Jump to content

देवप्रिया

देवप्रिया हे मराठी भाषेत फार मोठ्या प्रमाणात वापरले गेलेले वृत्त आहे. हे नावही श्री. माधव ज्युलियन यांनी दिलेले आहे. या अक्षरगणवृत्ताचे मात्रांच्या हिशोबात ७-७-७-५ असे उपभाग आहेत. 'विबुधप्रिया' या शंकराचार्य, मोरोपंत आदी कवींनी हाताळलेल्या छंदातही सप्तमात्रिक उपभाग असल्यामुळे त्या छंदाला जवळचे असे 'देवप्रिया' हे नाव या छंदाला माधवराव पटवर्धन यांनी दिले. जगन्नाथ प्रसाद 'भानु' यांच्या छन्द: प्रभाकर या हिंदी ग्रंथांत या वृत्ताचा उल्लेख 'सीता' या नावाने केला आहे.

याचा लघुगुरू आणि मात्रांचा क्रम असा आहे :

गा ल गा गागा ल गा गागा ल गा गागा ल गा
२ १ २ २२ १ २ २२ १ २ २२ १ २

मूळ उर्दू बहरचे नाव - रमल मुतदारिकुल आखिर सालिम मुरक्कब मुसम्मन' असे असून बहर-ए-रमलचे हे उपवृत्त समजले जाते.

रमलच्या शेवटच्या खंडात गा-ल-गा-गा वजनाऐवजी गा-ल-गा हे वजन घेतल्यास देवप्रिया होते.

खंड- ४, मात्रा २६ ( ७/७/७/५)

मराठी भाषेत या वृत्तात चपखल बसणाऱ्या शब्दांचा फार मोठा खजिना आहे. प्रत्येक वृत्त प्रत्येक भाषेत चालतेच असे नाही.

उदाहरणार्थ, उर्दूतील हलन्त लघु असणारी वृत्ते मराठीत वापरता येत नाहीत. कारण आपल्याकडे ती पद्धत नाही. आपण शेवटचे अक्षर हे गुरूच मानतो. आटापिटा करून वापरल्यास ती शोभत नाहीत.


देवप्रियाची काही उदाहरणे

१)

   कालच्या स्वप्नात माझ्या, येउनी गेलास तू
   वेदना माझ्या उशाला, ठेवुनी गेलास तू..
                     --- सुभाषचंद्र आपटे

२)

   दाटलेल्या हुंदक्याला दाबणे नाही बरे
   आसवांना पापण्यांनी रोखणे नाही बरे...
                   --- सुभाषचंद्र आपटे

३)

   सांजवेळी सोबतीला सावली देऊन जा
   भैरवी गाईन मी तू, मारवा गाऊन जा...
                    --- इलाही जमादार

काही इतर लोकप्रिय गीते

१) शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी

२) त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का

३) चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले

बाह्य दुवे

मनोगतावरील माहिती Archived 2005-05-23 at the Wayback Machine.