दासबोध
दासबोध हा श्री समर्थ रामदास स्वामींनी १७व्या शतकात, त्यांचे पट्टशिष्य आणि लेखनिक कल्याणस्वामींकरवी लिहवून घेतलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील त्या काळात निबिड अरण्यात विसावलेल्या शिवथरच्या घळी शेजारच्या गुहेत लिहिला गेला.
रचना
दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. दासबोधामध्ये एकूण ७७५० ओव्या आहेत.[१]
एकेका समास एक एक विषय घेऊन रामदास स्वामींनी सांसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, जराजर्जरांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना, आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. या ग्रंथाचे पारायण देखील करतात.
समर्थांनी दासबोध दोनदा लिहिला. जुना २१ समासी दासबोध आणि सांप्रत प्रचलित असलेला नवा २०० समासी दासबोध. त्या जुन्या दासबोधाच्या आवृत्त्या बाबाजी अनंत प्रभु तेंडुलकर, आशिष करंदीकर, केशव जोशी, रा.शि. सहस्रबुद्धे, सुनीती सहस्रबुद्धे आदींनी संपादन करून प्रकाशित केल्या आहेत.
दासबोध हा असा आध्यात्मिक ग्रंथ आहे, जो सर्व ग्रन्थाचे सार आहे.
दासबोध हा असा एकमेव भारतीय आध्यात्मिक ग्रंथ आहे ज्याची सुरुवात गणेशाला वंदन, सरस्वतीला वंदन, अशी पठडीतली न होता, माणसाला साहजिकपणे पडणाऱ्या काही प्रश्नांनी होते.
श्रोते पुसती कोण ग्रंथ | काय बोलिलें
जी येथ | श्रवण केलियानें प्राप्त | काय आहे ||१||
हा कोणता ग्रंथ आहे? याचे नाव काय? यात प्रामुख्याने काय सांगितले आहे? हा ग्रंथ ऐकून मला काय मिळणार आहे? लगेच पुढच्याच ओवीत समर्थ या प्रश्नाचे उत्तर देतात,
ग्रन्था नाम दासबोध | गुरुशिष्यांचा संवाद |
येथ बोलिला विशद | भक्तिमार्ग ||२||
या ग्रंथाचे नाव दासबोध असे आहे. हा ग्रंथ गुरू-शिष्य संवादात्मक स्वरूपात आहे, आणि मी यात मुख्यत्वेकरून भक्तिमार्गाचे विस्तृत विवेचन केले आहे. पुस्तक लिहिण्यापूर्वीच त्या पुस्तकाचे ध्येय व नाव निश्चित आहे. ग्रंथाची सुरुवातच इतकी तर्कशुद्ध व विवेकपूर्ण आहे, याचा अर्थ नक्कीच यातील लिखाण हे निश्चयात्मक व विवेकपूर्ण असणार याची खात्री वाचकांना पहिल्या दोन ओव्यांतच पटते.
नवविधा भक्ती म्हणजे काय? खरे ज्ञान म्हणजे काय? वैराग्य कसे असते? अध्यात्म म्हणजे काय या सर्वाचा ऊहापोह मी येथून पुढे केलेला आहे असे सांगत रामदासस्वामी पुढे या ग्रंथाच्या लिखाणासाठी वापरलेल्या अनेक संदर्भ ग्रंथांची मोठी यादीच सादर करतात. व या दासबोध ग्रंथातील म्हणणे खोटे सिद्ध करायचे असेल तर वरील सर्व ग्रंथ खोटे मानावे लागतील अशी मेखही मारून ठेवतात.
दासबोधात आपल्या दैनंदिन आयुष्याल स्पर्श करणारे अक्षरशः शेकडो विषय येऊन जातात.
पण तो वाचण्याचा सर्वात महत्त्वाचा हेतू म्हणजे याच्या वाचनाने वाचकाला, जन्मापासून पडणाऱ्या खालील काही प्रश्नांची ठोस उत्तरे मिळतात.
१) मी कोण आहे?
२) मी इथे जन्माला का व कसा आलो?
३) माझ्या जन्माचा हेतू काय?
४) देव म्हणजे काय?
५) देव कसा आहे व काय करतो?
६) मूर्तिपूजा खरी आहे का? देव खरेच दर्शन देतो का?
७) आत्मा म्हणजे काय?
८) मृत्यूनंतर जीवाचे काय होते?
९) ही सृष्टी निर्माण कशी झाली?
१०) मुक्ती म्हणजे काय?, वगैरे.
दासबोधाचे जन्मस्थळ
समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ शिवथघळ येथे बसून लिहिला. शिवथरघळ ही महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात महाडपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. धुळ्याचे इतिहासतज्ज्ञ शंकर श्रीकृष्ण देव यांनी १९१६मध्ये झाडाझुडपांत लपलेली ही घळ शोधून काढली.
समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे.[२] :-
भक्तांचेनि साभिमानें।कृपा केली दाशरथीनें।समर्थकृपेचीं वचनें।तो हा दासबोध॥श्रीराम॥
वीस दशक दासबोध।श्रवणद्वारें घेतां शोध।मनकर्त्यास विशद।परमार्थ होतो ॥श्रीराम॥
वीस दशक दोनीसें समास।साधकें पाहावें सावकास।विवरतां विशेषाविशेष।कळों लागे॥श्रीराम॥
ग्रंथाचें करावें स्तवन।स्तवनाचें काये प्रयोजन।येथें प्रत्ययास कारण।प्रत्ययो पाहावा॥श्रीराम॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
दासबोधातील दशकांची व समासांची नावे [१]
क्र | दशक | समास |
---|---|---|
१ | स्तवन | ग्रंथारंभनिरुपण, गणेशस्तवन, शारदास्तवन, सद्गुरूस्तवन, संतस्तवन, श्रोतृस्तवन, कवीश्वरस्तवन, सभावर्णन, परमार्थस्तवन, नरदेहस्तवन |
२ | मूर्खलक्षण | मूर्खलक्षण, उत्तमलक्षण, कुविद्यालक्षण, भक्तिनिरूपण, रजोगुणनिरूपण, तमोगुणनिरूपण, सत्त्वगुणनिरूपण, सद्विद्यानिरूपण, विरक्तलक्षण, पढतमूर्खलक्षण |
३ | जन्मदुःख | जन्मदुःख, प्रथमसंबंध, द्वितीयसंबंध, संपत्तिवेध, कांताहरण, आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप, आधिदैविक ताप, मृत्यु, वैराग्यलक्षण |
४ | नवविधा भक्ति | श्रवणभक्ती, कीर्तनभक्ती, स्मरणभक्ती, पादसेवनभक्ती, अर्चनभक्ती, वंदनभक्ती, दास्यभक्ती, सख्यभक्ती, आत्मनिवेदन, मुक्तिचतुष्टय |
५ | मंत्रांचा दशक | गुरुनिश्चय, सद्गुरुलक्षण, सच्छिष्यलक्षण, उपदेशलक्षण, बहुधाज्ञान, शुद्धज्ञानलक्षण, बद्धलक्षण, मुमुक्षुलक्षण, साधकलक्षण, सिद्धलक्षण |
६ | देवशोधन | देवशोधन, ब्रह्मप्रतिपादन, मायोद्भव, ब्रह्मनिरूपण, मायाब्रह्म, सृष्टिकथन, सगुणभजन, दृश्यनिरसन, सारशोधन, अनिर्वाच्यनिरूपण |
७ | चौदा ब्रह्मांचा | मंगलाचरण, ब्रह्मनिरूपण, चतुर्दश ब्रह्म, विमल ब्रह्म, द्वैतकल्पना निरसन, बद्धमुक्त, साधनप्रतिष्ठा, श्रवण, श्रवण, देहातीत |
८ | मायोद्भवनाम ज्ञानदशक | देवदर्शन, आशंका, सूक्ष्म शंका, सूक्ष्म पंचभूते, पंचमहाभूतस्वरूप, दुश्चितलक्षण, मोक्षलक्षण, आत्मनिदर्शन, सिद्धलक्षण, शून्यत्वनिरसन |
९ | गु्णरूप | आशंका, ब्रह्म, निःसंदेह, जाणपण, अनुमाननिरसन, गुणरूप, विकल्पनिरसन, देहातीत, संदेहवारण, अलिप्त स्थिती |
१० | जगज्जोतिनाम | अंतःकरण, देहाशंका, देहाशंका, बीजलक्षण, पंचप्रलय, भ्रम, सगुणभजन, प्रचीत, प्रकृतिपुरुषनिदर्शन, चलाचल |
११ | भीमदशक | सिद्धांत, चत्वार देव, शिक्षा, विवेक, राजकारण, महंतलक्षण, चंचळ नदी, अंतरात्मविवरण, उपदेश, निस्पृहवर्तन |
१२ | विवेक वैराग्य | विमल लक्षण, प्रत्यय, देवभक्त, विवेक वैराग्य, आत्मनिवेदन, सृष्टिक्रम, विषयत्याग, काल, यत्नशिक्षा, उत्तमपुरुषनिदर्शन |
१३ | नामरूप | आत्मानात्मविवेक, सारासारविचार, उभारणी, प्रळय, काहाणी, लघुबोध, प्रत्यय, कर्तृलक्षण, आत्मविवरण, बोध |
१४ | अखंड ध्याननाम | निस्पृहलक्षण, भिक्षा, कवित्वलक्षण, कीर्तनलक्षण, हरिकथा, चातुर्यलक्षण, युगधर्म, अखंड ध्यान, शाश्वत ब्रह्म, माया |
१५ | आत्मदशक | चातुर्य, निस्पृहलक्षण, श्रेष्ठ अंतरात्मा, शाश्वत ब्रह्म, चंचल लक्षण, चातुर्य लक्षण, अधोर्ध्व लक्षण, सूक्ष्म जीव, पिंडोत्पत्ति, सिद्धांत |
१६ | सप्ततिन्वयाचा दशक | वाल्मीकिस्तवन, सूर्यस्तवन, पृथ्वीस्तवन,आपस्तवन, अग्निस्तवन, वायुस्तवन, महदभूतस्तवन, अंतरात्मा, उपासना, गुणभूत |
१७ | प्रकृतिपुरुष | देवबलात्कार, शिवशक्ति, श्रवणोपदेश, अनुमान, अजपा, देहात्मा, जगज्जीवन, तत्त्वविवरण, तनुचतुष्टय, सिद्ध |
१८ | बहुजिनसी | बहु देवस्थान, सर्वज्ञसंग, निस्पृह, देहदुर्लभता, करंटपरीक्षा, उत्तम परीक्षा, जनस्वभाव, अंतर्देव, निद्रा, श्रोता-अवलक्षण |
१९ | शिकवण | लेखनक्रिया, विवरण, करंट लक्षण, सदैव लक्षण, देहमान्य, बुद्धिवाद, यत्न,उपाधिलक्षण, राजकारण, विवेकलक्षण |
२० | पूर्णदशक | पूर्णापूर्ण, त्रिविध सृष्टि, सूक्ष्म नामाभिधान, शिवशक्ति, चत्वार जिन्नस, आत्मगुण, आत्मा, देहक्षेत्र, सूक्ष्मब्रह्म, विमल ब्रह्म |
जुन्या दासबोधातील २१ समास
- मंगलाचरण
- रघुनाथध्यान
- वक्तृश्रोतृलक्षण
- सद्गुरूलक्षण
- सच्छिष्यलक्षण
- वैराग्यनिरूपण
- सगुणध्यान
- आत्मनिवेदन
- निरभिमानशांती
- विविध शिकवण
- प्रारब्ध प्रयत्न
- संतस्तवन
- मीपणनिरसन
- पूर्ण समाधान
- रघुनाथचरित्र
- गुरुशिष्यसंवाद
- दृश्य-उच्छेद
- एकंकारनिरसन
- सत्संगमहिमा
- शुद्धज्ञानावरण ऊर्फ अहंकार
- अनिर्वाच्य ब्रह्म
दासबोधावरील विविध भाषांतील ग्रंथ
मराठीत दासबोधाच्या अनेकांनी संपादित केलेल्या आवृत्ती आहेत, आणि दासबोधाचे गुणावगुण सांगणारे अनेक ग्रंथ आहेत. खास दासबोधात वापरल्या गेलेल्या शब्दांचा एक शब्दकोशही आहे. अशा पुस्तकांची यादी. :-
- ग्रंथराज दासबोध (अर्थ -विवरणासह) खंड -१ : विवरणकार - समर्थव्रती सुनील चिंचोलकर
- दासबोध (लेखक : सूर्यकांत कुलकर्णी)
- दासबोध (इंग्रजी, खंड १, २ - अनुवादक : शिवराज पाटील चाकुरकर)
- दासबोध ऑफ समर्थ रामदास (इंग्रजी - लेखक : डी.ए. घैसास)
- श्री दासबोध कणिका (लेखक : कमल जोशी)
- दासबोध दशकसार (लेखक : अरविंद ब्रह्मे)
- श्री दासबोध नित्यपाठ (लेखक : अरुण गोडबोले)
- दासबोध : भावपराग (लेखक : पुरुषोत्तम नगरकर)
- दासबोध (हिंदी-माधवराव सप्रे)
- दासबोधाची कल्याणस्वामीकृत प्रत (शंकर श्रीकृष्ण देव)
- दासबोधाचे मानसशास्त्र (लेखक : सुनील चिंचोलकर)
- दासबोधातील कर्मयोग (लेखक : सुनील चिंचोलकर)
- दासबोधातील भक्तियोग (लेखक : सुनील चिंचोलकर)
- दासबोधातील ज्ञानयोग (लेखक : सुनील चिंचोलकर)
- दैनंदिन जीवनात दासबोध (लेखक : सुनील चिंचोलकर)
- दैनंदिन दासबोध (लेखक : माधव कानिटकर)
- निवडक दासबोध (लेखक : रा.रा. जांभेकर)
- मराठींत दासबोध (मनकर्णिका पब्लिकेशन)
- मला दासबोधीच लाभेल बोध (लेखक : सुनील चिंचोलकर)
- मुलांचा दासबोध (लेखक : सुधा दीक्षित)
- विद्यार्थ्यांचा दासबोध (लेखक : सुनील चिंचोलकर)
- रामदास वचनामृत (लेखक: गुरुदेव रानडे)
- रामदास : वाङ्मय आणि कार्य (न.र.फाटक)
- श्रीमत् दासबोध (लेखक : डॉ. श्रीकृष्ण द. देशमुख)
- 'श्रीमत् दासबोधा'तील निवडक ३८५ सार्थ अमृतवचने (लेखक: यशश्री य. भवाळकर)
- श्रीमत् लक्ष दासबोध (शंकर धोंडो क्षीरसागर)
- श्रीमंत दासबोध सार (लेखक : सुरेखा बापट)
- श्रीमद् दासबोध - गद्यरूपांतरासहित - दशक १ ते ८ (कमलताई वैद्य)
- श्रीसमर्थ रामदास वाङ्मय : शब्दार्थ संदर्भ कोश (मु.श्री. कानडे)
- समर्थ रामदासस्वामीकृत दासबोध (स्वामी निश्चलानंद सरस्वती)
- समर्थ रामदासांची व्यवस्थापन नीती (लेखक : डॉ. सुधीर निरगुडकर)
- सार्थ एकवीरा समाधी - अर्थात् जुना दासबोध (डॉ. सुनीती सहस्रबुद्धे)
- सार्थ दासबोध (ल.रा. पांगारकर)
- सार्थ श्रीदासबोध (लेखक : सुनील चिंचोलकर)
- सार्थ श्रीमत् दासबोध (लेखक : प्रा. के वि बेलसरे)
- सुबोध दासबोध (लेखक : डॉ. सी.ग. देसाई)
- श्रीसमर्थ रामदासस्वामी-विरचित श्रीदासबोध, भट आणि मंडळी, बुधवार पेठ, पुणे, १९१५
हे सुद्धा पहा
दासबोध.भारत Archived 2020-01-28 at the Wayback Machine.