Jump to content

धम्मसंगिती

गौतम बुद्ध जिवंत असेपर्यंत त्याच्या अनुयायांचे शंका निरसन वेळीच होत असे. मात्र बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर भिक्षूंमध्ये तात्त्विक मतभेद वाढले. त्यांचे निराकरण करण्यासाठी संगितींच्या (एकवचन संगिती, अनेक वचनही संगिती!) माध्यमातून मोठ्या प्रमाणात विचारमंथन घडून आले. बुद्धाने सांगितलेले धार्मिक तत्त्वज्ञान, आचार, विहाराबाबतची नियमावली यांचे संकलन करणाऱ्या चार बौद्ध धर्म परिषदा (संगिती) अनुक्रमे राजगृह, वैशाली, पाटलीपुत्र आणि काश्मिरातील कुंडलवन येथे भरल्या. त्यांमधून बौद्ध धर्माच्या सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक या तिन्ही ग्रंथांना मिळून बौद्ध धर्माचे सार सांगणारा ‘त्रिपीटक’ हा अतिमोलाचा ग्रंथ निर्माण झाला. बौद्ध धम्म संगितींमुळे त्रिपीटक निर्मितीबरोबरच धर्मप्रसाराला चालना मिळाली. भारताबाहेर श्रीलंका, ब्रम्हदेश, चीन, जपान, इजिप्त, सीरिया आदी देशांमध्ये धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्षू गेले. शिवाय बौद्ध धर्माच्या तत्त्वांचा उद्घोष करणारे स्तंभलेख, शिलालेख व ताम्रपट ठिकठिकाणी लावण्याची योजना कार्यान्वित झाली. संगितीच्यावेळी नागार्जुन, वसुबंध, असंग, सब्बकामी, रेवत, साल्ह, सुज्जसोभित, यश, सुमत अशा कीर्तिमान भदंतांचे विद्वत्तापूर्ण संवाद झाले. बौद्ध भिक्षूंमधील तीव्र मतभेद आणि बदलत्या परिनिवेशात बौद्ध धर्माची बांधणी हेही कारण धम्म संगिती (धर्म परिषदा) भरवण्यामागे होते.

या सुरुवातीच्या चार मुख्य संगितींनतरही आणखी संगिती होतच राहिल्या.

पहिली संगिती

बौद्धांची पहिली धम्म संगिती राजगीर (राजगृह) येथे सप्तपर्णी गुंफा या ठिकाणी राजा अजातशत्रूने गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर तीन महिन्यांनीर इ. स. पूर्व ४८३मध्ये भरवली. ही धम्म संगिती भन्ते महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. भन्ते उपाली याने विनय पिटकाचे वाचन केले. या संगितीमध्ये पाचशेअरहंत भिक्खूंनी भाग घेतला होती व ती सात महिने चालली. या प्रमाने विनय आणि धम्माचा संग्रह केला गेला.

दुसरी संगिती

बौद्धांची दुसरी धम्म संगिती ही राजा कालाशोकाने पहिल्या संगितीच्या १०० वर्षानंतर वैशालीच्या वालुकाराममध्ये भरवली. विनय पिटकातील नियमासंबंधी मोठा वाद निर्माण झाला होता, त्यासंबधी निर्णय करण्याकरिता ह्या संगतीचे आयोजन केले होते. या संगितीमध्ये ७०० भिक्खूंनी भाग घेतला होता. संगितीत भन्ते रेवत यांच्या अध्यक्षतेखाली बुद्ध वचनांचे संगायन (संकलन ) केले गेले.

तिसरी संगिती

बौद्धांची तिसरी धम्म संगिती राजा सम्राट अशोक याने इ.स. पूर्व ३२६ मध्ये पाटलीपुत्राच्या अशोकाराम विहारात भरवली होती. या संगितीमध्ये १००० स्थविर भिक्खूंनी भाग घेतला होता. भन्ते मोगली पुत्त तिस्स थेरो हे तिसऱ्या संगितीचे अध्यक्ष होते. या संगितीमध्ये विश्लेषणात्मक व तर्कशुद्ध विचार करणाऱ्या ( Analytical Reasoning) बौद्धांना प्राधान्य देण्यात आले होते. ही संगिती नऊ महिन्यांपर्यत चालली.

या संगितीनंतर भन्ते मोगली पुत्त तिस्स थेरो यांनी चुकीच्या मतांचे खंडण करणारा व धम्माचे शुद्ध स्वरूप दाखवणारा कथावत्थु हा ग्रंथ लिहिला.

चौथी धम्म संगिती

राजा वट्टगामिनी याच्या काळात इ.स.पूर्व २९मध्ये श्रीलंकेत चौथी धम्म संगिती भरली. या संगितीमध्ये ५००विद्वान भिक्खूंनी (थेरोंनी) भाग घेतला होता. या संगितीच्या अध्यक्षपदी भन्ते रक्खित होते. या संगितीदरम्यान मध्ये संपूर्ण त्रिपिटकाचे संगायन (संकलन) होऊन ते लिपिबद्ध झाले.

पाचवी संगिती

पाचवी धम्म संगिती ही राजा मिं डों मी याने सन १८७१ मध्ये ब्रम्हदेशातील मंडाले शहरात भरवली होती. या संगितीमध्ये २४०० विद्वान भिक्खूंनी भाग घेतला. या संगितीच्या अध्क्षस्थानी क्रमाक्रमाने महाथेरो जागराभिवंस, महाथेरो नरिंदाभिधज, महाथेरो सुमंगल सामी हे होते. या संगितीमध्ये त्रिपिटकाचे संगायन (संकलन) आणि ते संगमरवरी दगडावर लिहिण्याचे काम झाले. त्याला पाच महिने लागले.

सहावी संगिती

सहावी धम्म संगिती ही ब्रम्हदेशाचे पंतप्रधान ऊ नू यांनी १९५४ सालच्या मेमध्ये रंगून येथे आयोजित केली होती. या संगितीमध्ये २५०० विद्वान भिक्खूंनी भाग घेतला होता. हे भिक्खू प्रामुख्याने ब्रम्हदेश, श्रीलंका थायलंड,कांबोडिया, भारत, इत्यादी देशांतून आले होते, तसेच या संगिती मधे डॉ.भिमराव आंबेडकर हे देखील आमंत्रित होते, या संगितीची अध्यक्षता भन्ते अभिधज महारठ्ठगुरू भदंत रेवत यांनी केली. या संगितीमध्ये त्रिपिटक तसेच त्याच्या अठ्ठकथा, टीका इ. पुन्हा तपासल्या व दुरुस्त करून त्या ब्रम्ही लिपीत छापल्या. ह्या संगितीचा समारोप गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणाला २५००वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने सन १९५३ च्या वैशाख पौर्णिमेला (बुद्ध पौर्णिमेला) केला गेला, या संगिती मधे पंतप्रधान ऊ नू यांनी डॉ. भिमराव(बाबासाहेब) रामजी आंबेडकर यांना 'बोधीसत्व' असे संबोधले (अशी पदवी देण्यात आली).

धम्मसंगिती या विषयांवरील पुस्तके

  • बुद्ध आणि त्यांचा धम्म (बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर )
  • धम्म संगिती (संजय प्रल्हादराव डोंगरे)
  • बौद्ध धम्माची पहिली संगिती (डी.टी. सावंत)