द्वारकानाथ संझगिरी
द्वारकानाथ संझगिरी (जन्म: १५ नोव्हेंबर १९५०) हे स्तंभलेखक, लेखक, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता आणि संगीत कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. जवळपास पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी अनेक मासिके आणि वर्तमानपत्रांसाठी प्रामुख्याने मराठीत, पण इतर काही प्रादेशिक भाषांमध्येसुद्धा, तसेच इंग्रजीमध्ये स्तंभलेखन केले आहे.
प्रारंभिक जीवन
द्वारकानाथ संझगिरी यांचा जन्म मुंबईत दादर (पूर्व) येथील हिंदू कॉलनीत झाला. त्यांनी किंग जॉर्ज स्कूल (आताचे राजा शिवाजी विद्यालय) आणि रामनारायण रुईया महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यांनी व्हीजेटीआय (वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, पूर्वीची व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट), माटुंगा येथून सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.
कारकीर्द
द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांत कारकीर्द केली, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते २००८ मध्ये मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. त्याचबरोबर त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख बनवली.
१९७० च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू करून, त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले. भारताने इंग्लंडमध्ये १९८३चा विश्वचषक जिंकल्यानंतर, त्यांनी इतर काही मित्रांसह 'एकच षटकार' हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले, ज्यासाठी संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले.
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून संझगिरींनी ‘आज दिनांक’, ‘सांझ लोकसत्ता’, ‘मिड-डे’, ‘तरुण भारत’, ‘पुढारी’ आणि इतर अनेक प्रकाशनांसाठी स्तंभलेखन करायला सुरुवात केली. लोकसत्तामधील त्यांचे क्रीडा लेख आणि प्रवासवर्णनसंबंधीत स्तंभ खूप गाजले. संझगिरी हे २५ वर्षांहून अधिक काळ ‘सामना’ या मराठी वृत्तपत्रासाठी अनेक क्रिकेट स्पर्धा कव्हर करत आहेत.
द्वारकानाथ संझगिरी यांनी १९८३पासून ते आजपर्यंतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक देखील कव्हर केले आहेत. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर ४० पुस्तके लिहिली आहेत.
नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धापासून संझगिरी एकपात्री स्टँडअप टॉक शो करत आहेत आणि त्यांनी आजपर्यंत हजाराहून अधिक असे कार्यक्रम केले आहेत.
सुनील गावसकर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांचा त्यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त सत्कार, सचिन तेंडुलकरांच्या विक्रमी ३५व्या कसोटी शतकानिमीत्त त्यांचा सत्कार, १९७१ च्या इंग्लिश मालिका विजेत्या भारतीय संघाचा सत्कार आणि सचिन तेंडुलकरांचा सर्वात अलीकडचा त्यांची पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार अशा अनेक मोठ्या कार्यक्रमांची संकल्पना आणि अंमलबजावणीही त्यांनी केली आहे.
'बोलंदाजी' या स्पोर्ट्स दूरचित्रवाणी शोसाठी ते प्रस्तुतकर्ता होते आणि 'मधु इथे अन् चंद्र तिथे' या अजून एका दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे पटकथा लेखक होते.
क्रिकेट विश्लेषक आणि तज्ज्ञ म्हणूनही ते विविध टीव्ही चॅनेल्सवर नियमितपणे दिसतात.
२००४पासून, द्वारकानाथ संझगिरी ‘ती रा की ट धा’ आणि ‘स्वरा आर्ट्स’ या संस्थांनी सादर केलेल्या संगीतमय कार्यक्रमांसाठी सूत्रसंचालन करत आहेत. या संगीतमय कार्यक्रमांमध्ये हिंदी चित्रपट आणि संगीत उद्योगातील दिग्गजांना संगीतमय श्रद्धांजली दिली जाते.
द्वारकानाथ संझगिरी यांनी लिहिलेली पुस्तके
खेळ
- शतकात एकच - सचिन
- चिरंजीव सचिन
- दिलखुलास बातचीत क्रिकेटपटूंशी
- खेलंदाजी
- बोलंदाजी
- चॅम्पियन्स
- चित्तवेधक विश्वचषक २००३
- क्रिकेट कॉकटेल
- क्रिकेट वर्ल्ड कप हायलाईट्स
- कथा विश्वचषकाच्या
- लंडन ऑलिम्पिक
- पॉवर प्ले
- स्टंप व्हिजन
- संवाद लिजंड्सशी
- स्टंप व्हिजन/क्रिकेट गाथा
- थर्ड अंपायर
- इंग्लिश ब्रेकफास्ट
प्रवासवर्णन
- फिश अँड चिप्स
- मुलूखगिरी
- फिरता – फिरता
- पूर्व अपूर्व
- फाळणीच्या देशात
- भटकेगिरी
- ब्लू लगून
- माझी बाहेरख्याली
- जीन अँड टॉनिक
चित्रपट आणि कलाकार
- फिल्मगिरी
- तिरकटधा
- ब्लॅक अँड व्हाईट
- वो भुली दास्तान
- आम्हांला वगळा
- देव आनंद
- लतादीदी
- प्यार का राग सुनो
- आशा भोसले, एक सुरेल झंझावात
व्यक्तीचित्रण
- अफलातून अवलिये / दशावतार
- वल्ली आणि वल्ली
विनोद
- खुल्लमखिल्ली
- स. न. वि. वि. /खुला खलिता
सामाजिक विषय
- तानापिहिनिपाजा
- दादर - एक पिनाकोलाडा
- रिव्हर्स स्वीप
- वेदनेचे गाणे
द्वारकानाथ संझगिरी यांना मिळालेले पुरस्कार
- दत्ता हलसगीकर साहित्य पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारचा साहित्यिक पुरस्कार
- महाराष्ट्र साहित्य संघाचा उत्कृष्ट लेखन पुरस्कार
- विद्याधर गोखले साहित्य पुरस्कार
- क्रीडाविषयक लेखनासाठी विश्वनाथ वाबळे पुरस्कार
- वृत्तपत्र लेखन संघाचा पुरस्कार