दागिने
दागिने म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अलंकार. अर्थात, पुरुषांचे आणि मुलांचेही काही खास दागिने असतात. दागिने हे सर्वसाधारणतः विशेष दुर्मीळ (आणि अर्थात किंमती) धातूंपासून केलेले असतात आणि त्यांत बरेचदा विविध सुंदर हिरे बसवलेले असतांत.
घडण
सूचनेनुसार एखादा तसाच्या तसा दागिना तयार करायला खूप कौशल्य लागते. हे काम हाताने करावे लागते. टिकल्या पाडणे, तार तयार करणे, जोडकाम करणे, तासकाम करणे अशा वेगवेगळ्या टप्प्यांमधून धातू जातो आणि मग दागिना घडतो. काही दागिने साच्यातून दाब देऊन बनवले जातात. सोन्याच्या पत्र्यावर ठसा उमटवूनही दागिने घडवले जातात. त्यावर जोडकाम, तासकाम आणि चमक आणणे यासारख्या प्रक्रिया हाताने केल्या जातात. डाग दिल्यावर जो जाड भाग तयार होत जातो भाग म्हणजे बिरडे. बिरड्या म्हणजे अलंकराचे निर- निराळे पदर जेथें एकत्र करतात तें टोपण, जाड तुकडा. हे काहीवेळा गोल कडे स्वरूपात असू शकते. कधीकधी या कड्यावर एक धातूचा ठिपकाही असते. दागिने घडवताना सोन्याचा वापर अधिक होतो. तसेच बांगड्या, अंगठ्या हे प्रकार मुशीत धातू ओतूनही तयार केले जातात. धातूवर नक्षीकाम तयार करणे ही एक कला आहे. यासाठी पूर्वी पारंपरिकरित्या प्रशिक्षित कारागीर असत. परंतु नवीन तंत्रज्ञानुसार आता हे काम संगणकावरही केले जाते. त्यासाठी कॅड (CAD) कॉम्प्युटरएडेड डिझायनिंग या संगणक प्रणालीद्वारा दागिन्यांच्या नक्षीचे काम केले जाते. ही बनवलेली नक्षी कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग मशिनमध्ये फीड करून त्यातून एक प्रतिकृती बनवली जाते. ही काहीवेळा मेणातही बनवली जाते. त्यात योग्य त्या सुधारणा करून मग दागिना घडवला जातो.
प्रकार
दागिन्यांमध्ये अनेक प्रकार आहेत.
- बोटातले दागिने=अंगठी, नाग, नागमूद, मुदी, मुद्रा, मुद्रिका, वळे, सिका, दर्भाची अंगठी,दशांगुळे इत्यादी
- केसात घालायचे दागिने=आकडा, सुवर्णफूल,मूद,बिंदी,अग्रफुल,चांदीची /सोन्याची वेणी,तुरा,केसात घालायची सुवर्णफुले किंवा रत्नफुले, रविफूल, सूर्यफूल, गुलाबफूल,सूर्य-चंद्र, वगैरे.
- गळ्यांतले दागिने= एकदाणी, एकसर, ओवेर साज, कंठा, कंठी, कंठीहार, काशी ताळी, गहू माळ, गोखरू माळ, गोफ, चंद्रहार, चपलाकंठी,चपलाहार ,कोल्हापुरी साज ,चाफेकळी माळ,चिंचपेटी ,चोकर, चितांग, चौसरा, जोंधळी पोत, टीकमणी, सर,वज्रटिक(टिका), ठुशी, डोरले, डाळी टिका, तन्मणी, ताईत, तांदळी पोत, तायत्या, दुल्लडी, नळ्याची पोत, पाभर, पुतळ्यांची माळ, पोहेहार, बकुळहार, बोरमाळ, मंगळसूत्र, माळ, मोहनमाळ, लड, लफ्फा, लक्ष्मीहार, वज्रटीक, शिरण, राणी हार,श्रीमंतहार, सर, सरी, साखळी, साज, हरपर रेवडी हार, हार ,वाघनखे , फलकमाला (कवचासारखी दिसणारी मोठ्या आकाराची कॉलर)इत्यादी .
- मनगटातले दागिने=कंकण, कंगन, कडे, गजरा, गोठ, तोडा, शिंदेशाही तोडा, पाटली, पिछोडी, पो(व)ची, बांगड्या, बिलवर, इत्यादी
- दंडात घालायचे दागिने= वाकी,बाजूबंद,नागफणी
- कमरेवरचे दागिने= , कंबरपट्टा(कमरपट्टा), करदोटा, पोंद, मेखला, छल्ला, , इत्यादी
- कर्णालंकार: कुंडल, कुडी,झुबे , डूल, बाळी, भिकबाळी, बुगडी, काप , वेल, सुवर्णफुले,चौकडा
- पायातील दागिने=चाळ,तोडर,नूपुर,पैंजण,जोडवी,मासोळी,विरोली,मंजीर,वाळा,वेढणी
- नाकातले दागिने=चमकी, नथ, सुंकली,मोरणी
- देवाचे दागिने = मोरपीस,फरा,मुकुट : गणपतीच्या कपाळावर डोक्याकडून खाली उतरलेला रत्नखचीत फरा असतो.माणूस जे दागिने घालतो त्यातील बरेचसे दागिने देवतेलाही घालण्याची प्रथा आहे.
- अन्य दागिने-कलगी,कांडवाळे,मौलमणी,वेढे,शिरपेच,शिरस्त्राण,साखळी
लहान मुलांचे दागिने
- कडे
- कमर साखळी
- कांडवळे (कांडोळे)
- कुयरी
- घुंगरू
- सुंकले
- चुटक्या
- डूल
- ताईत
- तांबोळे
- दसांगुळे
- बिंदल्या
- बेडी
- मनगट्या
- वाकडा ताईत
- वाघनखे
- वाळा (दागिना)
- साखळी
- हंसळी
प्रशिक्षण
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी
या संस्थेत तीन वर्षांचा डिझायनिंगचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे.
चित्र दालन (दागिन्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार)
- हिऱ्यांचे कर्णालंकार
- क्रिस्टल लोंबते कर्णभूषण
- कर्णालंकार
- दागिन्यांचे नक्षी
- मोत्याची माळ
- पारंपरिक दागिने घातलेल्या महिला
बाह्य दुवे
- ऑलडिझाइन.कॉम - दागिन्यांचे डिझाइन Archived 2010-01-09 at the Wayback Machine.