Jump to content

दाजी भाटवडेकर

दाजी भाटवडेकर
जन्मकेशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर
सप्टेंबर १५, १९२१
मृत्यूडिसेंबर २६, २००६
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
भाषामराठी
प्रमुख नाटके तुझे आहे तुजपाशी,
सुंदर मी होणार,
अंमलदार,
एकच प्याला
प्रमुख चित्रपट घर गंगेच्या काठी,
तोचि एक समर्थ
पुरस्कारपद्मश्री पुरस्कार
वडील मोरेश्वर भालचंद्र भाटवडेकर
पत्नी चारुशीला भाटवडेकर
अपत्ये दिलीप भाटवडेकर

डॉ. दाजी भाटवडेकर ऊर्फ केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर (सप्टेंबर १५ १९२१ - डिसेंबर २६, २००६) हे मराठीतील प्रसिद्ध नाट्यअभिनेते होते. मराठी रंगभूमीबरोबरच इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी रंगभूमीवरही त्यांनी काम केले.

दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होते. त्याकाळी त्यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते. त्यांचे घराणे संपन्‍न असले तरी घरांत धार्मिक आणि संस्कृती जपणारे वातावरण होते.दर एकादशीला घरात कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम होत असे. दर पंधरवड्याला होणाऱ्या असल्या कार्यक्रमातील नाट्याचा आणि कथानकांचा दाजींच्या मनावर खोल परिणाम झाला. ते कीर्तनकार बुबांच्या आवाजाची आणि बोलण्याच्या ढंगाची हुबेहूब नक्कल करीत असत. अगदी बालवयात म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी गिरगावातल्या ब्राह्मणसभेत तासभर कीर्तन करून "बालकीर्तनकार' असा लौकिक दाजींनी मिळवला होता. पुढे आर्यन हायस्कूलमध्येही अनेक वर्षे कृष्ण जयंतीला त्यांचे कीर्तन होत असे. नाशिकला गोऱ्या रामाच्या देवळातही त्यांचे कीर्तन झाले होते. १९४४मध्ये संस्कृत विषय घेऊन एम. ए. झाल्यावर मुंबईच्या ब्राह्मणसभेत केलेल्या कीर्तनानंतर त्यांनी कीर्तनात गुंतून न राहण्याचे ठरवले. त्यामंतर भरदार आवाजाची देणगी मिळालेल्या दाजींनी संगीत नाटकांत भूमिका करायला सुरुवात केली.

दाजींच्या दुर्दैवाने पुढे मराठी संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. संभाषणात नाटकी अभिनिवेशाने बोलण्याच्या जागी वास्तव शैलीने बोलायची पद्धत पडू लागली. मग दाजींनी आपला मोहरा संस्कृत रंगभूमीकडे वळवला. दाजी स्वतः उच्चशिक्षित आणि संस्‍कृत नाटकांचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संस्कृत रंगभूमीची चळवळ सुरू करायला फारशी अडचण पडली नाही.. मुंबईच्या ब्राह्मण सभेत त्यांनी १९५० ते १९८० या काळात दर वर्षाला एक नवे संस्कृत नाटक रंगभूमीवर आणले. कालिदास महोत्सवाच्या काळात दाजींनी ’अभिज्ञानशाकुंतल’ या संस्कृत नाटकाचा प्रयोग भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अन्य सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत सादर करून वाहवा मिळवली. रंगभूमीवर त्यांनी केवळ संस्कृत नाटकेच केली नाहीत, तर गाजलेल्या मराठी नाटकांचे संस्कृतमध्ये रूपांतर करून त्याचे प्रयोगही केले.

संस्कृत नाटकांनाही पुढे प्रेक्षक मिळेनासे झाले. मात्र, ही नाटके सादर करताना काय काय अनुभव आणि अडचणी आल्या यावर दाजींनी लिहिलेला प्रबंध मुंबई विद्यापीठाने स्वीकारून त्यांनी डॉक्टरेट दिली.

व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी ४० नाटकांत एकूण ५० भूमिका साकार केल्या. तुझे आहे तुजपाशी या नाटकातील "काकाजी' ही भूमिका त्यांनी अजरामर केली. दाजी भाटवडेकरानंतर ती भूमिका तेवढ्या ताकदीने कुठलाही अभिनेता करू शकलेला नाही.

"घर गंगेच्या काठी' हा चित्रपट आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या जीवनावरील श्री स्वामी समर्थांची भूमिका यांसारख्या त्यांच्या चित्रपटांतील भूमिकाही गाजल्या. दूरदर्शनवरील मालिकांमधूनही ते चमकले. आकाशवाणीच्या अनेक श्रुतिकांमधूनही त्यांनी कामे केली. आपल्या सुमारे ६५ वर्षांहूनही अधिक काळातील नाट्य कारकिर्दीत त्यांनी सत्तराहून अधिक भूमिका केल्या. केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य तसेच राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. अनेक पुरस्कारही त्यांच्याकडे चालत आले.

दाजी भाटवडेकर यांचा अभिनय असलेली नाटके आणि त्यातील त्यांची भूमिका

  • अंमलदार (डेरेसाहेब)
  • एकच प्याला (सुधाकर)
  • कृष्ण द्वीप (हिंदी)
  • तुझे आहे तुजपाशी (काकाजी)
  • दुर्गा (जिवाजीराव)
  • मानापमान (लक्ष्मीधर, विलासधर)
  • मृच्छकटिक (शकार)
  • बॉर्न येस्टरडे (इंग्रजी, दिग्दर्शक - हर्बर्ट मार्शल)
  • बेबंदशाही (कलुषा कब्जी)
  • भाऊबंदकी (तुळोजी, राघोबा, सखाराम बापू)
  • भावबंधन (घनश्याम, धनेश्वर, मोरू)
  • म्युनिसिपालिटी (पांडोबा)
  • लग्नाची बेडी ( कांचन, गोकर्ण, तिमिर)
  • शारदा ( कांचनशेट, भद्रेश्वर)
  • संशयकल्लोळ (फाल्गुनराव, वैशाखशेठ)
  • सुंदर मी होणार (
  • सौभद्र (बलराम)
  • स्वयंवर (रुक्मी)

सन्मान आणि पुरस्कार

  • भारत सरकारची पद्मश्री
  • १९६५ सालचे संगीत नाटक अकादमीचे राष्ट्रपती सुवर्णपदक
  • शारदा पीठाची नटसम्रात ही पदवी
  • कलकत्त्याच्या लिटिल थिएटरचा गुणसंवर्धना बहुमान
  • रंगभूमीशी संंबंधित अभ्यासपूर्ण उपक्रम, समित्या आदींत सहभाग
  • १९७६ साली दिल्लीत भरलेल्या ५७व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद
  • दाजींच्या संस्कृत रंगभूमीवरील योगदानाबद्दल भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पां.वा. काणे यांनी त्यांच्या एका ग्रंथातील परिशिष्टात खास उल्लेख केला आहे.


संदर्भ

  • ई-सकाळ (डिसेंबर २७, २००६ मधून: (पुढील मजकुरातील माहिती लेखात भरून झाल्यावर पुढील मजकूर उडवावा.)

मुंबई, ता. २७ : व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या पहाडी आवाजाने, अभिनयाने अधिराज्य गाजविलेले नटश्रेष्ठ पद्मश्री दाजी भाटवडेकर यांचे मंगळवार दि. २६ डिसेंबर रोजी दुःखद निधन रात्री ११.३० वाजता झाले.

१ सप्टेंबर रोजी घरी पाय घसरून पडल्यामुळे त्यांना मोतीबेन दळवी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी घरीच राहणे पसंत केले होते. निधनसमयी त्यांचे वय ८६ होते. त्यांच्या पश्‍च्यात त्यांची पत्नी चारुशीला भाटवडेकर, मुलगा दिलीप भाटवडेकर हे आहेत. त्यांच्या पार्थिवावर गिरगावच्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दाजी भाटवडेकरांचा जन्म १९२० साली झाला. व्यावसायिक रंगभूमीवरील ते उच्चशिक्षित अभिनेते होते. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत तशा तिन्ही भाषेचा गाढा अभ्यास होता. स्पष्ट शब्दोच्चार, पहाडी आवाज आणि आपल्या समर्थ अभिनयानी गेली चार तपं त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी ४० नाटकात एकूण ५० भूमिका साकार केल्या. तुझं आहे तुजपाशी या नाटकातील "काकाजी' ही भूमिका त्यांनी अजरामर केली. दाजी भाटवडेकरानंतर ती भूमिका तेवढ्या ताकदीनं कुठलाही अभिनेता करू शकलेला नाही. सुंदर मी होणार या नाटकातील "महाराज', "अंमलदार नाटकातील "डेरेसाहेब', मानापमान नाटकातील "लक्ष्मीघर' सौभद्र नाटकातील (बलराम), संशयकल्लोळ नाटकातील (फाल्गुनराव), एकच प्याला नाटकातील (सुधाकर), भावबंधन नाटकातील (घनश्‍याम) इत्यादी नाटकातील भूमिका गाजलेल्या आहेत. दाजी भाटवडेकरांच्या निधनाने रंगभूमीवरील एक सच्चा, पहाडी आवाजाचा, संस्कृतचा गाठा अभ्यासक, चार दशकं रंगभूमीची सेवा करणारा काकाजी गेला असेच म्हणावं लागेल. काकाजींच्या निरोप संध्येस सर्वथरातील मंडळी हजर होती.

  • ई-सकाळ (डिसेंबर २९, २००६ मधून अग्रलेख: (पुढील मजकुरातील माहिती लेखात भरून झाल्यावर पुढील मजकूर उडवावा.)

विचारवंत अभिनेता
दाजी भाटवडेकर यांच्या निधनाने एका विचारवंत अभिनेत्याला आपण सारे मुकलो आहोत. दाजी हे मराठी रंगभूमीवरील म्हणून जसे ओळखले जात, तसेच संस्कृत रंगभूमी पुनरुज्जीवित करणारे गाढे विद्वान, इंग्रजी आणि हिंदीतूनही रंगभूमी फुलविणारे कलाकार आणि त्याचबरोबर साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातही भरीव कामगिरी केलेले विचारवंत म्हणूनही दीर्घ काळ स्मरणात राहतील. केशवचंद्र मोरेश्‍वर तथा दाजी भाटवडेकर यांचा जन्म १५ सप्टेंबर १९२१ चा. सर भालचंद्र भाटवडेकर यांचे ते नातू. सर भालचंद्र यांच्या कर्तृत्वामुळे आणि वडील मोरेश्‍वर यांच्या संस्कारांमुळे दाजी लहानपणापासूनच गर्भश्रीमंत असूनही समाजाविषयी कळवळा असणारे दानशूर आणि अभ्यासू म्हणून ओळखले गेले. पु.ल. देशपांडे यांच्या "तुझे आहे तुजपाशी' नाटकातील रसिक सौंदर्यासक्त "काकाजी'ची भूमिका आपल्या अभिनयाने अजरामर करणारे दाजी व्यक्तिगत आयुष्यातही रसिक आणि सौंदर्यासक्त होते. या काकाजीचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही खूप मोठा प्रभाव होता. स्वाभाविकच, त्यांच्या भल्या मोठ्या परंपरागत घराचा दिवाणखानाही या काकाजीच्या दिवाणखान्यासारखाच भासावा, अशा रीतीने त्यांनी त्याची रचना केलेली होती. अगदी बालवयात म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी गिरगावातल्या ब्राह्मणसभेत तासभर कीर्तन करून "बालकीर्तनकार' असा लौकिक मिळवला होता. पुढे आर्यन हायस्कूलमध्येही अनेक वर्षे कृष्ण जयंतीला त्यांचे कीर्तन होत असे. नाशिकला गोऱ्या रामाच्या देवळातही त्यांचे कीर्तन झाले होते. १९४४ मध्ये संस्कृत विषय घेऊन एम. ए. झाल्यावर मुंबईच्या ब्राह्मणसभेत केलेल्या कीर्तनानंतर त्यांनी कीर्तनात गुंतून न राहण्याचे ठरवले. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच ते अभिनयाच्या क्षेत्रात उतरले होते. शाळेच्या स्नेहसंमेलनात "पेस्तनजीकाकांची भूमिका त्यांनी केली होती. मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव यांनी त्यांना आमंत्रित केले. तेव्हापासून अखेरपर्यंत ते साहित्य संघाशी निगडित राहिले. के. नारायण काळे, गणपतराव बोडस आणि महामहोपाध्याय डॉ. पां.वा. काणे हे त्यांचे आदर्श होते. केशवराव दाते, मामा पेंडसे अशांसारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. संस्कृतमध्ये त्यांनी केवळ संस्कृतातील नाटकेच केली नाहीत, तर गाजलेल्या मराठी नाटकांचे संस्कृतमध्ये रूपांतर करून त्याचे प्रयोगही केले. संस्कृत रंगभूमी समोरील समस्यांचा संशोधनपर ग्रंथ त्यांनी तयार केला. वयाच्या सत्तरीनंतर म्हणजे १९९३ मध्ये मुंबई विद्यापीठाची "डॉक्‍टरेट' पदवी त्यांनी मिळवली.

डॉ. अ.ना. भालेरावांनी मराठी रंगभूमीची मरगळ दूर करण्यासाठी मराठी रंगभूमीवरील दिग्गजांना एकत्र आणून विविध नाटकांचे प्रयोग केले. अशा नाटकांमधून दाजींनी अनेक भूमिका केल्या. "संगीत संशयकल्लोळ'मधील "फाल्गुनराव', "सौंभद्रा'तील "बलराम', "एकच प्याला'तील "सुधाकर', "मानापमाना'तील "लक्ष्मीधर', "भाऊबंदकी'तील "राघोबा' यांबरोबरच "बेबंदशाही'मधील "कलुषा कब्जी' अशा विविधरंगी भूमिका त्यांनी केल्या. "पु.ल.'च्या "अंमलदार'मधील "ढेरेसाहेब' आणि "सुंदर मी होणार'मधील "महाराज' या त्यांच्या भूमिका जशा गाजल्या तशाच "घर गंगेच्या काठी' हा चित्रपट आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या जीवनावरील श्री स्वामी समर्थांची भूमिका यांसारख्या त्यांच्या चित्रपटांतील भूमिकाही गाजल्या. दूरदर्शनवरील मालिकांमधूनही ते चमकले. आकाशवाणीच्या अनेक श्रुतिकांमधूनही त्यांनी कामे केली. आपल्या सुमारे ६५ वर्षांहूनही अधिक काळातील नाट्य कारकिर्दीत त्यांनी सत्तराहून अधिक भूमिका केल्या. केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य तसेच राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. अनेक पुरस्कारही त्यांच्याकडे चालत आले. "नाट्यकला समाजाची जडणघडण करते आणि म्हणूनच नाट्यकलेने समाजाच्या आरोग्याला धक्का पोचणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. या कलेचा रसस्वाद घेताना रसिकांना लाज वाटता कामा नये, लेखकाला आविष्कार स्वातंत्र्य जरूर मिळावे; पण समाजस्वास्थ्याला विघातक असे स्वातंत्र्य नको, ही कला माणसाच्या दैनंदिन जीवनाचा आरसाच त्याच्या पुढ्यात ठेवणारी हवी', असे मानणारे ते विचारवंत रंगकर्मी होते. रंगभूमीच्या पडत्या काळात तिला सावरण्याचे काम करणाऱ्या रंगकर्मींपैकी एक असणारे दाजी आज व्यावसायिक रंगभूमीला पुन्हा एकदा मरगळ आली असताना, नवी दिशा देण्यासाठी आपल्यामध्ये नाही. त; ही एकूण समाजाचीही हानी आहे.