तुळसी परब
तुळसी परब (जन्म : इ.स. १९४१; - चेंबूर-मुंबई, ५ जुलै २०१६) हे एक मराठी कवी होते. त्यांचे बालपण मुंबईतील एका चाळीत गेले. भाषाशास्त्रात एम.ए. केल्यावर त्यांनी मंत्रालयात काही काळ नोकरी केली.
प्रस्थापित साहित्यिकांच्या विपरीत लेखन करणारे अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, मनोहर ओक, राजा ढाले, वसंत गुर्जर, सतीश काळसेकर यांच्याबरोबर परबांनी लेखन केले. परबांच्या कविता १९६० सालच्या लघुनियतकालिकांमधून/अनियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. त्यांचा हिल्लोळ हा पहिला कवितासंग्रह १९७३ मध्ये प्रकाशित झाला. महानगरीय जीवन, प्रस्थापित व्यवस्था-अव्यवस्था व मानवी स्वातंत्र्य यांचे तत्कालीन वास्तव त्यांच्या हिल्लोळमधील कवितांतून उमटले आहे.
यानंतर परब यांनी काही वर्षे धुळे जिल्ह्यातील शहादा येथे शेतमजूर व आदिवासींसाठी श्रमिक संघटना चालवीत असलेल्या व महाराष्ट्रातल्या ‘मुक्त साम्यवादी गटा’शी संबद्ध असलेल्या चळवळीत काम केले. त्यात स्थानिक दांडग्या जमीनदारांचे हितसंबंध दुखावल्याने गुंडांकरवी त्यांना जबर मारहाणही सोसावी लागली. यावर त्यांनी कवी, कविता आणि कुऱ्हाड नावाची कविता लिहिली आणि आपले काम चालू ठेवले. आणीबाणीविरोधी लढ्यात परबांनी काही महिने मिसा कायद्याखाली विसापूरच्या तुरुंगात दहा महिन्यांचा कारावास भोगला. कारावासात लिहिलेल्या कवितांचा धादांत आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता हा कवितासंग्रह तेव्हाच आला. या कविता खूपच प्रगल्भ झालेल्या दिसून येतात, आणि त्यामुळे परबांना 'राजकीय कवी ' म्हणून ओळख मिळाली .
मार्च १९७७मध्ये तुरुंगातून सुटका झाल्यावर ३१ ऑक्टोबर १९७७ रोजी त्यांचे वंदना सोनाळकर यांच्याशी लग्न झाले. व दोघेही १९७९मध्ये ते औरंगाबादेत आले. परब लाल निशाण पक्ष व इतर डाव्या संघटनांबरोबर काम करीत असत. नंतर तेथील अजिंठा या दैनिकात ते तेव्हाच्या राजकीय परिस्थितीवर ओज पर्व या टोपणनावाने ते लिखाण करीत.
त्यानंतर परबांनी अजिंठामधील नोकरी सोडून एका इंग्लिश वर्तमानपत्राचा औरंगाबादमधला बातमीदार म्हणून काही दिवस काम केले. त्यानंतर मुंबईत त्यांनी नवशक्ति या दैनिकात काम केले. याशिवाय काही दिवस ते रात्रशाळेत शिक्षक म्हणून नोकरी करीत होते. २००२ साली लोकवाङ्मय प्रकाशन, मुंबई, कडून त्यांचा तिसरा संग्रह, कुबडा नारसीसस प्रकाशित करण्यात आला.
२०१२ साली परबांना कॅन्सर असल्याचे निदान झाले . २०१३ला त्यांच्या पत्नी वंदना सोनाळकर टाटा सामाजिक शास्त्र संस्था, मुंबई येथे स्त्री अध्ययन या विषयाच्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या, आणि दोघे मुंबईला राहू लागले. एप्रिल २०१६ मध्ये परबांचा चौथा संग्रह, हृद प्रकाशित झाला. ५ जुलै २०१६ त्यांचे मुंबईत निधन झाले.
परब यांना ओजस आणि दर्यन नावाचे मुलगे आहेत.
कवितासंग्रह
- हिल्लोळ (पहिला काव्यसंग्रह)
- धादान्त सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता
- पाब्लो नेरुदांच्या कविता (अनुवादित)
- ‘मनोहर ओक’च्या ऐंशी कविता (संपादित, सहसंपादक चंद्रकांत पाटील)
- कुबडा नार्सिसस
- हृद
परबांची एक कविता
डबक चाळ : आधीच प्रभुत्वाशयाने
डबक चाळ : आधीच प्रभुत्वाशयाने मग्न
महारांच्या भाषेतला अतिथी शब्द होतो
सामान्य व्यवहारातला
आणि समोरच्या डबक्ताय एक साग्र
रंगीत चाळ उभी रहाते.
ती कलंडतेही कधी कधी आणि सोप्या बदकासारखी,
चिखलासारखी, डबक्यात पडता पडता
तिचा भुरकट पांढरा रंग विस्तारतो.
ती डुबते, ती डबाडबा घाईने डुबते,
तिची चिल्लीपिल्ली आंघोळतात, तिच्या मग्न आशयाला
कोऱ्या भाकरीएवढे साधे नव्हे
तर उपासाच्या धोपडदशमीसारखे कंगोरे फुटतात.
डबक चाळ की बदक चाळ, आम्हाला हा प्रश्न पडायचा
नावाची गल्लत करायचो आम्ही ल्हाणपणी,
मी गटारावरून म्युनिसिपाल्टीच्या शाळेत जायचो,
पावसाळ्यात पाणी फुगले की
पोरं धडाधडा उड्या घ्यायची
घाण पाण्याने त्यांचे डोळे, केस हिरवे व्हायचे
मी पण हिरवे टोळ पकडायचो
हिरवी हिरवी फुलपाखरे होतो आम्ही
आम्ही मुले पण असायचो, पण हिरवीनी कच्ची
मीही एकदा पाण्यात उडी घेतलेली गटाराच्या
नी पोहत गेलेलो डबक/बदक चाळीच्या ओसाडीपर्यंत
भीमराव ल्हाणपणी इथे रहायचे, त्यांनासुद्धा
पावसाळ्यात घाणीतून पोहत यावे लागायचे, माहित हे
भीमराव कोण, कुठल्या यत्तेतला मी विचारले
आमच्या शाळेतला खैरमोडे म्हणाला,
अरे भीमराव म्हणजे आपले बाबासाहेब
आपले डाक्टर बाबासाहेब आंबेडकर,
आंबेडकर बाबा.
आपल्या पुस्तकात ज्यांचा फोटो आहेना ते.
आणि त्या बिचाऱ्याकडे पुस्तक नव्हते
माझ्याकडेसुद्धा तेव्हा थोडीच पुस्तके होती.
बाबासाहेब, पहिल्यांदा तुम्हाला
असे ओळखले आहे मी, असे
ल्हाण अस्ताव्यस्त हिंडणाऱ्या चिखली डुकरासारखा,
आपल्याच संकटामधून जगासमोर
संकटाची मीमांसा मांडणारा,
या जगाच्या जातीव्यवस्थेला डुक्कर-मुसंडी देऊन
तो डबक/बदक चाळीच्या गटारात
कोसळून देऊ इच्छिणारा
एक सालस, कंदिलाच्या उजेडातला
तोकडी खाकी पँट घालणारा कवि-पोरगा.
बाबासाहेब लहानपणी तुम्ही डिट्टो असे दिसला होतात मला
मी सातवीत असताना,
आणि बाबासाहेब, तुम्हाला आठवते ना
तुम्ही लहानपणी आमच्या पुस्तकातसुद्धा राहत नव्हतात
नी डबक/बदक चाळीपेक्षा तुमची कांक्षा विस्तारून,
तेव्हा कितीतरी प्रचंड वर्षे होऊन गेली होती.
मी केवढा होतो, तुम्ही कुठे केवळे १९५३ साली
आम्ही पाचव्या यत्तेत असताना बाबासाहेब,
आणि सातवी संपवून
मी गटाराजवळच्या शाळेतून हायस्कुलात गेलो
तेव्हा तुम्ही काय करत होतात.
तुमचं धर्मांतर झालं होतं का तेव्हा,
धर्मचक्र प्रवर्तनाचं वहातं वारं
गटारं बुझवू पाह्यलेली तुमच्या शांत समुद्राने
एक प्रचंड आंदोलित इतिहास घडवलेला तुम्ही
ते घडलं होतं का तेव्हा,
तुम्ही नव्हतात आणि होतातही वाटते अंधुकसे
जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत
आम्ही सर्व जातीपातीची पोरं
शाळेत जात असताना
आजूबाजूने सूं सूं गोळ्या चालत असत,
अनेकदा खाटेवरून नेताना
जखमी किंवा मेलेली माणसं
तुम्हीही पाहिलेली असतील, बाबासाहेब
तेव्हा कर्फ्यूच्या ठिक्कर अंधारात
बाबासाहेब ल्हाणपणी किती एकाकी वाटायचं
गटारावरच्या पोरांना तेव्हा, किती एकाकी.
पुरस्कार आणि सन्मान
- २००५ साली विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.