Jump to content

धनंजय थोरात

धनंजय थोरात हे एक सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांचे वडील स.ग. थोरात हे स्वातंत्र्य सैनिक होते आणि सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते होते. धनंजयच्या आई प्राथमिक शाळेतील शिक्षिका होत्या.

धनंजयचे शिक्षण पुण्याच्या शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये झाले. शाळेत असतानाच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कामात भाग घ्यायला सुरुवात केली. निवडणुकांदरम्यान स्लिपा लिहिणे, त्या घरोघरी वाटणे, पक्षाची पत्रके वाटणे, सभेची तयारी करणे आदी किरकोळ कामे त्यांनी केली.

पुढे ते पुणे शहर युवा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन पुढारी जयंतराव टिळक, विठ्ठलराव गाडगीळ, बाळासाहेब भारदे बॅ. अ.र. अंतुले, विलासराव देशमुख, सीताराम केसरी यांच्याबरोबर काम केले. त्यामुळे त्यांना पुणे महापालिकेच्या गुरुवार पेठेतील शितळादेवी चौक मतदार संघातून महापालिकेच्या निवडणुकीचे तिकीट मिळाले व ती जिंकून ते पुण्याचे नगरसेवक झाले. पदाच्या पहिल्याच मुदतीमध्ये त्यांना स्थायी समितीचे सदस्यत्व मिळाले.

पुढच्या निवडणुकीच्या वेळी थोरात नवीन मतदारसंघातून एका कुप्रसिद्ध स्थानिक कुप्रसिद्ध गुंडासमोर निवडणूक हरले. तेव्हा त्याला पुण्याच्या आर.टी.ओ. कमिटीचे सदस्य म्हणून नियुक्ती मिळाली.

थोरातांनी सुरेश भट यांचा पुण्यातील पहिला जाहीर कार्यक्रम त्यांनीच आयोजित केला तसेच पुण्यातील सांस्कृतिक महोत्सव, नवरात्र उत्सव आदींचे नियोजन संयोजन केले.

थोरात यांच्या स्मरणार्थ पुण्यात स्थापन झालेल्या कै. धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे इ.स. २००८पासून दरवर्षी सामाजिक कार्यकर्त्याला धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आणि कलावंतांना किंवा खेळाडूंना अन्य पुरस्कार देण्यात येतात.

आजवर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :- गुन्हेगारांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनाचे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ (२०१५), उदय जगताप (२०१४), अभिनेते नंदू पोळ (२०१४), अपंग पुनर्वसन कार्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्या नसीमा हुरजूक (२०१०), शिल्पकार प्रमोद कांबळे (२०१५), अमरावती जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब देशमुख (२०११), रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचे रमेश चव्हाण (२०११), सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजा दांडेकर (२०१५), येरवड्यातील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ चव्हाण (२०१०), राम बांगड (२०१६), डॉ. रावसाहेब कसबे (२०१६), सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण (२०१२), स्त्री-भ्रूणहत्या विरोधी चळवळीतील कार्यकर्त्या वर्षा देशपांडे (२०१२), लोककलाकार वसंत अवसरीकर, (२०११), पं. विजय सरदेशमुख (गायक, २०१६), गायक विद्याधर कोपरकर (२०१२), मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यदभाई, (२०११), अंध-अपंगासाठी कार्य करणाऱ्या सायली गुजर (२०१४), बचत गट आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील कार्यकर्त्या डॉ. सुधा कोठारी (२०१०), कवी सौमित्र तथा किशोर कदम (२०१०), वगैरे.