द्रौपदी मुर्मू
द्रौपदी मुर्मू | |
विद्यमान | |
पदग्रहण २५ जुलै २०२२ | |
पंतप्रधान | नरेंद्र मोदी |
---|---|
उपराष्ट्रपती | व्यंकय्या नायडू |
मागील | रामनाथ कोविंद |
कार्यकाळ १८ मे २०१५ – १२ जुलै २०२१ | |
मागील | सय्यद अहमद |
पुढील | रमेश बायस |
राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार), ओडिशा शासन | |
कार्यकाळ ६ ऑगस्ट २००२ – १६ मे २००४ | |
कार्यकाळ ६ मार्च २००० – ६ ऑगस्ट २००२ | |
आमदार, ओडिशा विधानसभा | |
कार्यकाळ ५ मार्च २००० – २१ मे २००९ | |
मतदारसंघ | रायरंगपूर |
जन्म | २० जून, १९५८ बैदापोसी, मयूरभंज जिल्हा, ओडिशा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पती | शामचरण मुर्मू |
अपत्ये | ३ |
शिक्षण | कला शाखेतील पदवी |
गुरुकुल | रमादेवी महिला विद्यापीठ, भुवनेश्वर |
द्रौपदी मुर्मू (जन्म: २० जून, १९५८) या एक भारतीय राजकारणी असून सध्या त्या भारताच्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत.[१] त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या होत्या.
२०२२ च्या भारतीय राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार होत्या. भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी निवड होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला [२][३] तर पहिल्या अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) व्यक्ती आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या त्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती असून आत्तापर्यंतच्या (तरुण) सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत.
त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत. G
वैयक्तिक आयुष्य
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसातील संथाळ नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत.[४][५] त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही पंचायती राज प्रणाली अंतर्गत गावप्रमुख होते.[६] इ.स. १९७९ मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला विद्यापीठातून द्रौपदी मुर्मू यांनी कला शाखेतील पदवी प्राप्त केली.
द्रौपदी मुर्मू यांनी श्यामचरण मुर्मू यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला दोन मुलगे आणि एक मुलगी असून पैकी दोन्ही मुलगे मरण पावले आहेत.[७]
कारकीर्द
त्यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केले.
त्यांनी श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून काम केले.
स्थानिक राजकारण
मुर्मू १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणूनही काम केले आहे.
ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात, त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या. २०००-२००४ आणि २००४-२००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार होत्या. त्यांना २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने 'सर्वोत्कृष्ट आमदार' म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले.
राज्यपालपद
त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. भारतातील राजकारणात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिशातील त्या पहिल्या महिला आणि पहिल्या आदिवासी नेत्या आहेत.
राष्ट्रपती निवडणूक
जून २०२२ मध्ये भाजपने २०२२ च्या भारतीय राष्ट्रपती निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या उमेदवार म्हणून मुर्मू यांना नामनिर्देशित केले.[८] तर यशवंत सिन्हा यांना विरोधी पक्षांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामांकन दिले होते. [९] निवडणूक प्रचारादरम्यान मुर्मू यांनी विविध राज्यांना भेटी देऊन त्यांच्या उमेदवारीसाठी पाठिंबा मागितला. BJD, YSRCP, JMM, BSP, SS, JD(S) यांसारख्या अनेक विरोधी पक्षांनी मतदानापूर्वी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला होता.[१०] [११] २१ जुलै २०२२ रोजी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत २८ पैकी २१ राज्यांमधील( पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशासह) ६,७६,८०३ इलेक्टोरल मते मिळवून विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. त्यांनी एकूण ६४.०३% मते मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले आणि त्या भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या. [१२]
२५ जुलै २०२२ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी भारतीय संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सरन्यायाधीश एनव्ही रमण यांच्या हस्ते राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. [१३]
राष्ट्रपतीपदाचा काळ (२०२२ - )
२५ जुलै २०२२ रोजी त्यांनी भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या भारतातील आदिवासी समुदायातील त्या पहिल्या व्यक्ती आहेत. [१४] [१५] [१६] [१७] तसेच भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या त्या सर्वात तरुण आणि राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या पहिल्या व्यक्ती आहेत. [१८] भारताच्या राष्ट्रपती म्हणून काम करणाऱ्या प्रतिभा पाटील यांच्यानंतर मुर्मू या दुसऱ्या महिला आहेत. [१९]
मोझांबिकच्या संसदीय शिष्टमंडळाने जुलै 2022 मध्ये मोझांबिकच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती भवनाला भेट दिली. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाची ही पहिलीच भेट होती. मुर्मू यांनी असेही नमूद केले की, "भारत आणि मोझांबिक यांच्यात नियमित उच्चस्तरीय भेटी होतात आणि दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध आहेत." [२०] [२१]
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ "स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा". Maharashtra Times. 2022-07-25 रोजी पाहिले.
- ^ "Draupadi Murmu, Former Jharkhand Governor, Is BJP's Choice For President". NDTV.com. 2022-06-21 रोजी पाहिले.
- ^ "BJP-led NDA names Draupadi Murmu, former governor of Jharkhand as candidate for presidential polls". Moneycontrol (इंग्रजी भाषेत). 2022-06-21 रोजी पाहिले.
- ^ "भाजपने राष्ट्रपती पदासाठी मूर्मू यांची निवड का केली? एका दगडात मारले अनेक पक्षी". India Darpan Live (इंग्रजी भाषेत). 2022-06-21. 2022-06-22 रोजी पाहिले.
- ^ "द्रौपदी मुर्मू कोण आहेत, ज्यांना भाजपने राष्ट्रपतिपदाची उमेदवारी दिलीय".
- ^ "Governor reaches out". Hindustan. Ranchi. 4 April 2018.
- ^ "Who is Draupadi Murmu?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-06-13. 2022-06-22 रोजी पाहिले.
- ^ "Draupadi Murmu to be NDA's candidate for presidential polls | India News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-06-21 रोजी पाहिले.
- ^ "India: BJP backs tribal politician Draupadi Murmu for president against former ally | DW | 18.07.2022". Deutsche Welle. 22 July 2022 रोजी पाहिले.
- ^ "Droupadi Murmu to visit Karnataka today, seek support for presidential polls". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-07-10. 2022-07-19 रोजी पाहिले.
- ^ "Murmu to visit Kolkata today to seek support". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-07-09. 2022-07-19 रोजी पाहिले.
- ^ "Presidential Election 2022 Result Live Updates: Droupadi Murmu makes history, becomes India's first tribal woman President". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 21 July 2022. 21 July 2022 रोजी पाहिले.
- ^ "All About The New President Of India: Draupadi Murmu » Market Place". Market Place (इंग्रजी भाषेत). 2022-07-19. 2022-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-07-22 रोजी पाहिले.
- ^ "Will Droupadi Murmu Remain a BJP Electoral Ploy or Help Unseen Adivasis Be Seen at Last?". The Wire. 22 July 2022. 22 July 2022 रोजी पाहिले.
- ^ "Explained: 5 things to know about Droupadi Murmu, President of India". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 22 July 2022. 22 July 2022 रोजी पाहिले.
- ^ "India: Tribal politician Draupadi Murmu wins presidential vote | DW | 21.07.2022". Deutsche Welle. 23 July 2022 रोजी पाहिले.
- ^ See links below
- ^ "In Droupadi Murmu, India gets its youngest and first president to be born after Independence". The New Indian Express. 21 July 2022. 25 July 2022 रोजी पाहिले.
- ^ "Droupadi Murmu: India's Youngest President and First to be Born After Independence". MSN (इंग्रजी भाषेत). 2022-07-21 रोजी पाहिले.
- ^ Admin, India Education Diary Bureau. "Parliamentary delegation from Mozambique called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan | India Education | Latest Education News | Global Educational News | Recent Educational News" (इंग्रजी भाषेत). 2022-07-31 रोजी पाहिले.
- ^ PTI (2022-07-29). "Parliamentary delegation from Mozambique calls on President Droupadi Murmu". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2022-07-31 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
मागील: रामनाथ कोविंद | भारतीय राष्ट्रपती जुलै २५, इ.स. २०२२ – - | पुढील: - |