्लेक्टर धरून उभे राहणे आदी कामे करीत. त्या फिल्म निर्मितीसाठी कामावर ठेवलेल्या लोकांच्या राहण्याची, आरामाची सोय करणे, आणि त्यावरही ६०-७० लोकांचा स्वयंपाक करीत व त्यांचे कपडेही धुवीत.

रात्री सर्व झोपल्यावर सरस्वतीबाई फिल्मच्या कथानकावर ब्रेनस्टाॅर्मिंग (अडचणी दूर करण्यासाठी गटचर्चा करणे) करीत.

सरस्वतीबाईं फाळके यांना राजा हरिश्चंद्र या पहिल्या चित्रपटासाठी तारामतीची भूमिका करण्यासाठी विचारले होते. पण मग कामांचे काय या विचाराने त्यांनी नकार सांगितला.

सरस्वतीबाईंनी जर मदत केली नसती तर भारतातला पहिला चित्रपट बनणे अशक्यप्राय होते.

सरस्वतीबाई फाळके यांच्या नावाचा एक पुरस्कारही आहे.

कारकीर्द

चित्रपट

  1. राजा हरिश्चंद्र (इ.स. १९१३)
  2. मोहिनी भस्मासूर (इ.स. १९१३)
  3. सावित्री सत्यवान (इ.स. १९१४)
  4. श्रीकृष्णजन्म (इ.स. १९१८)
  5. कालिया मर्दन (इ.स. १९१९)
  6. सेतुबंधन (इ.स. १९३२)
  7. गंगावतरण (इ.स. १९३७)

सन्मान

मुंबईतील फिल्मसिटीला दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणतात.

दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले अभिनेते आणि आणि पुरस्काराचे वर्ष (प्रत्यक्ष पुरस्कार नंतरच्या वर्षी प्रदान झाला)

दादासाहेब फाळके यांच्यावरील पुस्तके

दादासाहेब फाळके यांच्यावरील चित्रपट

  • हरिश्‍चंद्राची फॅक्टरी

हे सुद्धा पहा








बाह्य दुवे