त्र्यंबक वसेकर
पूर्वायुष्य:
त्र्यंबक वसेकर हे मराठवाड्यातील चित्रकला शिक्षणाचे आद्य प्रवर्तक, ध्येयासक्त कला प्रसारक आणि चित्रकार होते. मराठवाड्यात त्यांनी चित्रकलेला मानाचे स्थान मिळवून दिले. वसेकर यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९१८ रोजी वसा (तालुका जिंतूर, जिल्हा परभणी) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सांबराव आणि आईचे नाव सुभद्राबाई होते.लहानपणीच प्लेगच्या साथीत त्यांचे आई वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केला. त्र्यंबकरावांचे चौथीपर्यंतचे शिक्षण वसा येथे आणि पुढे सातवीपर्यंतचे शिक्षण परभणी येथे झाले. शालेय शिक्षणाच्या काळात त्यांनी चित्रकलेची आराधनाही मनःपूर्वक केली. मुंबईच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड आणि मद्रासची लोअर ग्रेड या चित्रकलेच्या परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी चित्रकला शिक्षक म्हणून काम केले. १९३६ मध्ये हरणाबाई सावंगीकर ( इंदिराबाई वसेकर) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
मराठवाड्यातील पहिल्या चित्रकला संस्थेची मुहूर्तमेढ[१]:
वसेकर १९४९ सालात मद्रासची हायर ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झाले आणि १९५२ मध्ये हैदराबाद स्कूल ऑफ आर्ट येथून त्यांनी जी.डी.आर्ट ही पदविका प्राप्त केली. १९५५ पर्यंत त्यांनी अंबेजोगाई येथील योगेश्वरी विद्यालयात शिक्षक म्हणून सेवा केली. या काळात त्यांनी अतिशय परिश्रम करून शाळेतील कला विभाग नावारूपास आणला. विद्यार्थ्यांमध्ये आणि लोकांमध्ये प्रेमाचे व आदराचे स्थान मिळवले. ते प्रयोगशील व आधुनिक दृष्टी असलेले कलाशिक्षक होते, परंतु मर्यादित कार्यक्षेत्रात राहण्याची त्यांची वृत्ती नव्हती. १९४८ मध्ये हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाल्यानंतर एका कल्पनेने त्यांना झपाटून टाकले की मराठवाड्यात चित्रकलेचे शिक्षण देणारी एक स्वतंत्र संस्था असली पाहिजे. प्रतिगामी निजामी राजवटीत इतर अनेक क्षेत्रांसह कला क्षेत्रातही मराठवाडा मागासलेलाच राहिला. हे मागासलेपण वसेकर यांच्या मनाला सारखे सलत होते. मराठवाड्यातही कलेचा विकास झाला पाहिजे या विचाराने ते झपाटून गेले. आपली कायमस्वरूपी नोकरी सोडून नांदेड या नवख्या शहरात त्यांनी त्यांच्या स्वप्नातील कलाविद्यालय स्थापन केले. अशा प्रकारे १ जुलै १९५५ रोजी मराठवाड्यातील पहिले कलाविद्यालय 'अभिनव चित्रशाळा' या वसेकरांच्या संस्थेने स्थापन केले. मराठवाड्यात कलाक्षेत्रातील ही एक ऐतिहासिक घटना होती. त्यावेळी त्यांचे वय अवघे ३६ होते आणि शिरावर पत्नी आणि चार मुलांची जबाबदारी होती. आर्थिक परिस्थिती सामान्य होती. अशा स्थितीत असामान्य धैर्य आणि दूरदृष्टी दाखवून त्यांनी हा निर्णय घेतला. एका छोट्याशा खोलीत केवळ चार तरुण विद्यार्थ्यांसह या संस्थेचा संसार चालू झाला. कित्येक शतके कलेपासून वंचित राहिलेल्या मराठवाड्याच्या भूमीवर कला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. ही संस्था सुरू झाली तेव्हा अशा प्रकारची एकही खाजगी किंवा सरकारी संस्था मराठवाड्यात नव्हती. उच्च शिक्षणासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना हैदराबाद किंवा मुंबई येथे जावे लागत असे. त्यामुळे अनेक चांगले कलावंत कला शिक्षणापासून वंचित राहत असत. शालेय शिक्षणातही या विषयाला अतिशय गौण स्थान होते. बाल चित्रकलेची चळवळ मराठवाड्यात फोफावली तरच उच्च कला शिक्षणासाठी विद्यार्थी निवडू शकतील याचीही वसेकरांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी आपल्या चित्रशाळेत बालकांसाठी खास बालचित्रकला वर्ग सुरू केला, याशिवाय मोठ्या विद्यार्थ्यांसाठी रेखाकला व रंगकला अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. काही काळाने संस्थेतर्फे 'चित्रकला शिक्षक प्रशिक्षण' हा शासकीय अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक शाळांना प्रशिक्षित कलाशिक्षक उपलब्ध झाले आणि शालेय शिक्षणात चित्रकला विषयाला महत्त्वाचे स्थान मिळाले. मराठवाड्यात शालेय कलाशिक्षणाचा मजबूत पाया घालण्याचे मूलभूत कार्य अभिनव चित्रशाळेने केले. १९८२ मध्ये अभिनव चित्रशाळा या संस्थेच्या कलामहाविद्यालयाचे नामकरण 'चित्रकला महाविद्यालय' असे करण्यात आले. तसेच वसेकर यांच्या मृत्यूनंतर २००९ मध्ये त्याचा 'कलामहर्षी त्र्यंबक वसेकर चित्रकला महाविद्यालय' असा नामविस्तार करून संस्थेने त्यांचा यथोचित गौरव केला. बालचित्रकलेच्या प्रसारासाठी त्यांनी 'आरंभ, बोध ,आनंद, आणि विशारद ' या बालचित्रकला परीक्षा सुरू केल्या. या परीक्षांच्या अभ्यासक्रमात मुलांच्या मुक्त-आविष्कार आणि नवनिर्मितीला प्राधान्य देण्यात आले. परीक्षांचा अभ्यासक्रम आधुनिक शैक्षणिक तत्वज्ञान आणि बालमानसशास्त्र यांचा आधार घेऊन तयार करण्यात आला. या परीक्षा अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांतही लोकप्रिय झाल्या. अगदी खेड्यापाड्यातील, तळागाळातील मुलांपर्यंत चित्रकला पोहोचविण्याचे काम या परीक्षांनी केले. सर्वसामान्य लोकांनाही कलासाक्षर करण्यासाठी वसेकरांनी मराठवाड्यात फिरते कला प्रदर्शन, कुमार कलाकार मेळावा, रंगावली स्पर्धा, युवक कला स्पर्धा ,व्याख्यानमाला, प्रात्यक्षिके अशा अनेक उपक्रमांद्वारे लोकशिक्षणाची चळवळ जिद्दीने व चिकाटीने चालवली. वसेकरांनी संपूर्ण मराठवाड्याला चित्रकला शिकवली. अनेक तळमळीचे आणि निष्ठावान कार्यकर्ते सहकारी त्यांनी आपल्या कलाचळवळीतून निर्माण केले आणि चळवळ व्यापक केली. अतिशय सचोटीने आणि कितीही अडचणी आल्या तरी आपल्या तत्वांशी कुठलीही तडजोड न करता आयुष्यभर वसेकरांनी आपली संस्था चालवली. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव, बालकवी आणि चित्रकार प्राचार्य सुभाष वसेकर यांनी त्यांचे कार्य पुढे नेले.
वसेकरांची चित्रे आणि साहित्य[२] :
वसेकरांनी रंगवलेली महात्मा गांधी, विनोबा भावे ,डॉक्टर आंबेडकर, स्वामी रामानंद तीर्थ, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांची व्यक्तिचित्रे उल्लेखनीय आहेत. ही व्यक्तिचित्रे महानगरपालिका, महाविद्यालय, विद्यालय, ग्रंथालय यांच्या संग्रहात आहेत. त्यांची जलरंगातील रचनाचित्रे बंगाल शैलीमध्ये वॉश पद्धतीने रंगवलेली आहेत. या चित्रांमध्ये पारदर्शकता, तरलता आणि रचना-कौशल्य ही वैशिष्ट्ये आढळतात. 'मेघदूत' आणि 'शिवपार्वती कैलास गमन' ही अशा प्रकारची चित्रे आहेत. बाग-ए-आम हैदराबाद आणि हैदराबाद आर्ट सोसायटीतर्फे आयोजित अखिल भारतीय कला प्रदर्शनात त्यांनी पुरस्कार मिळवले. त्यांनी 'मराठवाडा' दिवाळी अंकाची मुखपृष्ठ व सजावट अनेक वर्षे केली व त्याला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कारही मिळाला. वसेकर यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली असून स्मृतितरंग Archived 2022-12-10 at the Wayback Machine. (आत्मचरित्र ), कलोपासक (कलाआस्वाद) वलये (लघुकथा) आणि संवेदना (कविता) ही पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत.
सन्मान[३]:
वसेकरांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांची महाराष्ट्र राज्य कला शिक्षण सल्लागार मंडळ, राज्य कला प्रदर्शन समिती आणि राज्य कला परिक्षा समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ललित कला अभ्यासक्रम समित्यांचे निमंत्रक व सभासद म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. १९७९ मध्ये प्राचार्य पदावरून निवृत्त झाल्यानंतर या सर्व समित्यांचे त्यांनी राजीनामे दिले. मात्र संस्थाध्यक्ष व बाल चित्रकला परीक्षा अधिकारी ही पदे त्यांनी दीर्घकाळ सांभाळली कारण संस्थेचे कार्य हा त्यांचा प्राणवायू होता. सरस्वती भुवन शिक्षण संस्था, औरंगाबाद महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांना १९९७ मध्ये मराठवाड्यातील प्रतिष्ठाप्राप्त 'विनायकराव चारठाणकर' पुरस्कार देण्यात आला, तर २००३ मध्ये त्यांना 'नांदेड-भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वसेकरांचे सुपुत्र प्राचार्य सुभाष वसेकर यांनी बालसाहित्यिक म्हणून नावलौकिक मिळवला, तसेच त्यांची नात कविता महाजन यांनी देखील मराठी साहित्याच्या क्षेत्रात भरीव कार्य केले. २०१९ मध्ये नांदेड-वाघाळा महानगरपालिकेने वसेकरांच्या नांदेड येथील निवासस्थानासमोर स्मरणशीलेचे अनावरण केले. वसेकर यांचा स्वभाव सात्विक आणि निगर्वी होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व सुसंस्कृत आणि शिस्तप्रिय होते. विचारसरणी सकारात्मक आणि बुद्धिवादी होती. मराठवाडा मुक्तिसंग्रामात देखील त्यांचा सहभाग होता. मात्र स्वातंत्र्यसैनिकाचे निवृत्तीवेतन किंवा इतर फायदे घेण्याचे त्यांनी नाकारले. १२ जुलै २००६ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. एक समाजशिक्षक चित्रकार ,कल्पक संघटक, डोळस कलाशिक्षण तज्ञ, बाल चित्रकलेवर नितांत प्रेम करणारा माणूस काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मृत्यूनंतर कोणतेही धार्मिक विधी करण्यात आले नाहीत.
- ^ 'कलामहर्षी त्र्यंबक वसेकर', दैनिक एकजूट, नांदेड, १३ नोव्हेंबर २०१८, लेखक : सुभाष वसेकर
- ^ शिल्पकार चरित्रकोश खंड ६ - दृश्यकला, साप्ताहिक विवेक, हिंदुस्थान प्रकाशन संस्था
- ^ 'स्मृतितरंग Archived 2022-12-10 at the Wayback Machine.' : त्र्यंबक वसेकर यांचे आत्मचरित्र, पद्मगंधा प्रकाशन