तुळशीबाग राम मंदिर
तुळशीबाग राम मंदिर हे पुण्यातील पेशवेकालीन राम मंदिर आहे. ते पुण्यातील बुधवार पेठेत तुळशीबाग भागात आहे.
नारो आप्पाजी खिरे
पुणे शहरातील हे वैभवशाली असलेले राम मंदिर कै. श्रीमंत नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) यांनी स्थापन केले. नारो आप्पाजींचे बालपणीचे नाव नारायण होते. समर्थ रामदास स्वामींनी ज्या डोंगरावरील मारुतीची एकनिष्ठ सेवा केली त्या जरांड्याच्या पवित्र भूमीत नारो आप्पाजींचा जन्म झाला. मौजीबंधनापर्यंत त्यांचे वास्तव्य सातारा जिल्ह्यातील मौजे पाडळी येथेच होते.
नारो आप्पाजी यांची छत्रपती शाहू महाराजांनी सन १७१९ मध्ये इंदापूर प्रांतात मुतालिक म्हणून नेमणूक केली. तेव्हापासून १७३२ पर्यंत तरी निदान नारो आप्पाजी साताऱ्यास वास्तव्य करीत होते. पुढे थोरले बाजीराव पेशवे ह्यांनी मराठी साम्राज्याची सूत्रे पुण्याहून हलविण्यास सुरुवात केली आणि आपले मुख्य ठाणे साताराऐवजी पुणे केले. पुढे आपल्या कर्तृत्वाने व हुशारीने नारो आप्पाजी यांनी पेशवाईत मोठा लौकिक मिळविला. १७५० मधे नानासाहेब पेशव्यांनी त्यांची नेमणूक पुणे प्रांताचे सर-सुभेदार पदावर केली. श्रीमंत नारो आप्पाजींनी स्वराज्याची पुनर्भूमिगणना करून जमीनमहसुलांत क्रांती घडविली. तसेच जमाखर्चाचे बाबतीतही त्यांचा हात धरणारा दुसरा मोठा अधिकारी नव्हता. पुणे शहराची वाढ करून व्यापार उदीम वाढविणे, नवीन पेठा बसविणे तसे कात्रज धरणाचे काम नारो आपाजींच्या देखरेखीखालीच झाले. कित्येक प्रसंगी न्यायनिवाडे करणे, जहागिरींच्या हिशोबांचे फडशे पाडणे, महत्त्वाच्या सडकांवर सावलीसाठी झाडे लावणेची व्यवस्था करणे ही कामेही पेशव्यांनी त्यांचेकडून करवून घेतली. सन १७६३ मध्ये पुण्याचा केलेला बचाव व पुण्याची पुनर्रचना, पुरंदर भागातील कोळ्यांचा बंदोबस्त, नारायणरावाचे खुनानंतर पुण्याचा बंदोबस्त, हैदर अल्लीच्या फंदाफितुरांचा बंदोबस्त, अनेक प्रसंगी परकीय वकिलांशी केलेल्या मसलती अशा कितीतरी गोष्टी त्यांच्या कर्तबगारीची साक्ष देतात. रिसायतकार सरदेसाईंच्या भाषेत सांगायचे म्हणजे नारो आप्पाजी त्यावेळचे ‘चीफ इंजिनिअर’ म्हणावे लागतील. पुणे शहराची रचना हीच त्यांची मुख्य कृती असली तरी इतर व्यवहारांतही ते निस्पृह, कर्तबगार व राज्यहितास जपणारे अधिकारी होते.
सन १७५० पासून १७७५ पर्यंत पुण्याच्या सर-सुभेदारी पदावरून नारो आप्पाजीने एक निष्णात, निःस्वार्थी, निस्पृह व स्वामिभक्त प्रशासक म्हणून लौकिक मिळविला. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पुणे प्रांताची सर-सुभेदारी एकही आक्षेप न येता अत्यंत व्यवस्थित पार पाडली. राज्य व्यवस्थेबरोबरच त्यांनी सार्वजनिक, धार्मिक व लोकोपयोगी कामाकडेही तितकेच लक्ष दिलेले आहे. पुण्यात असलेली तुळशीबाग आणि तेथील राममंदिर ही त्यांचीच देन आहे.
बांधकाम
तुळशीबागेतील राम मंदिराचे बांधकाम इ.स. १७६१ मध्ये सुरू झाले, परंतु ते सुमारे १७९५ पर्यंत चालू होते. मंदिराचे आवार सुमारे एक एकर आहे. उत्तर, दक्षिण व पश्चिम अशा तिन्ही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. सन १८३२ मध्ये सभामंडपाचा काही भाग निसटल्यामुळे दुरुस्त केला. सध्या (२०१७ साली) असलेला सभामंडप हा सन १८८४ मध्ये नंदरामजी नाईक यांनी बांधला व पूर्वी असलेल्या शिखरावरच वरच्या बाजूस नवीन उत्तुंग शिखर बांधले. हे शिखर म्हणजे पुण्यनगरीला भूषण झालेले आहे. शिखरावर अनेक साधुसंतांच्या व पेशवेकालीन पोशाखातील काही व्यक्तींच्या मूर्ती बसविल्या आहेत. मूर्ती बसविलेले सुमारे ७० कोनाडे आहेत व त्यांवर १०० कळसही आहेत. शिखर सुमारे १४० फूट उंच असून वरचा कळस सुमारे ४ फूट उंचीचा आहे. त्यास सोन्याचा पत्रा मढविलेला आहे. हा कळस बसविण्याच्याआधी तो गावातून वाजत गाजत मिरवणुकीने येथे आणला असे सांगतात. सन १८५५ मध्ये देवाच्या गाभाऱ्याच्या मुख्य चौकटीस पितळी पत्रे बसविले व त्यावर चांदीचा मुलामा दिला. त्यानंतर श्रीमंत पंतसचिव भोर यांनी त्या दरवाज्याला चांदीची चौकट करून दिली. मंदिराच्या आतल्या व बाहेरच्या गाभाऱ्यात संगमरवरी फरशी आहे. श्रीराम, लक्षमण व सीता या तिन्ही मूर्ती पांढऱ्या पाषाणाच्या असून वल्कले नेसलेल्या, जटायुक्त व धनुर्धारी आहेत. सीतेच्या एका हातात कमळ असून दुसऱ्या हातांत कलश आहे. तिन्ही मूर्ति संगमरवरी असून अतिशय नाजूक, रेखीव व प्रमाणबद्ध आहेत. १७६७ रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या मूर्ती उमाजी बाबा पंढरपूरकर यांच्याकडून करवून घेतल्याची नोंद आढळते.