दि.वि. गोखले
दिनकर विनायक(दि.वि.) गोखले ऊर्फ बंडोपंत गोखले (२५ मार्च १९२३ - २० ऑक्टोबर, इ.स. १९९६ हे एक सावरकरप्रेमी मराठी लेखक व पत्रकार होते. ते युद्धशास्त्राचे अभ्यासकही होते.[१] त्या विषयावर त्यांनी भरपूर वृत्तपत्रीय लेखन केले आहे. गोखले हे मुंबई पत्रकार संघाचे एक विश्वस्त होते. युद्धशास्त्रावर पत्रकारिता करणारे सावरकरप्रेमी ज.द. जोगळेकर हे बंडोपंतांचे मित्र होते. वि.दा. सावरकरांच्या निधनानंतर काढलेल्या 'विवेक'च्या पुरवणीत बाळशास्त्री हरदास, विद्याधर गोखले, ज.द. जोगळेकर आणि दि.वि. गोखले यांचे लेख होते.
गोखले यांनी काही काळ मुंबईच्या 'नवशक्ति' या वृत्तपत्रात काम केले. तसेच १९६२ मध्ये महाराष्ट्र टाइम्स हे वर्तमानपत्र सुरू झाले त्याचे ते पहिले वृत्तसंपादक होते.[२] १९६२ च्या भारत चीन युद्धाच्या वेळी त्यांनी महाराष्ट्र टाईम्समध्ये लिहिलेले युद्धविषयक लेख विशेष गाजले. पुढे या लेखांचे माओचे लष्करी आव्हान हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. त्याला पु.ल. देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिली. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.[३]
गोखले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि काही काळ पूर्णकालीन प्रचारक होते. मात्र स्वातंत्र्यानंतर संघाने संघटनेसाठी संघटन न करता समाजाभिमुख संघटन करावे ही भूमिका घेणाऱ्यांपैकी ते एक होते. संगलीजवळील मधुकरराव देवल यांच्या प्रकल्पाशी ते अनेक दशके निगडित होते. फाय फाउंडेशनच्या पुरस्कार निवड समितीचे ते सदस्य होते. दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे विश्वस्त म्हणू न गोखले यांनी काम पाहिले.
१९७५ मध्ये पुकारण्यात आलेल्या देशांतर्गत आणीबाणीच्या काळात दि वि गोखले यांनी तुरुंगवास भोगला होता.
गौरवग्रंथ
गोखले यांच्या कार्यांचा वेध घेणारा स्मृतिग्रंथ : 'पत्रकार दि.वि. गोखले व्यक्तित्व व कर्तृत्व' संपादक: नीला वसंत उपाध्ये. प्रकाशक: नवचैतन्य प्रकाशन.
ग्रंथसंपदा
- पहिले महायुद्ध
- माओचे लष्करी आव्हान
- युद्ध नेतृत्व
- युद्धमीमांसा
- श्री अयोध्या
- माझी शिपाईगिरी (अनुवादित)
संदर्भ आणि नोंदी
- ^ "दिग्गज पत्रकाराचे सार्थ स्मरण". Maharashtra Times. 2019-02-04 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "दिग्गज पत्रकाराचे सार्थ स्मरण". Maharashtra Times. 2019-02-04 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "सदरलेखन". Maharashtra Times. 2019-02-04 रोजी पाहिले.[permanent dead link]