धर्म
धर्म नावाची ही अशी एक संकल्पना आहे की जिने आजपावेतो जगातील कोट्यवधी लोकांना सुख, शांतता व समाधान दिले. त्यासोबतच धर्मानेच आजपर्यंतची सर्वात मोठी मनुष्यहानी केली आहे. धर्म या शब्दास अन्य कोणत्याही पाश्चात्त्य भाषेत समानार्थी शब्द नाही. Basic Instinct हा धर्म या शब्दाच्या जवळचा अर्थ असणारा इंग्रजी शब्द आहे. .तरीही हा इंग्रजी शब्द धर्म या भारतीय शब्दाची व्यापकता वर्णू शकत नाही. रिलिजन हा धर्म या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. सर्व धर्म समान असतात ही एक खुळचट समजूत आहे.
वेगवेगळ्या भारतीय दर्शनांमध्ये प्रसंगपरत्वे धर्म या शब्दाचा अर्थ मांडण्यात आलेला आहे. तो तो अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये योग्य आहे, म्हणजेच ते सर्व अर्थ योग्य आहेत असा सरळ तर्क लावता येईल. धृ म्हणजे धारण करणे असा या संस्कृत धातूचा आधार घेतला, तर ज्या विशिष्ट गुण विशेषामुळे एखाद्या वस्तूला, सजीवास त्याचे वेगळेपण प्राप्त झाले असते, त्या गुणविशेषास धर्म असे म्हणता येईल. धर्म या शब्दाचा भाषा, संस्कृती, इतिहास, सभ्यता, समाज इत्यादीशी संबंध जोडला तर त्याचा अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये बदलतो. पण तरीही धर्म या शब्दाचा मूळ ‘अर्थ धारण करावा तो धर्म’ हाच आहे.
धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती. धर्म म्हणजे अंगभूत गुणविशेष. व अशी सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती, अंगभूत गुणविशेष हे बाहेरून आणता येत नाहीत. हे मुळचेच असतात. उदाहरणार्थ -
निर्जीव वस्तूंची उदाहरणे
उदा १ - पाणी व या वस्तूचा अंगभूत गुण - शीतलता
उदा २ - हवा व या वस्स्तूचा अंगभूत गुण - चंचलता
उदा ३ - अग्नि या वस्तूचा अंगभूत गुण - दाहकता
उदा ४ - पाषाण वस्तूचा अंगभूत गुण - जडता
सजीवांची काही उदाहरणे
उदा १ - वाघ - भूक लागली असता आणि प्रतिस्पर्धी वाघ अथवा प्राण्यापासून संभाव्य धोका टाळण्यासाठी हिंसा करणे. (अस्तित्व टिकवण्यासाठी हिंसा करणे)
उदा २ - वाघ - कितीही भूक लागली असेल व व शिकार मिळाली नसेल व मिळणार नाही असे समजले, असे जरी असेल तरीही वाघ गवत खात नाही. (अखाद्य न खाणे)
उदा ३ - गाय-वासरू - वात्सल्य
उदा ४ - गरुड - आकाशात विहार करणे
उदा ५ - मासा - पाण्यामध्ये झोप घेणे
मनुष्याशी निगडित काही उदाहरणे
उदा १ - स्त्री - ममत्व, वात्सल्य. ही एक अजब वृत्ती आहे. कुमारिकेमध्ये कदाचित हा गुण सुप्तावस्थेत असू शकेल, पण एकदा का ती कुमारिका प्रसूता झाली की तिला ममतेचा पान्हा फुटतो. हा गुणविशेष भावनिक व शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होतो. ममत्व, मातृत्व ही स्त्रीमधील उपजत सहज अंगभूत वृत्ती आहे. ही वृत्ती कुणी नष्ट करण्याचा प्रयत्न करेल तरीही ती होणार नाही. व प्रसंगी स्त्री बाळासाठी निकराने स्वतच्या जीवाशी देखील खेळते. स्वतचा जीव संकटात टाकुन बाळाला वाचवणा-या माता आपल्याला अनेक माहीत आहेत. यास मातृ-धर्म असे म्हणतात. थोडक्यात स्वतच्या बाळासाठी जे जे योग्य आहे ते ते करण्याच उत्स्फूर्त प्रेरणा म्हणजे मातृ-धर्म होय.
उदा २ - पिता - पितृ-धर्म. एखाद्या तरुणास, अपत्य झाल्यावर), त्याच्या भावविश्वामध्ये जे काही बदल होतात, त्यानुसार त्या तरुणास स्वतच्या अपत्याविषयी जी ओढ लागते. त्यास व त्या अनुषंगाने त्या अपत्याच्या पालनपोषणासाठी व संस्कारांसाठी तो स्वतःच्या दिनचर्येत, तसेच सामाजिक वर्तणुकीत बदल करतो त्यास पितृ-धर्म असे म्हणतात. ही मूलभूत प्रवृत्ती आहे. योग्य वेळ आली की आपोआप आविष्कृत होत असते. म्हणजे आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या पित्याच्या स्वतच्या अपत्यासाठी होणारी उत्स्फूर्त प्रेरणा व त्याद्वारे त्यास होणारा कर्तव्यबोधत्यास पितृधर्म असे म्हणतात.
उदा ३ - पुत्र - पुत्रधर्म
उदा ४- मित्र - मित्र-धर्म
उदा ५ - राजा, राज्य - राजधर्म
वरील उदाहरणे मनुष्याशी निगडिडीत आहेत. यात एकच मनुष्य वेळोवेळी अनेक प्रकारच्या धर्मांचे आचरण करू शकतो. तो मनुष्य कोणत्या भूमिकेमध्ये आहे यावर त्याचा धर्म ठरतो. उदाहरणादाखल नुकताच प्रदर्शित झालेला बाहुबली २ हा सिनेमा व त्यातील पात्र शिवगामी देवीला एक शासक म्हणून राजधर्म पाळायचा होता व त्याचवेळी भल्लालची आई या नात्याने तिला मातृधर्म पाळायचा होता. आंधळ्या पुत्रप्रेमापोटी निष्पाप बाहुबलीस प्राण गमवावे लागले व याचाच अर्थ तिच्याकडून राजधर्माचे पालन झाले नाही. इथे कोणत्या धर्माचे पालन करावयास हवे होते, ते तिने योग्यरीत्या ठवायला हवे होते. कोणत्या ही पूर्वग्रहाशिवाय तिने एक शासक या नात्याने, बाहुबली व त्याची पत्नी यांस त्यांचे मत मांडण्याची संधी द्यायला हवी होती. तर मुद्दा असा आहे की जर जे करणे नीती व न्यायास अनुसरून आहे, ते करणे म्हणजे त्या त्या परिस्थितील धर्म होय.
धर्म म्हणजे रिलिजन नाही. धर्म व रिलिजन, अगदीच काय तर संप्रदाय यांचा दूरदूरचाही संबंध नाही. धर्म म्हणजे उपजत वृत्ती, धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, धर्म म्हणजे अंगभूत गुण, धर्म म्हणजे योग्य. धर्म म्हणजे सत्य. धर्म म्हणजे सदोदित सत्य. धर्म म्हणजे नित्य. धर्म म्हणजे अंतःप्रेरणा, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे न्याय.
धर्म या विषयावरील मराठी पुस्तके
- ईश्वरविहित जीवन (शरद बेडेकर)
- गजर झाला जागे व्हा ... ज्योत जागृतीची (सरश्री)
- देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे (प्रबोधनकार ठाकरे)धर्म हा मानवीय असावा
- धर्म आणि हिंसा (मंगला आठलेकर)
- निरीश्वरवाद पुन्हा एकदा (शरद बेडेकर)
- (मला समजलेले) पाच हिंदू धर्म (शरद बेडेकर)
- बुद्ध, धर्म आणि संघ (धर्मानंद कोसंबी)
- मानव विजय : धर्म-ईश्वर चिकित्सेकडून निरीश्वरवादाकडे (शरद बेडेकर)
- राष्ट्रीय हिंदुधर्म. (भगिनी निवेदिता)
- समग्र निरीश्वरवाद (शरद बेडेकर)
- हिंदुत्व (वि.दा. सावरकर)