तुळाजी आंग्रे
तुळाजी आंग्रे हे कान्होजी आंग्रे यांचे सुपुत्र.
तुळाजीने कोकण प्रांतावर आपली पकड घट्ट बसवली होती. रयत सुखावली होती. स्वस्ताई होती. शेती व इतर व्यवसाय समृद्धीकडे तुळाजी आंग्रे जातीने लक्ष घालीत असे. शिक्षणाच्या दृष्टीने शाळा आणि इतर व्यवसायांचे प्रशिक्षण मिळे. बंदरे आणि व्यापार भरभराटीचा होता. न्यायव्यवस्था चोख होती. धर्माची मोकळीक आणि जनतेला सुरक्षा होती. याच काळात त्यांनी आपले आरमार अधिक बलवान आणि आधुनिक करण्यासाठी पावले उचलली. त्यांनी वडिलांच्या म्हणजेच कान्होजी आंग्रे व संभाजी आंग्रे यांच्या हाताखाली उमेदवारी केली होती. आणि त्याचा उपयोग करत आरमारात आणखी सुधारणा केल्या. जहाज बांधणी लागणाऱ्या सागवानाची लागवड कोकणात सुरू केली. आरमारी जहाज बांधणीसाठी सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग येथे सरकारी कारखाने स्थापले. जहाज बांधण्याची कला त्यावेळी पूर्णत्वास गेली होती. इंग्रज कारखान्यात तयार होत त्या तोडीची सहाशे ते तेराशे टन वजनाची व्यापारी जहाजे तयार होऊ लागली. आंग्रे यांच्या आरमारातील १८ ते २० तोफा ओतण्याचे त्यांचे स्वतःचे कारखाने होते.
तुळाजी आंग्रे हे त्यांच्या आरमारातील कर्मचाऱ्यांची निवड पश्चिम किनाऱ्यावरील समुद्राशी पिढीजात संबंध असलेल्या जातीमधून करत असत. त्यांत गुजरातमधील खारवी, महाराष्ट्रातील कोळी, भंडारी आणि कोकणी मुसलमान तर कर्नाटकातील आंबी यांचा समावेश होता. याशिवाय दर्यावर्दी लोक शोधून त्यास आरमारात भरती होण्यासाठी प्रयत्न केले जात. आरमारावर उत्तम प्रकारचा दारूगोळा आणि तोफा साठवलेला असे. तोफा चालवण्यासाठी युरोपियन आणि देशी गोलंदाज असत. आरमारात दुर्बीण, होकायंत्र यासारखी आधुनिक उपकरणे आली होती. कुशल सारंगी आणि दर्यावर्दी मनुष्यबळ असलेल्या या आरमारासाठी स्वतःचे किल्ले आणि सुरक्षित जागा उपलब्ध होत्या. तुळाजी आंग्रे यांच्या आरमारात गलबत, गुरब, पट्टेमार, तीरकाठी, मनवर, बागला, बतेला, बोटील, महागिरी, पाल, पगार, तरणी, कतुर, करवल, तरवे, सिबाद,अशी एक्कावन्न प्रकारची जहाजे होती. प्रत्येक जहाजाचे सामर्थ्या वेगवेगळे असे. तुळाजी आंग्रे यांनी आपले सर्व किल्ले आणि ठाणी बळकट करून ठेवली होती. यात अंजनवेल, कनकदुर्ग, गोवळकोट, गोवेदुर्ग, जयगड, पालगड, पूर्णगड, प्रचितगड, फत्तेदुर्ग, भैरवगड, बाणकोट, रत्नागिरी, रसाळगड, यशवंतगड, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, इत्यादी २७ ठाणी होती. शिवाय ३०,००० चे घोडदळ तयार केले होते.
पुस्तके
तुळाजी आंग्रे - एक विजयदुर्ग (लेखक : श.श्री. पुराणिक). या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.