दीनदयाळ उपाध्याय गोरखपूर विद्यापीठ
उत्तर प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ. विद्यापीठीय कायद्यान्वये १९५६ मध्ये हे विद्यापीठ गोरखपूर येथे स्थापन होऊन १९५७ मध्ये प्रत्यक्षात कार्यान्वित झाले. या विद्यापीठाचे स्वरूप संलग्नक आणि अध्यापनात्मक असून त्याच्या क्षेत्रात उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर, देवरिया, बस्ती, बलिया, गाझीपूर, आझमगढ, फैजाबाद, गोंडा, सुलतानपूर, बहरइच, प्रतापगढ, मिर्झापूर, वाराणसी व जौनपूर हे जिल्हे अंतर्भूत होतात. सध्या विद्यापीठाचे एक घटक महाविद्यालय असून सु. ५८ महाविद्यालये त्यास संलग्न झालेली आहेत. विद्यापीठाचे प्रशासन व धोरण पुढील चार समित्या ठरवितात : (१) कार्यकारी मंडळ, (२) विद्वत्सभा, (३) विद्याविभाग आणि (४) प्रतिनिधी मंडळ. यांशिवाय संदर्भ समिती व इतर मंडळेही काही बाबतींत आपल्या योजना मांडतात. कुलगुरू हा पूर्ण वेळ काम करणारा सवेतन उच्चपदाधिकारी आहे.
मानव्यविद्या, कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, अभियांत्रिकी वगैरे विविध विषयांच्या शाखोपशाखा विद्यापीठात आहेत. पदव्युत्तर शिक्षणाचे समाजकल्याण पदवी पत्रक, तसेच चिनी, फ्रेंच, जर्मन, तिबेटी, भारतीय संगीत, छायाचित्रकला यांची पदवी पत्रके आणि छायाचित्रणकलेत प्रमाणपत्रेही विद्यापीठातर्फे दिली जातात.
पदवीपूर्व अभ्यासक्रमात इंग्रजी व हिंदी माध्यम असून पदव्युत्तर परीक्षांकरिता इंग्रजी माध्यम आहे.
सु. ८० हे. जमिनीच्या आवारात विद्यापीठाच्या अनेक भव्य वास्तू आहेत. विद्यापाठाच्या ग्रंथालयात १९६९ मध्ये ८५,६३४ पुस्तके होती व ५,४११ विविध नियतकालिके येत होती.
विद्यापीठाचे वनस्पतिविज्ञान आणि प्राचीन इतिहास व पुरातत्त्व हे दोन विभाग संशोधनाचे कार्य करतात. गोरखपूर जिल्ह्यात पुरातत्त्व विभागातर्फे उत्खनन करण्यात आले. या विभागाचे एक वस्तुसंग्रहालयही आहे. विद्यापीठाचे एक वनस्पति-उद्यान आहे.
भारतात आणि भारताबाहेर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील विद्यार्थी-सल्लागार-मंडळ माहिती पुरवते. विद्यापीठाचा १९६९-७० चा वार्षिक अर्थसंकल्प सु. ५५ लाख रुपयांचा होता. १९६९-७० मध्ये विद्यापीठीय संस्था व संलग्न महाविद्यालये यांमधून सु. ३६,८९१ विद्यार्थी शिकत होते.