दत्ता हलसगीकर
दत्ता हलसगीकर | |
---|---|
जन्म नाव | गणेश तात्याराव हलसगीकर |
टोपणनाव | दत्ता हलसगीकर |
जन्म | ऑगस्ट ७, इ.स. १९३४ गोलगिरी, कर्नाटक, भारत |
मृत्यू | जून ९, इ.स. २०१२ सोलापूर,महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, काव्यरचना |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | ललितलेख, कविता |
प्रसिद्ध साहित्यकृती | ’उंची’नामक कविता |
वडील | तात्याराव |
आई | लक्ष्मी |
अपत्ये | दोन मुलगे |
दत्ता हलसगीकर ऊर्फ गणेश तात्याजी हलसगीकर हे मराठीतले एक कवी होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे ७ ऑगस्ट १९३४ रोजी झाला. मराठीतील विख्यात कवी कवी कुंजविहारी हे दत्ता हलसगीकरांचे मामा लागत. सोलापूरमधील लक्ष्मी विष्णू मिल नावाच्या कापडगिरणीमध्ये हलसगीकरांनी वयाच्या साठाव्या वयापर्यंत नोकरी केली. किशोर वयातच त्यांनी कविता करायला सुरुवात केली, आणि मरेपर्यंत त्यांची काव्यरचना आणि त्यांचे ललितलेखन अव्याहत चालू होते.
ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत; ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत अशा प्रकारची दत्ता हलसगीकरांची सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी आशयघन कविता होती. हलसगीकरांचे वास्तव्य शेवटपर्यंत सोलापुरात होते. अर्धांगवायुविकाराने त्यांचे निधन ९ जून २०१२ रोजी झाले.
त्यांच्या ’उंची’ या कवितेचे विविध अशा २२ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. ती कविता आकाशवाणीवरून अनेकदा सादर करण्यात आली होती. २०११ साली आकाशवाणीवर झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात दत्ता हलसगीकरांचा सक्रिय सहभाग होता. वाराणशीमध्ये झालेल्या सर्वभाषी कविसंमेलनातही हलसगीकरांनी आपली ’उंची’ ही कविता वाचली होती.
पुणे आकाशवाणीच्या हीरक महोत्सवानिमित्त १९-३-२०१३ रोजी दत्ता हलसगीकरांवरती ’शुभंकराचा सांगाती’ नावाचा कार्यक्रम नभोवाणीवर झाला होता. त्या कार्यक्रमात हलसगीकरांच्या काही कवितांचे अभिवाचन व राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेल्या कवितांचे गायन झाले होते.
दत्ता हलसगीकरांचे काव्यसंग्रह
- आशयघन
- उन्हातल्या चांदण्यात
- करुणाघन
- कोषातून बाहेर
- चाहूल वसंताची
- झोका (बालकविता)
- शब्दरूप मी
- सहवास
दत्ता हलसगीकर यांची अन्य पुस्तके
- कवितेतील अमृतघन (समीक्षा)
- तरुणासाठी दासबोध (ललित)
- परखड तुकाराम (ललित)
- बहिणाबाईंची गाणी (संपादित)
दत्ता हलसगीकरांच्या प्रसिद्ध कविता
- इथे फुलांच्या मार्गावरती सर्प हिंडती सदा
- ज्यांची बाग फुलून आली
- झपझप चाललेत नाजुक पाय
- तू नाहीस कसे म्हणू, प्राणातुन वाजे वेणू
- पैशाचा मोह असा की सूर्यही झाकला जातो
- समुद्र लाटेसारखी धावत आलीस माझ्या भेटीला
दत्ता हलसगीकर आणि त्यांच्या काव्यावरील पुस्तके
- कवितेचा आत्मस्वर दत्ता हलसगीकर (ललित चरित्र, लेखक -लक्ष्मीनारायण बोल्ली]])