Jump to content

त्र्यंबकराव जानोरीकर

त्र्यंबकराव जानोरीकर
आयुष्य
जन्म इ. स. १९२१
जन्म स्थान अहमदाबाद, गुजरात
मृत्यू २३ नोव्हेंबर, २००६
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत
संगीत साधना
गुरू पं. विनायकराव पटवर्धन, उस्ताद अमान अली खॉं
घराणे भेंडीबझार, ग्वाल्हेर
संगीत कारकीर्द
पेशा गायक
गौरव
गौरव महाराष्ट्र सरकारचा प्रतिष्ठेचा सांस्कृतिक पुरस्कार

पं. त्र्यंबकराव जानोरीकर (इ.स. १९२१ - नोव्हेंबर २३, इ.स. २००६) हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते व भेंडीबाजार घराण्याच्या शैलीत ते गायन करत असत.

पूर्वायुष्य

पंडित जानोरीकरांचा जन्म गुजरात राज्यात अमदावाद येथे इ.स. १९२१ मध्ये झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे प्रख्यात गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचेकडे पुणे येथील गंधर्व महाविद्यालयात संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यापुढील बारा वर्षे त्यांनी प्रचंड मेहनत घेतली व संगीताचा कसून रियाझ केला. पटवर्धनबुवांच्या सांगण्यावरून ते तबला, हार्मोनियम व इतर वाद्येही शिकले. तसेच अहमदनगमध्येरत्‍नागिरीत संगीतप्रसार करण्याचा त्यांनी नेटाने प्रयत्न केला.

इ.स. १९४६ मध्ये त्यांनी मुंबई येथे भेंडीबाजार घराण्याचे पं. शिवकुमार शुक्ला यांचा कार्यक्रम ऐकला, आणि त्यांच्या सांगीतिक आयुष्याला वेगळेच वळण मिळाले.

पं. शिवकुमारांच्या गाण्याने व भेंडीबाजार घराण्याच्या गायनशैलीने प्रभावित होऊन पं. जानोरीकर भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खॉं यांचे गंडाधारी शागीर्द बनले. उस्तादांच्या निधनानंतर इ.स. १९५३ मध्ये पं. जानोरीकरांनी त्याच घराण्याच्या प्रख्यात गायिका श्रीमती अंजनी मालपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपली संगीत साधना कायम ठेवली. या दोन्ही संगीत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करताना पं. जानोरीकरांच्या गायकीला वेगळेच पैलू प्राप्त झाले.

सांगीतिक कारकीर्द

पं. जानोरीकरांनी भारतभर आपले कार्यक्रम केले, तसेच संगीताचा अभ्यास करणाऱ्या नव्या पिढीलाही त्यांनी तयार केले. १९६० ते ७० च्या दशकात ही विशिष्ट गायकी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना जानोरीकरांनी देशभर मैफिली करून ती सर्वदूर पोहोचवली आणि लोकप्रियही केली. कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीत इ.स. १९८९ च्या नोव्हेंबरापासून इ.स. १९९१ च्या जूनपर्यंत त्यांनी संगीत गुरू म्हणून काम पाहिले. नंतर तब्येतीच्या तक्रारीमुळे त्यांना ते काम सोडावे लागले. त्यांच्या भेंडीबाजार घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीविषयी सप्रात्यक्षिक व्याख्यानांसाठी ते विशेष लोकप्रिय होते. जानोरीकर बुवांचा वल्लभ संप्रदायाशी जवळचा संबंध होता. त्यांनी रचलेल्या बंदिशींमध्ये हिंदू देवी-देवतांची सुरेख वर्णने आढळतात.

दिनांक २३ नोव्हेंबर, इ.स. २००६ रोजी त्यांचे निधन झाले.

शिष्य

पंडित जानोरीकरांनी मैफिलीतले गाणे गाण्यासाठी अनेक खास शिष्य तयार केले. डॉ. साधना जोशी, डॉ. सुहासिनी कोरटकर, शरद करमरकर, पद्माकर कुलकर्णी, श्रीकांत पारगावकर, अनुराधा कुबेर, किशोरी जानोरीकर, केदार बोडस, कुमुदिनी मुंडकर आणि अनुराधा मराठे ही त्यांतली काही ठळक नावे आहेत. त्यांची कन्या व शिष्या किशोरी जानोरीकर या सध्याच्या पिढीतील प्रतिभावंत गायिका आहेत.

पुरस्कार व सन्मान

पं जानोरीकरांना संगीतक्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल अनेक सन्मान - पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यातील काही पुरस्कार :

  • गानवर्धन संस्थेतर्फे 'सूर-लय-रत्न पुरस्कार'
  • गंधर्व महाविद्यालय, पुणे यांचेकडून इ.स. २००० मध्ये 'संगीत शिक्षक गौरव पुरस्कार'.
  • इ.स. २००३ मध्ये आयटीसी संगीत अकादमी पुरस्कार.
  • महाराष्ट्र सरकारचा प्रतिष्ठेचा सांस्कृतिक पुरस्कार
  • पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते सन्मान


बाह्य दुवे