Jump to content

दक्ष प्रजापति

हिंदू पौराणिक साहित्यानुसार दक्ष प्राचेतस (मराठी लेखनभेद: दक्ष प्राचेतस प्रजापती;) हा चाक्षुष मन्वंतरातील सृष्टी निर्मिणारा प्रजापति व ऋषी होता. 'प्रचेतस्' या समूहनामाने ओळखल्या जाणाऱ्या दहा ऋषींचा व कंडु ॠषीची कन्या मारिषा यांचा हा पुत्र होता[]. मत्स्य पुराणानुसार याच्या पूर्वीच्या काळी संकल्प, दर्शन व स्पर्श या मार्गांनी प्रजोत्पादन होत असे. या पद्धती बंद करून मैथुनाद्वारे संततिप्राप्तीची नवी परंपरा याने आरंभली[].

प्रजावॄद्धी

भागवत पुराणानुसार याने आपल्या मनःसामर्थ्याने संतती निर्मिण्याचे केलेले प्रयत्न निष्फळ ठरले व त्यामुळे त्याने वीर्याद्वारे मैथुनज संतती निर्मिण्याचे ठरवले. त्यासाठी याने विंध्य पर्वताजवळच्या अघमर्षण तीर्थाजवळ तपस्या करून विष्णूस प्रसन्न करवून घेतले. विष्णूने याला पंचजन प्रजापतीची कन्या असिक्री दिली व तिच्यापासून प्रजावृद्धी करण्यास सांगितले[].

असिक्रीपासून याला हर्यश्व आदी १,००० पुत्र झाले[]. मात्र नारदाने त्या पुत्रांना प्रजोत्पादनापासून परावृत्त करून मोक्षमार्गास प्रवृत्त केले. तेव्हा सृष्टीनिर्मितीसाठी दक्ष प्राचेतसाने ६० कन्या उपजवून त्या धर्म, कश्यप, चंद्र आदी ऋषींना दिल्या[]. यांपैकी कश्यपास दिलेल्या याच्या १३ कन्यांपासून देव, दानव, दैत्य, पर्वत, नाग, पक्षी, आदित्य, अप्सरामानव इत्यादी सृष्टीतील व्यक्तिमात्रांची उत्पत्ती झाली.

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b c d चित्राव, सिद्धेश्वरशास्त्री, ed. (१९६८). भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे. p. ४०८.
  2. ^ भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. p. ४०८.. भागवत पुराणानुसार याच्या पुत्रांची संख्या १,००० होती; तर महाभारतात ती १०,००० असल्याचे उल्लेख आढळतात.