Jump to content

तुकाराम बीज

गरूड विमानात संत तुकाराम. चित्रकार: राजा रविवर्मा

तुकाराम बीज हा संत तुकारामांचा वैकुंठ गमन दिवस मानला जातो आणि महाराष्ट्रात तो साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस आहे, असे माननारा एक मतप्रवाह आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते.[]

वाद

तुकाराम महाराज खरोखरच सदेह वैकुंठाला गेले होते का? हा प्रश्न पूर्वीपासून काही लोक विचारतात. काही लोकांच्या मते, तुकाराम महाराजांची हत्या करण्यात आली होती. तुकारामांच्या मृत्यूविषयीची नेहमी शंका व्यक्त केली जाते.[]

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी २०१८ मध्ये 'संत तुकारामांचा खून झाला होता' असं वक्तव्य केलं.[] वारकरी संप्रदायातील काही लोकांनी त्यांचा निषेध केला.[]

लेखक डॉ. आ. ह. साळुंखेंनी 'विद्रोही तुकाराम' हे चरित्र लिहिले होते. त्यात साळुंखे लिहितात,

"तुकारामांनी आपल्या धारदार वाणीने अत्यंत तिखट आघात ज्यांच्यावर केले, ते कोणी सामान्य लोक नव्हते. या तथाकथित पूज्य लोकांचे वर्तन ढोंगीपणाने भ्रष्ट झालेले असल्यामुळे तुकाराम त्यांच्या व्यक्तित्वावरील धार्मिकतेचा बुरखा टरकावून टाकत असत. अर्थ न समजता नुसते पाठांतर करणारे वैदिक पंडित ओझे वाहणाऱ्या घोड्या-गाढवापेक्षा हीन असल्याचे ते सांगत."

या सर्व कारणांमुळे समाजातल्या प्रस्थापित आणि धार्मिक अधिष्ठान असणाऱ्या लोकांच्या मनात तुकारामांविषयी विषारी रसायन तयार झालं होतं, असं साळुंखे मानतात. अभंग रचून वेदांवरील पारंपरिक मक्तेदारीला आव्हान तुकारामांनी दिले होते. काही जणांच्या मते, तुकारामांचे विचार तत्कालीन समाजात रुचणारे नव्हते. याच कारणामुळे त्यांचा छळ व्हायचा.

"हे लोक कोलीत लावून माझा घात करतील असे तुकाराम म्हणतात, याचा अर्थ त्यांना भावी घटनांची चाहूल लागली होती असाच होतो. शस्त्रधारी माणसाने माझ्या देहाचे शेकडो तुकडे केले तरी मी भिणार नाही, माझी मान कापली तरी मी वेगळे काही करणार नाही, अशा आशयाची विधाने तुकाराम वारंवार करतात."

तुकारामांच्या हत्या झाली असावी, हे मानन्यासाठी मनुस्मृतीचे उदाहरण काही लोक देतात,

"तुकारामांच्या हत्येचा स्पष्टपणे आदेश देऊ शकणारे मनुस्मृतीचे काही नियम आपण नजरेखालून घालूया: 'ब्राम्हणाला नावे ठेवली असता शूद्राचा वध करावा, शूद्राने आपल्या दारुण वाणीने द्विजांची निंदा केली असता त्याची जीभ छाटावी. कारण तो जन्माने हीन असतो....' ज्यांच्या हातात धर्मशास्त्रे होती, त्यांनी भारताच्या इतिहासात या नियमांची अंमलबजावणी अनेकदा केली आहे."

संत बहिणाबाई या संत तुकारामांच्या शिष्या होत्या. त्यांनीही तुकारामांबद्दल लेखन केले होते. बहिणाबाई यांनी लिहले आहे की, देहूमध्ये मंबाजी गोसावी हे तुकाराम आणि त्यांच्या भक्तांचा द्वेष करत होते.[]

संदर्भ

  1. ^ "संत तुकाराम बीज : अभंग लिहिणारे एक वारकरी". Maharashtra Times. 2022-01-13 रोजी पाहिले.
  2. ^ a b "संत तुकारामांचा खून झाला होता की ते सदेह वैकुंठाला गेले?". BBC News मराठी. 2018-07-18. 2022-01-13 रोजी पाहिले.
  3. ^ "तुकाराम महाराजांचा खून झाला होता, आव्हाडांचे वादग्रस्त विधान". Loksatta. 2022-01-13 रोजी पाहिले.
  4. ^ "sant tukaram was killed says ncp leader jitendra awhad | संत तुकारामांचा खून झाला होता; जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं वारकरी संतप्त | Lokmat.com". LOKMAT. 2018-07-13. 2022-01-13 रोजी पाहिले.