Jump to content

त्सुनामी

त्सुनामी किनाऱ्याला धडकताना

त्सुनामी (जपानी: 津波 ; रोमन लिपी: Tsunami ;) म्हणजे समुद्र किंवा सरोवरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरित होते. त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का यांमुळे त्सुनामी निर्माण होवू शकतात.

त्सुनामी किनाऱ्याला धडकताना तयार होणारी मोठी लाट

त्सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ "बंदरातील लाटा" ( त्सु 津- बंदर, नामी 波 - लाटा ) असा आहे. हा शब्द कोळ्यांत प्रचलीत होता. मासेमारी करून परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे, पण समुद्रात लाटा दिसत नसत; त्यामुळे हे नाव देण्यात आले.

किनाऱ्यापासून दूर समुद्रात या लाटांची उंची जास्त नसते पण तरंगलांबी जास्त असते. त्यामुळे त्या दिसून येत नाहीत. परंतु जेव्हा या लाटा किनाऱ्याला धडकतात त्यावेळी त्यांची उंची वाढते व तरंगलांबी कमी होते, त्यामुळे पाण्यातील शक्ती किनाऱ्यावर आदळून नुकसान होते. खोल समुद्रामध्ये सुनामीची तरंगलांबी २०० कि.मी. व तरंगउंची १ मीटर असते. त्यावेळी वेग साधारण ताशी ८०० कि.मी. असतो. त्सुनामी किनाऱ्याला धडकताना त्यांचा वेग व ताकद धडक देते व नुकसान घडते.

इतिहास

२००४ हिंद महासागरातील सुनामी- थायलंड

पहिली सुनामीची नोंद ग्रीसमध्ये इ.स.पू. ४२६ साली झाली.

आधुनिक काळातील त्सुनाम्या

इ.स. २००४ सालातील पश्चिम सुमात्रा (इंडोनेशिया) सुनामी

इ.स. २००४ मध्ये आग्नेय् आशियात हिंदी महासागरात सुनामी आली होती. डिसेंबर २६, इ.स. २००४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुमात्रा बेटाजवळील समुद्रामध्ये ९.१ रिश्टर भूकंप झाला. त्यातून उद्भवलेल्या लाटांमुळे सुनामी निर्माण झाली. या सुनामीने इंडोनशिया, थायलंड, भारत, बर्मा, मादागास्कर, श्रीलंका या देशांना फटका बसला. ही नैसर्गिक आपत्तीच्या इतिहासात सर्वांत भयानक नुकसानकारक सुनामी ठरली. त्यात अंदाजे २,२७.९८८ [] लोकांचा बळी गेला.

देश↓नक्की मृत्यू↓अंदाजित↓जखमी↓हरवलेले↓स्थलांतरित↓
इंडोनेशिया१,३०,७३६१,६७,७३६.३७०६३५०००००+
श्रीलंका३५,३२२३५,३२२२१,४११.५,१६,१५०
भारत१२,४०५१८,०४५.५,६४०.
थायलंड५,३९३८,२१२८,४५७२,८१७७,०००
सोमालिया७८२८९..५,०००
म्यानमार६१४००-६००४५२००३,२००
मलेशिया६८७५२९९.

इ.स. २०११ सालातील जपान सुनामी

मार्च ११, इ.स. २०११ रोजी जपानाच्या किनारपट्ट्यांना सुनामीचा तडाखा बसला. जपानी प्रमाणवेळेनुसार दुपारी २.४६ वाजता जपानाच्या किनाऱ्यापासून १२५ कि.मी. अंतरावर सुमारे १० कि.मी. खोलीवर ८.९ रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. त्यातून उद्भवलेल्या सुनामीने काही मिनिटांतच किनारपट्टी गाठली. केवळ किनारपट्टीशीच न थांबता ही सुनामी किनाऱ्यापासून आत अनेक कि.मी. अंतरापर्यंत पसरत गेली. जमिनीवर पसरताना या लाटेने किनाऱ्याजवळच्या मोठ्या जहाजांना तर आपल्या कवेत घेतलेच; सोबत रस्त्यांवरील मोटारी, घरे आदींसह जे काही वाटेत आले ते सगळेच गिळंकृत केले.

नैसर्गिक संरक्षण

खारफुटीची वने व प्रवाळ बेटे तसेच कांदळवन नैसर्गिकरित्या सुनामीच्या तडाख्यांपासून भूपृष्ठाचे संरक्षण करतात.

२००४ हिंद महासागरातील सुनामी

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "यूएस जिऑलजिकल सर्व्हे - इ.स. २००४ सालातल्या पश्चिम सुमात्रा त्सुनामीतील नुकसान" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे