तूतनखामेन
ईजिप्तचा अठराव्या वंशातील एक राजा. त्याचे मूळ नाव तूतांखॅतॉन व त्याच्या पत्नीचे नाव आंख्नेस्पॅतॉन. याच्या कारकीर्दीविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही तथापि त्याच्या थडग्यात सापडलेल्या विविध मूल्यवान वस्तूंमुळे त्याचे नाव इतिहासात अजरामर झाले. वयाच्या सहाव्या वर्षीच आक्नातनने त्याला आपला जावई करून घेतले. म्हणून त्याला आक्नातननंतर वारसाहक्क प्राप्त झाला. वयाच्या ९–१० व्या वर्षी त्याने स्वतःस राज्याभिषेक करून घेऊन ये नावाच्या अमात्याच्या साहाय्याने राज्यकारभाराची व्यवस्था केली. पुढे त्याने आपले लक्ष पॅलेस्टाइन व सिरियाकडे वळविले. आक्नातनच्या धार्मिक धोरणामुळे सुरुवातीस त्याला सामान्य लोक व संपन्न पुरोहित वर्ग यांचे शत्रुत्व पतकरावे लागले. या मुळे प्रथम त्याने आपल्या उभयतांच्या नावांमधील ॲतॉन हा शब्द काढून टाकला आणि त्यांनी अनुक्रमे तूतांखामेन व आंख्नेसॅमन अशी नावे धारण केली. पुढे त्याने राजधानी आकेनातनहून थीब्झला हलविली. नंतर ॲतॉन या देवतेची पूजा बंद करून पूर्वीच्या ॲमन या देवतेची पूजा सर्वत्र सुरू केली. आठ वर्षे राज्य केल्यानंतर अठराव्या वर्षी तूतांखामेन मरण पावला. त्याचे थडगे लक्सॉरजवळ व्हॅली ऑफ द किंग्ज या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रदेशात हौअर्ड कार्टर या पुरातत्त्वज्ञास १९२२ मध्ये सापडले. त्यात पुरातत्त्वीय दृष्ट्या महत्त्वाच्या व मूल्यवान वस्तू आढळल्या. त्यांपैकी बहुतेक वस्तू कैरो येथील वस्तुसंग्रहालयात ठेवल्या आहेत. या थडग्यामुळे ईजिप्तविद्या या विषयात मोलाची भर पडली.
प्रत्यक्ष थडग्याची खोली १६ फेब्रुवारी १९२३ रोजी उघडण्यात आली. या थडग्यात एकूण चार खोल्या व एकमेकींमध्ये ठेवलेल्या तीन शवपेटिका सापडल्या. पहिल्या खोलीत (अंतरालयात) तूतांखामेनच्या रथ, शस्त्रे, रत्नजडित सोन्याचे मढविलेले फर्निचर, कपडे, करंडे वगैरे एकमेकांवर खच्चून रचून ठेवलेल्या वस्तू होत्या. याच खोलीत राजा राणीचे एक चित्र सिंहासनावर मागील बाजूस काढले होते. त्यात तूतांखामेन बसला असून राणी त्याच्या खांद्याला काहीतरी मलम वा सुगंधी द्रव्य चोळीत असल्याचे दाखविले आहे. त्याच्या मागे ॲतॉनची तबकडी असून इतरही काही चित्रे दिसतात. या सर्व वस्तूंतील जडजवाहिऱ्यांनी मढविलेले सोन्याचे सिंहासन अद्वितीय व आकर्षक आहे. दुसऱ्या खोलीत राजाराणीच्या ममी ठेवलेल्या सोन्याच्या शवपेटिका होत्या. त्या सर्व अलंकृत असून सर्वात आतील पेटीत राजाची सोन्याची प्रतिमा आढळली. त्यावर मुकुट, सोन्याची कट्यार, सोन्याची पादत्राणे आणि रत्नजडीत गळपट्टी होती. राजाच्या भालप्रदेशावर फुलांचा गजरा ठेवला होता. तिसऱ्या खोलीत देवतांचे सोन्याचे पुतळे, रत्नाकरिता हस्तिदंती पेट्या आणि राजाराणी यांच्या परलोकाच्या प्रवासासाठी सात वल्ही व नावा ठेवल्या होत्या. चौथ्या खोलीत राजाचे धार्मिक पादपीठ, सुगंधी तेले, उटणी, मद्य व इतर खाद्यपदार्थ तसेच अंत्यसंस्काराच्या वेळी लागणारे प्रथेनुरूप सर्व साहित्य व धर्मग्रंथांतून उल्लेखिलेल्या कृत्यांची नमुनेदार चित्रे दिसतात. याशिवाय या थडग्यात अनेक बारीक सारीक वस्तू आढळल्या. त्यांपैकी राणीच्या केसातील एक चाप वैशिष्ट्यपूर्ण असून तो तत्कालीन ईजिप्शियन कलेची अभिरुची व्यक्त करतो. तूतांखामेनचे थडगे इतर राजांच्या मानाने आकाराने लहान आहे तथापि त्यातील विविध व मूल्यवान वस्तूंमुळे ते जगप्रसिद्ध झाले.