तुषार आपटे
तुषार आपटे हा अमेरिकेत लॉस एंजेलस येथे राहणारा एक मराठी तरुण संगीतकार आहे.
कुटुंब
तुषारची आई मिनोती आपटे या शास्त्रज्ञ आहेत. शिवाय त्या स्वतः उत्तम नर्तकी आणि कलावंत आहेत. तुषारचे वडीलही ऑस्ट्रेलियातल्या सिडनी येथे मान्यवर शास्त्रीय गायकांमध्ये गणले जातात.
संगीताचे शिक्षण
तुषारने बारावीत असताना ‘संगीत’ या विषयात विशेष प्रावीण्य मिळविल्यानंतर सिडनी येथील ‘सिडनी कॉन्झरव्हेटरियन ऑफ म्युझिक’ येथे संगीताचे पुढचे शिक्षण घेतले. त्याने सिडनी विद्यापीठातून ‘बॅचलर ऑफ लिबरल स्टडीज’ तसेच ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स’ येथून ‘मास्टर ऑफ जर्नालिझम’ही केले आहे.
झीरोची निर्मिती
२०१४ च्या ऑक्टोबर महिन्यात टोरॉंटो येथील एका संगीत कार्यशाळेसाठी ऑस्ट्रेलियामधून ‘ऑस्ट्रेलियन परफॉर्मिग राइट असोसिएशन’ने तुषारची निवड केली होती. या कार्यशाळेत तुषारने ‘झीरो’ या गाण्याची निर्मिती केली. आघाडीचा पॉप गायक क्रिस ब्राऊन याच्या आवाजात त्या गाण्याची सप्टेंबर २०१५ मध्ये ध्वनिमुद्रिका निघाली. भारतातही ‘व्हीएच वन’ या वाहिनीवर हे गाणे दाखविले जाते.
तुषारने संगीत दिलेली अन्य गाणी
हॉलीवूडच्या एका चित्रपटासाठीही तुषारने ‘ख्रिसमस सॉंग’ लिहिले. ‘एमटीव्ही’वरील युवकांसाठी असलेल्या एका रिअॅलिटी शोसाठी (द चॅलेंज) सध्या (इ.स.२०१५) तो काम करतो आहे. ‘युके’ (आयटीव्ही) नेटवर्कवर सेलिब्रेटी शेफ अॅडम रिचमन यांचा सहभाग असलेल्या ‘बीबीक्यू चॅम्प’या कुकिंगविषयक रिअॅलिटी शोच्या काही भागांचे संगीतही त्याचे होते. ‘एनबीसी’वरील ‘बिगेस्ट लुझर यूएसए’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या १७ व्या पर्वासाठीही तुषारनेच संगीत दिले.
सोशल मीडियावर क्रिस ब्राऊन
पॉप संगीताची आवड असलेल्या तरुणांमध्ये क्रिस ब्राऊन हे नाव लोकप्रिय आहे. ‘ट्विटर’ आणि ‘फेसबुक’ सारख्या सोशल मीडियावरही क्रिस ब्राऊन तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. ‘ट्विटर’ आणि ‘फेसबुक’वर क्रिस ब्राऊनचेेे अनुक्रमे दीड कोटी फॉलोअर्स व चार कोटी चाहते आहेत. मात्र सध्या त्याचे जे गाणे त्याच्या चाहत्यांच्या ओठावर रुळले आहे त्याचे श्रेय मराठमोळ्या तुषार आपटे या तरुणाने केलेल्या कामाला आहे. तुषारचे संगीत, त्याच्या शब्दांची किमया याची साथ क्रिसच्या ‘झीरो’ या गाण्याला मिळाल्याने ते अधिक लोकप्रिय ठरले आहे.